धीरो भगत : (जन्म इ. स. १८ व्या शतकाचा उत्तरार्ध – मृत्यू इ. स. १८२५).जन्म वडोदरा गुजरात जवळील गावामध्ये. हे ज्ञानमार्गी कवी. ज्ञाती ब्रह्मभट/बारोट. पित्याचे नाव प्रताप बारोट, आईंचे नाव देवबा. धीरो भगतांच्या तत्त्वविचारात शांकरवेदान्ताचे अनुसरण आहे. त्यांनी काफी या रचना तंत्रात विपुल लेखन केल्याने त्यांना काफी हे उपनाम मिळाले होते. स्वरूपनी काफीओ, ज्ञानवत्रीसी, सुरतीबाईनो  विवाह  इ.त्यांच्या रचना प्रसिद्ध आहेत. त्यांच्या रचनेत योगादि मार्गांचा अस्वीकार आणि ज्ञानमार्गांचा प्रबळ पुरस्कार आढळतो; त्यांच्या पदात असलेला भक्तिभाव, योगमार्गी परिभाषेतून केलेले अध्यात्म अनुभवाचे वर्णन त्यांच्या ज्ञानमार्गी अध्यात्मसाधनेत भक्ती आणि योगतत्त्व यांचे संमिलन प्रकट करतो. त्यांच्या रचनांमध्ये तत्त्वविचार, अध्यात्म उपदेश असला तरी त्यातील जिवंतता, दृष्टान्तचित्रांनी आलेली प्रतीतीक्षमता, प्रत्यक्षीकरण इ. मुळे त्यांना रसपूर्णता येते. मताभिमानी सांप्रदायिकावर प्रहार करणाऱ्या त्यांच्या मतवादी, आत्मबोध, शिष्यधर्म, योगमार्ग इ. रचना आहेत, पण त्यातील शैलीभिन्नतेमुळे काही अभ्यासक धीरा यांच्या या रचनांच्या कर्तेपणाविषयी शंका उपस्थित करतात. याशिवाय धोळ, गरबी, वसंत, बारमास इ. काव्यबंधातील त्यांची अनेक पदे प्रसिद्ध असून काही पदे हिंदीत व काही मराठीतही आहेत. अन्य रचनेत ओजस्वी असलेली त्यांची वाणी पदनिर्मितीत मधुर, प्रासादिक व लालित्यपूर्ण होते.

     

संदर्भ :

  • महेता,कौशिकराम वि (प्रका.), धीरो अने तेनी कविता,१९२१.

प्रतिक्रिया व्यक्त करा