कनिष्क : (कार. इ.स. ७८ ‒ १०१). कुशान वंशातील सर्वश्रेष्ठ राजा. सम्राट अशोकाच्या मृत्यूनंतर मौर्य साम्राज्याचा ऱ्हास होऊ लागला. शुंग आणि कण्व घराण्यांच्या राज्यकाळात मगध साम्राज्याच्या दक्षिण आणि पश्चिम भागांत इतर छोटी राज्ये स्थापन झाली. त्यातील शक घराण्याचे राज्य प्रकर्षाने वाढीस लागले. त्याचबरोबर ग्रीक राजांची आक्रमणे इ.स.पू. शेवटच्या शताब्दीपर्यंत चालू राहिली. दक्षिणेत सातवाहनांचे राज्य उदयास आले. याच सुमारास चीनमधील यूए-ची या जमातीच्या लोकांना हूण जमातीने चीनच्या कान्सू प्रांतातून हुसकावून लावले. या यूए-ची जमातीतल्या कुइशुआंग या गटाच्या नेत्याने इतर गटांना बरोबर घेऊन हिंदुस्थानात प्रवेश केला. या गटाचा अपभ्रंश ‘कुशाण’ असा झाला, त्यातूनच कालांतराने कुशाण घराण्याचा उदय झाला. कुशाण गटाचा नेता म्हणून पहिला विम कडफिसेस ओळखला जातो. त्याने प्रथम काबूल आणि काश्मीरमध्ये आपले छोटे साम्राज्य स्थापन केले. पहिला कडफिसेसनंतर त्याचा मुलगा दूसरा कडफिसेस हा थोड्या काळासाठी गादीवर आला होता. परंतु त्याच्या राज्यकालादरम्यान काश्मीर आणि अफगाणिस्तान यांचा काही भाग लढायांत त्याने गमावला. त्यानंतर कनिष्क इ.स. ७८ साली राज्यावर आला. या घराण्यातला सगळ्यात शूर राजा म्हणून कनिष्क ओळखला जातो.

कनिष्काने उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान आणि माळवा हे प्रदेश जिंकून घेतले. आशियातील उत्तरेस खोतानपासून दक्षिण कोकणापर्यंत काश्मीर आणि अफगाणिस्तानचा कडफिसेसने गमावलेला प्रदेश त्याने परत जिंकून घेतला. दुसऱ्या बाजूला त्याने चीनच्या पेनर्यांग या सेनापतीला लढाईत हरवून कॅश्गार, खोतान आणि यार्कंद हे प्रदेश आपल्या राज्यात समाविष्ट केले. कनिष्काचे राज्य अफगाणिस्तानपासून चीनच्या कॅश्गार प्रांतापर्यंत आणि पूर्वेकडे वाराणशीपर्यंत तसेच दक्षिणेकडे अरबी समुद्रापर्यंत पसरले होते. मौर्य साम्राज्यानंतर उत्तर हिंदुस्थानात प्रभावीपणे पसरलेले हे दुसरे साम्राज्य होते. कनिष्कपूर हे कनिष्काने काश्मीरमध्ये वसविलेले शहर, तेच सध्याचे श्रीनगर.

कनिष्काने चीन, रोमन इत्यादी देशांमधील साम्राज्यांबरोबर व्यापार स्थापित केला. त्याने तांबे, चांदी आणि सोन्याची नाणी पाडली. सोन्याच्या नाण्यावर एका बाजूस स्वतःची प्रतिमा व दुसऱ्या बाजूला वैदिक, रोमन आणि पर्शिअन देवतांच्या प्रतिमा कोरलेल्या होत्या. इ.स. ७८ या साली त्याने नवीन भारतीय शकाचा (वर्षगणना) आरंभ केला. पुरुषपूर (पेशावर) येथे त्याची राजधानी होती. त्याने अनेक विद्वानांना राजाश्रय दिला होता. बौद्ध धर्माचा त्याच्यावर बराच प्रभाव होता. सम्राट अशोकाच्या तिसऱ्या धर्मपरिषदेनंतर कनिष्काने काश्मीरमध्ये कुंडलवन येथे वसुमित्र नावाच्या विद्वानाच्या अध्यक्षतेखाली चौथी बौद्ध धर्मपरिषद भरविली. या परिषदेत महाविभास नावाचा बौद्ध धर्माचा विश्वकोश तयार करण्यात आला होता. सर्वधर्मीय समानता आणि परधर्म सहिष्णुतेचा आदर करणाऱ्या कनिष्काने बौद्ध धर्म स्वीकारला होता. २३ वर्षे राज्य केल्यानंतर इ.स. १०१ मधे कनिष्क मृत्यू पावला. दुसऱ्या शतकात कुशाण राज्याचा ऱ्हास होऊ लागला आणि चवथ्या शतकानंतर कुशाण राज्य संपुष्टात आले. सम्राट चंद्रगुप्त आणि अशोक यांच्या इतकेच कनिष्काचे नाव भारतीय इतिहासात अजरामर आहे.

संदर्भ :

  • कदम, य. ना. समग्र भारताचा इतिहास, कोल्हापूर, २००३.

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा