पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधांत निसर्तःच गवताने आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांत आढळणार्‍या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्ण कटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी २४ % भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत. एकूण गवताळ क्षेत्रापैकी ७१ % क्षेत्र उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेशाने व्यापले आहे. ६ % क्षेत्र पर्वतीय गवताळ प्रदेशाचे आहे. उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश सॅव्हाना (आफ्रिका), लानोज व कँपोज (द. अमेरिका) या नावांनी, तर समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश प्रेअरी (उ. अमेरिका), पँपास (द. अमेरिका), व्हेल्ड (आफ्रिका), स्टेप (यूरेशिया), डाऊन्स (ऑस्ट्रेलिया) व कॅटनबरी (न्यूझीलंड) या नावांनी ओळखले जातात. प्रत्येक गवताळ प्रदेशातील वनस्पतिजीवन व प्राणिजीवन आणि त्यांच्या आंतरक्रिया भिन्न असल्याने प्रत्येक गवताळ प्रदेश ही स्वतंत्र गवताळ भूमी परिसंस्था म्हणून ओळखली जाते.

उष्ण कटिबंधीय गवताळ भूमी परिसंस्था

गवताळ प्रदेश
गवताळ प्रदेश

या परिसंस्था विशेष महत्त्वाच्या आहेत. दोन्ही गोलार्धात साधारण ५ ते २० अक्षांश दरम्यानच्या खंडांतर्गत भागात हा प्रदेश आहे. येथील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ७५ ते १५० सेंमी. आहे. प्रदेश विस्तृत, सपाट, मैदानी किंवा पठारी आहेत. मृदेमध्ये सामावलेली पोषकद्रव्ये व वातावरणीय पर्यावरण या अजैविक घटकांच्या उपलब्धतेनुसार गवत, झुडपे व लहान वृक्ष हे उत्पादक घटक येथे आढळतात.

गवत उंच, मध्यम किंवा खुरटे असते. तसेच ते जाडेभरडे व निकृष्ट असते. अधूनमधून दिसणार्‍या व फुलांनी बहरलेल्या डेरेदार वृक्षांमुळे या प्रदेशाला बागेचे स्वरूप येते. म्हणून त्यास उद्यानभूमी असेही म्हणतात. गवतावर असंख्य कीटक असतात. या कीटकांवर तसेच मृत प्राण्यांच्या मांसावर जगणारे अनेक प्रकारचे पक्षी येथे संचार करीत असतात. मुंग्यांची व वाळवींची अनेक वारुळे आढळतात. सरडे, साप व कीटक यांचे वाळवी हे भक्ष्य असते. वेगवेगळ्या स्वरूपातील सेंद्रिय घटकांचे अपघटन करणारे जीवाणू क्रियाशील आढळतात. या जीवाणूंनी केलेल्या अपघटन क्रियेतून विविध सेंद्रिय व खनिजद्रव्ये पुन्हा मृदेला पुरविली जातात. उत्पादक घटकांना ते अन्न म्हणून उपलब्ध होते. उष्णकटिबंधीय गवताळ भूमी परिसंस्थांमध्ये स्थानपरत्वे भिन्नता आढळते.

रानबैल, रानरेडे, शेळ्या, मेंढ्या, हरिण, ससा, काळवीट, सांबर, झीब्रा, जिराफ, हत्ती, गेंडा, हिप्पोपोटॅमस, विविध प्रकारची माकडे, शहामृग इ. तृणभक्षक प्राणी हे प्राथमिक भक्षक या प्रदेशात आढळतात. तृणभक्षक प्राण्यांची रेलचेल असून ते कळपाने राहतात. जलाशयात सुसरी, मगरी आढळतात. वाघ, सिंह, तरस, चित्ता, लांडगा, कोल्हा, खोकड, मांजर, मुंगूस, बिजू, उंदिर व खार आणि गिधाड, घार, ससाणा व इतर पक्षी, तसेच साप, सरडा व बेडूक हे द्वितीयक भक्षक येथे आढळतात.

समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ भूमी परिसंस्था

या परिसंस्था दोन्ही गोलार्धांत ३० ते ६० अक्षांश दरम्यानच्या खंडांतर्गत भागात आढळतात. येथील सरासरी पर्जन्यमान २५ ते ५० सेंमी. दरम्यान असते. वृक्षांपेक्षा गवत वाढीस नैसर्गिक पर्यावरण योग्य असल्याने गवताळ प्रदेश सामान्यत: वृक्षहीन आहेत. स्थानपरत्वे गवतांच्या प्रकारांत भिन्नता आढळते. गवतावर जगणारे हरिण, काळवीट, गवा, घोडे, गाढव, उंट, शेळ्या, मेंढ्या, शहामृग इ. अनेक प्रकारचे प्राथमिक भक्षक आणि लांडगा, ससा, कोल्हा, बिजू, मुंगीखाऊ हे द्वितीयक भक्षक आढळतात. टोळ, मुंग्या, वाळवी, फुलपाखरे, सुरवंट इ. कीटक मोठ्या संख्येने दिसतात. येथे पशुपालन व्यवसाय महत्त्वाचा आहे. तसेच बरीचशी भूमी लागवडीखाली आणली गेल्याने नैसर्गिक गवताळ भूमी परिसंस्थांमधील अनेक उत्पादक व भक्षक घटकांची संख्या कमी झालेली आहे.

पर्वतीय गवताळ भूमी परिसंस्था

पर्वतीय प्रदेशात विस्तीर्ण पण अनियमित असे गवताळ प्रदेश आढळतात. अक्षांत व उंचीनुसार गवताचे स्वरूप बदलते. त्यानुसार परिसंस्थांमध्ये भिन्नता दिसते.

भारतातील गवताळ भूमी परिसंस्था

भारतातील हवामान व मृदा यांमधील भिन्नतेनुसार वेगवेगळ्या प्रकारच्या गवताळ भूमी परिसंस्था आढळतात. नैऋत्य मान्सून पावसाच्या आगमनाबरोबर गवताला फूट येते. उन्हाळ्यातील शुष्क काळात गवत वाळून जाते. त्यामुळे गवताळ प्रदेशाचे स्वरूप हंगामी असते.

भारतातील बर्‍याचशा गवताळ प्रदेशांचा उपयोग पाळीव पाण्यांसाठी चराऊ कुरण म्हणून केला जात असल्याने नैसर्गिक गवताळ भूमी परिसंस्थांमध्ये बदल झाले आहेत. हिमालयाच्या पायथ्यालगतचा तराई प्रदेश, पश्चिम व मध्य भारतातील तसेच दख्खनच्या पठारावरील निमओसाड प्रदेश, पश्चिम घाटाच्या उतारावरील गवताळ प्रदेश हे गवताळ भूमी परिसंस्थांचे प्रमुख प्रदेश आहेत. महाराष्ट्रात चांदोली, राधानगरी तसेच कारंजा सोहोळ अभयारण्यांत अशा परिसंस्था आहेत.

भूमी उपयोगातील बदल, पाळीव प्राण्यांसाठी गवताळ भूमीचा वापर, अतिगुरचराई, वारंवार लावण्यात येणार्‍या आगी, लागवडीखाली आणलेले क्षेत्र, गवताळ प्रदेशात उद्योगांची उभारणी इ. कारणांमुळे येथील नैसर्गिक गवताळ भूमी परिसंस्थांचा र्‍हास झाला आहे. बरेचसे वन्य प्राणी व पक्षी दुर्मिळ झाले आहेत. गवताळ भूमी परिसंस्थांच्या संधारणासाठी अतिगुरचराई टाळणे, आगींना अटकाव व नियंत्रण, मृदा व जलव्यवस्थापन, अभयारण्ये व राष्ट्रीय उद्यानांची निर्मिती इ. उपाययोजना करता येऊ शकतात.

प्रतिक्रिया व्यक्त करा