घटसर्प हा श्वसनसंस्थेच्या वरच्या भागाला म्हणजे घशाला होणारा तीव्र संसर्गजन्य रोग आहे. कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी या जीवाणूंमुळे हा रोग होतो. या रोगात श्वसनसंस्थेच्या वरच्या भागातील (विशेषकरून, टॉन्सिल आणि घसा यांचे) श्लेष्मपटल वरील जीवाणूंमुळे बाधित होते. काही वेळा त्वचेवाटे किंवा जखमेतून घटसर्पाचे संक्रामण होऊ शकते. हे जीवाणू शरीरात जीवविष निर्माण करतात आणि ते रक्तप्रवाहात मिसळते व शरीरभर पसरते. बाधित व्यक्तीच्या खोकल्यातून अथवा शिंकण्यातून या जीवाणूंचा प्रसार होतो. काही व्यक्ती या जीवाणूंचे वाहक असतात. वाहकांमध्ये कोणतीही लक्षणे दिसत नसली, तरी त्यांच्यापासून इतरांना घटसर्पाची लागण होऊ शकते. १८८३ मध्ये एडव्हीन क्लेप्स याने या जीवाणूंचा शोध लावला; तर फ्रीड्रिख लफ्लर याने जीवाणूंचे सविस्तर वर्णन केले.

कॉरिनेबॅक्टेरियम डिफ्थेरी जीवाणू

घटसर्पाची लागण झाल्यानंतर २ ते ५ दिवसांत रोगाची लक्षणे दिसू लागतात. घसादुखी, ताप आणि मानेच्या भागातील लसीका ग्रंथींना येणारी सूज ही या रोगाची प्राथमिक लक्षणे आहेत. याखेरीज, या रोगामुळे टॉन्सिल आणि घशावर एक जाड व राखाडी पटल तयार होते आणि ते नाक किंवा श्वासनलिका आणि पुढे फुप्फुसापर्यंत वाढू शकते. या पटलामुळे श्वास घ्यायला किंवा अन्न गिळायला अडथळा निर्माण होतो. काही वेळा या पटलामुळे श्वासमार्ग पूर्णपणे बंद होतो आणि मृत्यू ओढवू शकतो.

घटसर्पामुळे निर्माण झालेल्या जीवविषाचा परिणाम हृदय, वृक्क आणि चेतासंस्थेवर होऊ शकतो. चेतातंतूंना हानी पोहोचल्यास घसा आणि डोळ्यांतील स्नायूंना व श्वसनस्नायूंना तात्पुरता पक्षाघात होऊ शकतो. श्वसनस्नायूंचा पक्षाघात जीवघेणा ठरू शकतो.

घटसर्पाच्या एका सौम्य प्रकारात त्वचा बाधित होते आणि त्वचेला भेगा पडतात. या प्रकाराला ‘त्वचा घटसर्प’ असे म्हणतात. या प्रकारात, संसर्ग झालेल्या भागात पटल तयार होत नाही; परंतु जीवविष रक्तप्रवाहात मिसळू शकते. परिणामी, श्वसन संसर्ग झाल्यास जशी गुंतागुंत होते तशीच गुंतागुंत यात होऊ शकते.

घटसर्प बाधित घसा

घटसर्प झालेल्या रुग्णाला सामान्यपणे रुग्णालयात दाखल करून घेतात आणि त्याला घटसर्प प्रतिजीवविष देतात. त्यामुळे घटसर्पाच्या जीवविषाचा प्रभाव कमी होतो. वेळीच उपचार केल्यास, प्रतिजीवविषामुळे होणारी हृदय आणि चेतासंस्थेच्या कार्यात घडू शकणारी गुंतागुंत टाळता येते. घशात तयार होणाऱ्या पटलामुळे श्वसनमार्ग बंद झाला, तर डॉक्टर शस्त्रक्रियेने घशातून नळी घालून श्वसनमार्गाला जोडणारा कृत्रिम श्वसनमार्ग तयार करतात. हृदय कार्यातील बिघाडावर औषधी उपचार करतात. जर श्वसनसंस्थेतील स्नायूंना पक्षाघात झाला, तर कृत्रिम उपकरणांमार्फत श्वसन चालू ठेवतात. घटसर्प झालेल्या रुग्णांना प्रतिजैविके देतात. त्यांच्यामुळे घटसर्पाच्या जीवाणूंचा नाश होतो आणि इतर जीवाणूंमुळे होणारा व्दितीय संसर्ग टाळता येतो.

घटसर्पाविरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होण्यासाठी लस टोचतात. १९२० मध्ये घटसर्पाची लस प्रथमच वापरण्यात आली. लशीमध्ये घटसर्प निर्विषक असून तिच्यामुळे या रोगाला प्रतिबंध करणारी प्रतिद्रव्ये तयार होण्यास सुरुवात होते. मात्र, त्यापासून शरीरातील ऊतींना कोणतीही हानी होत नाही. कारण तयार झालेली प्रतिपिंडे जीवविषावर हल्ला करतात व ती नष्ट करतात.

मातेकडून आलेल्या प्रतिकारशक्तीमुळे बालकांना ६ महिन्यांपर्यंत सहसा घटसर्प होत नाही. ६ महिन्यांनंतर प्रतिकारशक्ती कमी होत जाते आणि घटसर्प होऊ शकतो. म्हणून बालकांना ६ महिन्यांच्या आत घटसर्प, धनुर्वात व डांग्या खोकला यांना प्रतिबंध करू शकणारी त्रिगुणी लस (ट्रिपल डोस) देतात. बालकाला ही लस इंजेक्शनवाटे वयाच्या ६व्या, १०व्या आणि १४व्या आठवडयांत देतात. तसेच या रोगांविरुद्ध प्रतिकारशक्ती टिकून राहावी म्हणून दोन बूस्टर डोस देतात; पहिला डोस १६—१८ महिन्यांच्या कालावधीत, तर दुसरा पाच वर्षांनंतर देतात.

घटसर्प हा जीवघेणा रोग आहे. जगभर या रोगाच्या साथी येत आणि मोठया संख्येने जीवितहानी होत असे. विशेष म्हणजे मृतांमध्ये लहान बालकांची संख्या अधिक असे. हल्ली हा आजार लहान मुले आणि प्रौढ यांना सारख्याच प्रमाणात होताना दिसतो. भारतात १९७४ पासून त्रिगुणी लशीचे उत्पादन होत आहे. १९९९ पासून सिरम इन्स्टिट्यूट, पुणे या संस्थेला या लशीचे सर्वाधिक उत्पादन करणारी संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे. जगभर झालेल्या व्यापक लसीकरणामुळे घटसर्प रोग आटोक्यात आला आहे.