एका जातीचे बदक. हंस आणि बदके या पक्ष्यांचा समावेश ॲनॅटिडी कुलाच्या ज्या टॅडॉर्निनी उपकुलात होतो त्याच उपकुलात या पक्ष्याचा समावेश होतो. याचे शास्त्रीय नाव टॅडॉर्ना फेरुजीनिया आहे. हा स्थलांतर करणारा पक्षी आहे. हा भारतात कायम राहणारा पक्षी नसून दक्षिण रशिया, मध्य आशिया, चीन इत्यादी प्रदेशांतून ऑक्टोबरच्या सुमारास येतो व एप्रिलपर्यंत राहतो. भारतात अगदी दक्षिणेकडील भाग सोडून तो सगळीकडे आढळतो.

चक्रवाक (टॅडॉर्ना फेरुजीनिया)

चक्रवाकाच्या शरीराची लांबी ५८−७० सेंमी. असून पंखविस्तार ११०−१३५ सेंमी. असतो. रंग नारिंगी तपकिरी असतो. डोके आणि मान यांचा रंग अंगाच्या रंगापेक्षा फिकट असतो. पंख पांढरे असून उड्डाणपिसे काळी असतात. नर आणि मादी दिसायला सारखीच दिसतात; परंतु विणीच्या काळात नराच्या मानेच्या तळाला एक काळे कडे दिसते. शेपूट काळे असते. चोच आणि पाय रंगाने काळे असतात.

चक्रवाक उत्तम पोहणारा असला, तरी तो पाण्याच्या काठावरच राहणे पसंत करतो. बऱ्याचदा हा जोडीने तलावाच्या काठी किंवा नदीच्या रेताड किनाऱ्यावर फिरताना दिसतो. समुद्रकिनाऱ्यालगतच्या प्रदेशात तो क्वचितच दिसतो. क्वचित प्रसंगी हिवाळ्यात यांचे मोठे थवेही (सु. ४,०००) दिसून आले आहेत. हा फार हुशार व जागरूक पक्षी आहे. थवा एकत्र राखण्यासाठी आणि संकटाची कल्पना इतरांना देण्यासाठी त्यांचे ओरडणे चालू असते. मोटारीच्या कर्ण्याप्रमाणे हा आवाज काढतो.

हा पक्षी सर्वभक्षी आहे. अन्न शोधण्यासाठी हा रात्री बाहेर पडतो. तो वनस्पतींचे हिरवे कोंब आणि बिया यांबरोबर मृदुकाय आणि कवचधारी प्राणी, पाणकीटक, बेडूक, मासे इत्यादी खातो. त्यांच्या प्रजननाचा काळ एप्रिल-जून असतो. जलाशयाच्या कडेला असलेल्या बिळांमध्ये, मातीच्या ढिगाऱ्यावर किंवा कपाऱ्यांत यांचे घरटे असते. मादी ८−१२ अंडी घालते. अंड्यांचा रंग स्वच्छ पांढरा असतो. अंडी उबविण्याचा कालावधी सु. ३० दिवसांचा असतो.

यूरोप, आशिया आणि आफ्रिका या खंडांतील देशांमध्ये स्थलांतर करणाऱ्या पक्ष्यांच्या संवर्धनासाठी जो करार झालेला आहे, त्यात चक्रवाक पक्ष्याचा समावेश आहे.