ही संज्ञा अमेरिकेच्या स्वातंत्र्य युद्धाला अनुलक्षून आधुनिक इतिहासात प्रविष्ट झाली आहे. क्रांती या शब्दाचा रूढ अर्थ मौलिक परिवर्तन असा आहे. क्रांती हा शब्द राजकीय संदर्भात किंवा राज्येतिहासाच्या संदर्भात अधिकतर वापरला जातो. या संदर्भात सामाजिक परिवर्तनाचे साधन म्हणून शासनपद्धतीत केलेले मौलिक परिवर्तन असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे राजकीय सत्ता हस्तगत करण्याच्या कृतीला क्रांतिकारक युद्ध ही संज्ञा दिली जाते. सुमारे २५०० वर्षांपूर्वी सून झू या तत्त्वज्ञाने क्रांतिकारक युद्धाची संकल्पना प्रथम मांडली. अशा युद्धाची भिस्त शक्तीपेक्षा युक्तीवर, लष्करी सामर्थ्यापेक्षा व्यूहरचनेवर असावी; तसेच राजकारण, अर्थकारण, मुत्सद्देगिरी आणि तंत्रज्ञान इत्यादी बिगरलष्करी मार्गांनी प्रतिस्पर्ध्याला नमवण्याचा प्रयत्न करावा, असे सून झूचे मत होते. त्यानंतर मौर्यकाळात (इ.स.पू. ३२१ ̶ १८५) भारतात कौटिल्य (चाणक्य) याने मांडलेली क्रांतिकारक युद्धाची कल्पना काहीशी याच धर्तीवर होती.

जुनी सामाजिक व राजकीय व्यवस्था संपूर्णत: किंवा अंशत: मोडकळीस येते किंवा राजसत्ता जुलमी होते, तेव्हा क्रांतियुद्धाची परिस्थिती निर्माण होते. सत्ताधारी वर्गाची अकार्यक्षमता व दुर्बलता, आर्थिक पेचप्रसंग, युद्ध, जनतेचे कंगालपणा इत्यादी गोष्टी सामाजिक व राजकीय दुरावस्थेस कारण होतात; जनतेच्या दुस्थितीकडे कानाडोळा करतात आणि न्याय्य तक्रारी करणार्‍या बहुजनांना दडपून टाकतात, तेव्हा समझी व राजकीय स्थिती मोडकळीस आलेली परिस्थितीच क्रांतियुद्धास प्रोत्साहित करते. क्रांतियुद्ध हे बहुधा सशस्त्र उठाव वा युद्ध यांच्या ओघातच घडून येते. त्यासाठी सर्वप्रथम राजकीय सत्ता आपले शोषण करत आहे आणि आपले हक्क हिरावून घेत आहे अशी भावना लोकांच्या मनात प्रकर्षाने जागृत झाली असली पाहिजे. त्याचबरोबर शांततामार्गांचा अवलंब करून परिस्थितीत आपण बदल घडवून आणू शकत नाही आणि त्यासाठी शस्त्रलढ्याचा मार्ग अनुसरण्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नाही, या बाबतीत त्यांची खातरी झाली असली पाहिजे. अशी युद्धे दीर्घ काळ चालू राहतात आणि काही वेळातच त्याला हिंसक स्वरूप प्राप्त होते. या लढ्याचे उद्दिष्ट क्रांतिकारक असणे आणि त्याकरवी राजकीय पद्धतीत आमूलाग्र बदल घडून येणे अपरिहार्य असते. क्रांतिकारक युद्ध प्रामुख्याने देशातील अंतर्गत घटना असते. जर ते अयशस्वी झाले, तर ते राजद्रोह किंवा बंड म्हणून गणले जाते. भारतातील १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध याचे उत्तम उदाहरण होय.

अमेरिकेमध्ये १७७५ ते १७८३ दरम्यान झालेले मुक्तियुद्ध हे क्रांतियुद्धच होते. अमेरिकी क्रांतियुद्ध हे क्रांतिकारक युद्धाचे केवळ एक उदाहरण आहे. १७९२ ते १८०२ दरम्यान घडलेली फ्रेंच राज्यक्रांती हेसुद्धा क्रांतिकारक युद्ध होते. आधुनिक क्रांतिकारक युद्धाचे युग अठराव्या शतकात अमेरिकन राज्यक्रांती व फ्रेंच राज्यक्रांती यांपासून सुरू झाले. या क्रांत्यांचा ध्येयवाद हा विश्वक्रांतीचा ध्येयवाद होता. त्याने माणसात अदम्य आत्मविश्वास उत्पन्न केला आणि विश्वबंधुत्व, समता आणि स्वातंत्र्य ही तीन तत्त्वे उदयास आली. १८४८ मध्ये पॅरिस शहरात लष्कराने निदर्शकांच्या एका जमावावर गोळीबार केल्यानंतर क्रांतीची ठिणगी उडाली. त्यात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा पुढाकार होता. लवकरच ती आग युरोपभर पसरली. फ्रान्सचे नरेश लूई फिलिप यांना ब्रिटनमध्ये आश्रय घ्यावा लागला. ऑस्ट्रियाच्या हेप्सबर्ग साम्राज्याचे राजपुत्र मेतेर्निश देश सोडून पळून गेले. प्रशियाचे राजे फ्रेडेरिक विलियम यांना मोठ्या प्रमाणावर सुधारणा करण्यास प्रजेने भाग पाडले. हंगेरी, झेकोस्लोव्हाकिया आणि ऑस्ट्रिया यांच्या नागरिकांनी बंडाचा झेंडा उभारला; परंतु काही काळातच या लढ्याच्या तीव्रतेला ग्रहण लागले आणि एका वर्षातच ही क्रांती मोडकळीस आली.

१९१७ मधील रशियन क्रांतीदरम्यान राजेशाहीविरुद्ध झालेला शहरी नागरिकांचा उठाव लेनिनच्या बोल्शेविक पक्षामुळे यशस्वी होऊ शकला. त्यापश्चात मार्क्सच्या बरोबरीने लेनिनसुद्धा क्रांतिकारक युद्धाचा प्रणेता म्हणून ओळखला जाऊ लागला. माओ-त्से तुंगने चीनमधील क्रांतिकारक युद्धाकरवी १९४९मध्ये साम्यवादी चीनची स्थापना केली. माओच्या क्रांतियुद्धाची संकल्पना छोट्या शेतकरी वर्गाने उभारलेल्या गनिमी युद्धावर आधारित होती. शेतकरीवर्गाचा पाठिंबा संपादन करणे हे माओचे केवळ लष्करी नव्हे, तर राजकीय उद्दिष्ट होते. शासनाचे पुरस्कर्ते प्रतिगामी आणि साम्राज्यवादी घटक प्रामुख्याने शहरांचे निवासी असल्याने माओंचा जोर खेड्यांतील रहिवाशांवर होता. ‘सत्ता ही केवळ बंदुकीच्या नळीद्वारा मिळवता येईल’, हे माओंचे ब्रीदवाक्य होते. गनिमी युद्धतंत्रावर माओंचा गाढ विश्वास होता. जरी अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध हेच क्रांतिकारक युद्ध अशी सर्वसाधारण धारणा असली, तरी मार्क्स, लेनिन आणि माओ या त्रिमूर्तीलाच क्रांतिकारक युद्धाच्या विधात्यांचे श्रेय दिले गेले पाहिजे.

क्रांतिकारी युद्ध हे यादवी युद्ध असते. एका बाजूला प्रस्थापित सत्तेचे स्वयंरक्षक तथाकथित सनदशीर किंवा कायदेशीर हिंसातंत्र आणि दुसर्‍या बाजूला राजकीय परिवर्तन घडवून आणण्याकरिता असनदशीर व बेकायदा असे मानलेले हिंसातंत्र होय. हे अंतर्गत यादवी युद्ध आंतरराष्ट्रीय युद्ध बनण्याचा धोका असतो. उदाहरणार्थ व्हिएटनाममध्ये दीर्घकाळ चाललेले साम्यवादी क्रांतिकारक युद्ध होय.

क्रांतिकारक युद्धाची पाच प्रमुख परिमाणे आहेत : राजकीय, लष्करी, सामाजिक-आर्थिक, तात्त्विक आणि मनोवैज्ञानिक. सर्वप्रथम राजकीय परिमाण. क्रांतिकारक युद्ध हे प्रामुख्याने काही राजकीय उद्दिष्टे उराशी बाळगून राजकीय नेतृत्वाच्या देखरेखीखाली हाती घेतले जाते. त्याचा लष्करी पैलू महत्त्वाचा असला, तरी नियंत्रण राजकीय नेतृत्वाच्याच हातात असते. लष्करी परिमाण राजकीय परिमाणाचा एक भाग असतो. सबळ शासनशक्तीशी लढा देणे अपरिहार्य असल्याने डावपेच आणि स्थानिक भूभागाच्या घनिष्ठ परिचयावर गनिमी युद्धतंत्राची मदार असते. सामाजिक-आर्थिक परिमाणावर लढ्याचे स्वरूप निर्धारित असते. तात्त्विक परिमाण क्रांतिकारक युद्धाचा मूलाधार असतो. ती ज्यांना मान्य आहे असे अनेक लोक लढ्यात सहभागी होतात. हे अनुमोदक या युद्धाचा कणा असतात. त्या तत्त्वाच्या परिपूर्तीसाठी ते कोणतीही जोखीम पतकरण्यास तयार असतात. सर्वात अखेरीस मनोवैज्ञानिक परिमाण हे क्रांतियुद्धाचे बलवर्धक असते. ते लोकांच्या कल्पनाशक्तीचा ठाव घेऊन त्यांना आगळीच भुरळ पाडते आणि आपल्या स्वार्थाची तमा न बाळगता दीर्घकाळासाठी लढा देण्यास त्यांना प्रवृत्त करते.

संदर्भ :

समीक्षक – सु. र. देशपांडे

प्रतिक्रिया व्यक्त करा