प्राणिसृष्टींतील जास्तीत जास्त जैवविविधता असलेल्या संघांपैकी अपृष्ठवंशी प्राण्यांचा नेमॅथेल्मिंथिस हा एक संघ आहे. त्यातील २८,००० हून अधिक जाती ओळखल्या गेल्या आहेत. यांपैकी सु. १६,००० जाती परजीवी आहेत. प्राणिशास्त्रज्ञांच्या अंदाजानुसार या संघात अजून न ओळखल्या गेलेल्या अशा एकूण ५०,००० जाती असाव्यात. या प्राण्यांचे शरीर लांब, बारीक आणि दंडाकार असते, म्हणून त्यांना गोलकृमी म्हणतात. हे प्राणी त्रिस्तरी, द्विपार्श्च सममित आणि आभासी देहगुहायुक्त असतात. शरीर अखंडित असून त्याभोवती उपचर्म असते. उपचर्म कठिण प्रथिनांनी बनलेले असून त्यावर काटे आणि रोम असतात. काही गोलकृमी सूक्ष्म असतात तर काहींची लांबी सु. एक मीटर असते. हे प्राणी स्वतंत्र राहणारे किंवा अंतःपरजीवी असतात. स्वतंत्र राहणारे प्राणी हे जलवासी किंवा भूचर असू शकतात. जलवासी गोलकृमी गोडे आणि खारे पाणी, सागरी पुळण आणि माती यांत मुक्तपणे वावरतात. उथळ समुद्रात तळाशी बरेच गोलकृमी आढळतात. यांपैकी काही विश्रांती घेताना मातीवर वेडेवाकडे वेटोळे घालतात. भूचर गोलकृमी मातीमध्ये राहतात.
गोलकृमींमध्ये संपूर्ण पचनसंस्था विकसित झालेली असून तोंड आणि गुदद्वार शरीराच्या विरुद्ध टोकाला असतात. या प्राण्यांमध्ये उत्सर्जन नाळ आणि पूर्ववृक्कक यांद्वारे होते. मज्जासंस्थेत एक मज्जावलय आणि अनेक मज्जातंतू असतात. ज्ञानेंद्रिये काही प्रमाणात विकसित झालेली असतात. गोलकृमी एकलिंगी असून बाह्य लक्षणांवरून नर आणि मादी एकमेकांपासून वेगळे ओळखता येतात. मादी नराहून लांब आणि आकारमानाने मोठी असते. नर कृमीचे शरीर एका टोकाला वक्र असते, तर मादी कृमीचे परप टोक सरळ असते. प्रजननसंस्था पूर्ण विकसित असते. जंताची मादी एका दिवशी सु. दोन लाख अंडी घालते. जीवनचक्र एका अथवा दोन पोशिंद्यात पूर्ण होते.
स्वतंत्रपणे राहणारे गोलकृमी शेवाळी, कवके, लहान प्राणी, मृतजीव, विष्ठा, तसेच सजीव ऊतींवर जगतात. सागरी परिसंस्थांमधील पोषकद्रव्यांच्या पुनर्चक्रीकरणात (रिसायकलिंग) त्यांचा मोठा वाटा आहे.
अॅस्कॅरिस (जंत), हूकवर्म (अंकुशकृमी) व फायलेरिया (नारू व हत्तीरोग कृमी) ही माणसाच्या शरीरावरील परजीवी गोलकृमींची ठळक उदाहरणे आहेत. ट्रिकिनेला स्पायरॅलिस या कृमींमुळे उंदीर, डुकरे आणि माणूस यांना ट्रिकिनोसीस या रोगाची लागण होते. हिमाँकस कंटोर्टस या कृमींमुळे मेंढ्यांना संसर्ग होऊन उद्योगाची आर्थिक हानी होते. हृदयकृमी (हार्टवर्म) या गोलकृमींमुळे कुत्रा व मांजर यांच्या हृदय, फुप्फुसे आणि रक्तवाहिन्या यांना संसर्ग होतो. याउलट काही गोलकृमी कीटकांना पछाडतात. अशा गोलकृमी मानवाला हितकारक मानल्या जातात. अनेक गोलकृमी वनस्पतींवर परजीवी आहेत. त्यांच्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. सीनेरॅब्डिटिस एलिगॅन्स हा मातीत राहणारा गोलकृमी जीवशास्त्रीय संशोधनात नमुनेदार सजीव म्हणून उपयुक्त ठरला आहे. या गोलकृमींचा संपूर्ण जीनोम (जनुकीय वृत्त) तयार झाला आहे. तसेच त्याच्या प्रत्येक पेशीचा विकास कसा होतो हे समजले आहे आणि त्याच्या प्रत्येक चेतापेशीचे मानचित्र तयार केले गेले आहे.