तिवाडी, चंदाताई : भारूडाची पंरपरा जोपासणाऱ्या महाराष्ट्रातील लोककलावंत.जन्म पंढरपूर येथे एका मारवाडी कुटुंबात झाला. घरची परिस्थिती तशी बेताची म्हणून त्यांना लौकिक अर्थाने शिक्षण घेता आले नाही. जेमतेम सहावीपर्यंतच शिक्षण त्यांना घेता आले; मात्र सर्व बालपण हे पंढरपूरच्या भक्तिमय लोकजीवनात गेल्याने भक्तीचे हे संस्कार आयुष्यभर सोबत राहिले. आईचे माहेर मोझरी ,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे गाव, त्यामुळे तुकडोजी महाराजांचे राष्ट्रभक्तीचे संस्कार त्यांना आत्मसात करता आले. १९६५ साली त्यांचे पंढरपूरच्या तिवाडी कुटुंबातील जगदीश प्रसाद तिवाडी यांच्या समवेत विवाह झाला. विवाहबध्द झाल्यानंतर चंदाताईंना दोनच वर्षात क्षयरोगाने ग्रासले त्या अवस्थेत त्या सोलापूरच्या नगरेश्वर मंदिरात सात्यत्याने चालणाऱ्या नामसंकीर्तन सोहळ्यात भक्तिभावाने सहभाग घेवू लागल्या.

तिथेच अभंग,गौळण, भारुड अशी भावगीते गाण्याची संधी त्यांना मिळाली. यावेळी बालपणातील संस्कारांनी त्यांनी साथ दिली. या भक्तीगीतांमध्ये स्वतःला गुंतुवून घेवून, पांडुरंगाच्या आशीर्वादाने त्यांनी क्षयरोगावर मात केली. क्षयरोगावर मात करून त्या परमार्थाला लागल्या आणि सामाजिक बंधने झुगारून भारूड परंपरेत स्वतःला झोकून दिले. भारूडाचे पाठांतर करून आणि आपल्या प्रतिभेच्या जोरावर त्याचे सादरीकरण ही खुबी चंदाताईंनी आत्मसात केली. चंदाताईना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आणि दुंडा महाराज देगलूर कर यांचे सानिध्य लाभले. दुंडा महाराजाचा आदर्श घेवून त्यांनी आपल्या भारूड सादरी करणाला सुरूवात केली. प्रवाहाच्या विरोधात उभे राहून संत परंपरेची पताका डोईवर घेऊन सन १९७२ पासून चंदाताई भारूड सादरीकरण करून समाजप्रबोधाचे कार्य करीत आहेत.

१९८१ साली पुणे आकाशवाणी केंद्रातून त्यांना पहिल्यांदा भारूड सादरीकरणाची पहिली संधी मिळाली. पुणे आकाशवाणी केंद्राद्वारे त्या घराघरात पोहचल्या.मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादेमी तत्कालीन संचालक प्रकाश खांडगे यांनी त्यांना नागर रंगभूमीवर सादरीकरणाची संधी दिली. भारूडाचे सादरीकरणाच्या पध्दतीने दोन प्रकार पडतात. एक भजनी भारूड आणि दुसरे सांगी भारूड. चंदाताईची भारूड सादरीकरणाची पध्दती ही सोंगी भारूडाची. भारूड हे जरी काव्य असले तरी त्यात नाटयांग मोठया प्रमाणात दिसून येते.चंदाताईंची वेशभुषा धारण केल्यानंतरची छटा वेगळी असते. त्यातूनच त्या समाजाला परमार्थिक अर्थाचा बोध पटवून देतात. प्रभावी वकृत्व, अभिनय शैली, नृत्याची जोड याआधारे  कधी समाजाला उपदेशाचे  चिमटे काढून तर कधी विनोदातून उपहास करत त्या भारुड सादर करतात. मुंबई-पुण्याचा नागर समाज असो की, सभा, साहित्य, नाटय संमेलने असो, हजारो लोकांना एका जागी खिळवून ठेवण्याची ताकत चंदाबाईंच्या सोंगी भारूडात आहे. त्यांचा संतसाहित्याचा चांगला अभ्यास आहे. त्या संतांनी रचलेल्या पारंपरिक रचनाच साभीनय सादर करत नाहीत, तर एड्स, पल्स पोलीओ, गुटखा, कुटुंब नियोजन, दारूबंदी, स्त्रीभृणहत्या, प्राणीप्रश्न, महीला सबलीकरण राष्ट्रीय  एकात्मता या विषयी आत्मीयतेने  दृष्टांत  देतात. लोककला अकादमी मुंबई येथे त्यांनी  मानद व्याख्याता म्हणून विद्यार्थ्याना लोककला सादरीकरणाचे प्रशिक्षण दिले आहे. नेहरू युवा केंद्र सोलापूर यांचा  सावित्रीबाई फुले पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राज्य पुरस्कार, सखीमय पुरस्कार, भारत सरकारचा संगीत नाटक अकादमी पुरस्कार(२०११), विठाई -जिजाई पुरस्कार पुणे(२०१५)इत्यादी पुरस्कारांनी त्यांना गौरवण्यात आले आहे.

भारूडाद्वारा समाजप्रबोधन करत असताना त्या प्रत्यक्ष समाज कार्यातही व्यस्त असतात. त्यांनी  पुढाकार घेऊन पंढरपूरनजीक गोपाळपूर येथे खडकाळ माळरानावर तळागाळातील दीडशे गरजूंना वीज-पाणी आदी सोयींसकट घरे बांधून दिली. या वस्तीतील  मुलाबाळांच्या शिक्षणासाठी गोपालपुर येथे श्रीगोपालकृष्ण माध्यमिक विद्यालय सुरू केले. या शाळेत औपचारिक शिक्षणाबरोबरच ज्ञानेश्वरीचे पारायणही करवून घेतले जाते. त्यांच्या वयाच्या एकाहत्तर वर्षीही त्यांचे प्रबोधनाचे आणि समाजकार्याचे काम चालू आहे.

समीक्षक – अशोक इंगळे

प्रतिक्रिया व्यक्त करा