एंगेल, एर्न्स्ट (Engel, Ernst) : (२६ मार्च १८२१ – ८ डिसेंबर १८९६). जर्मन संख्याशास्त्रज्ञ व अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म ड्रेझ्डेन येथे झाला. त्यांचे शिक्षण खाणकाम आणि तंत्रज्ञान (माइनिंग अँड टेक्नॉलॉजी)मध्ये फ्रीबर्ग विद्यापीठ, सॅक्सनी येथे झाले. तसेच त्यांनी जर्मनी आणि फ्रान्स येथेही शिक्षणासाठी प्रवास केला.

एंगेल यांनी ‘इंटरनॅशनल स्टॅटिस्टिकल इन्स्टिट्यूट’ या संस्थेची स्थापना केली. त्यांनी काही वर्षे बेल्जियममध्ये घालवून नंतर ते जर्मनीला परतले आणि १८५४ ते १८५८ या काळात सॅक्सनी व १८६० ते १८८२ या काळात बर्लिन येथील ‘प्रशियन सांख्यिकी विभागा’मध्ये त्यांनी संचालक म्हणून काम केले. वेगवेगळ्या देशांतील कौटुंबिक अंदाजपत्रकांचा अभ्यास करून एंगेल यांनी ग्राहकांच्या वागणुकीबद्दलचे सांख्यिकीय आधारावर काढलेले निष्कर्ष अर्थशास्त्राच्या क्षेत्रात सर्वमान्य झाले आहेत. ‘कुटुंबाचे उत्पन्न वाढले, तर कुटंबाचा वेगवेगळ्या बाबींवरील खर्च सारख्याच प्रमाणात न वाढता, अन्नावरील खर्चाचे शेकडा प्रमाण कमी होते आणि सुखसोयी व चैनीच्या वस्तू यांवरील खर्चाचे शेकडा प्रमाण वाढते’, हा महत्त्वाचा निष्कर्ष ‘एंगेलचा कुटुंबखर्चाविषयीचा नियम’ म्हणून ओळखला जातो. तो ‘एंगेल्स सिद्धांत’ म्हणून प्रसिद्ध असून आर्थिक पाहणीवर आधारलेल्या अर्थशास्त्रातील पहिला परिमाणात्मक नियम म्हणून त्यास महत्त्व आहे.

एंगेल यांनी मागणीवर प्राप्तीतील वाढीच्या होणाऱ्या परिणामाच्या अनुषंगाने सर्वसाधारण उत्पादकतेत वाढ होण्यासाठी, लोकांचा ओघ कृषीकडून निर्मितिउद्योगाकडे वळणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन केले. अतिरिक्त लोकसंख्येविषयीची मॅल्थसची भीती फोल आहे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यांनी मुख्यतः सांख्यिकी विषयावर ग्रंथ लिहिले असून कर, विमा, उद्योग, बँकिंग यांसारख्या विषयांवरही स्फुट लेखन केले आहे.

एंगल यांचे वयाच्या पंच्याहत्तराव्या वर्षी ड्रेझ्डेनच्या राडेबॉइल या उपनगरात निधन झाले..

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा