एजवर्थ, फ्रान्सिस इसीड्रो (Edgeworth, Francis Ysidro) : (८ फेब्रुवारी १८४५ – १३ फेब्रुवारी १९२६). प्रसिद्ध अँग्लो-आयरिश तत्त्वज्ञ आणि राजकीय अर्थशास्त्रज्ञ. त्यांचा जन्म एजवर्थ्सटाउन, आयर्लंड येथे श्रीमंत जमीनदार कुटुंबात झाला. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण कोणत्याही शाळेत प्रवेश न घेता खाजगी शिकवणीतून झाले. त्यानंतर त्यांनी ट्रिनीटी कॉलेज, डब्लिन येथून प्राचिन व आधुनिक भाषांचा अभ्यास केला. ते  बॅलिऑल कॉलेज, ऑक्सफर्ड येथेही शिकले. विद्यापीठीय शिक्षणानंतर त्यांनी गणित व अर्थशास्त्र या विषयांचा अभ्यास केला. १८७७ मध्ये ते वकील झाले आणि लंडनमध्ये काही वर्षे वकिली केली. त्यानंतर ते १८८८ मध्ये किंग्ज कॉलेज, ऑक्सफर्ड या ठिकाणी प्रथम तर्कशास्त्र व नंतर अर्थशास्त्र विषयांचे अध्यापन केले. १८९१ मध्ये ड्रमाँड प्रोफेसर आणि ऑल सोल्स कॉलेजचा अधिछात्र म्हणून नियुक्ती झाल्यावर अविवाहित एजवर्थ यांनी उर्वरित आयुष्य त्याच कॉलेजमध्ये काढले. १८९१ मध्ये सुरू झालेल्या द इकॉनॉमिक जर्नल या नियतकालीकाचे संपादकपद त्यांनी आयुष्याच्या अखेरपर्यंत भूषविले.

एजवर्थ यांनी १८८०च्या दशकात सांख्यिकीय पद्धतीमध्ये मोलाचे योगदान दिले. गणिताधिष्ठित अर्थशास्त्र विकसित करण्यास एजवर्थ यांनी बराच हातभार लावला. त्यांना समतुष्टी वक्रतंत्राचा प्रणेता समजले जाते. त्यांनी करभार व मक्तेदारी यांसंबंधीचे विवेचन गणितीय पद्धतीने मांडले व द्वयाधिकार पद्धतीवर नवा प्रकाश टाकला. सीमांत फल व सरासरी फल या दोन कल्पनांच्या अनुरोधाने त्यांनी उत्पादन फल सिद्धांताविषयी केलेले विश्लेषण, ही त्यांची अर्थशास्त्राला एक महत्त्वाची देणगी समजली जाते.

एजवर्थ यांनी १८९७ मध्ये कर आकारणीबाबतचा सर्वेक्षण प्रकाशित करून आपल्या कर विरोधाभासाबद्दल परिचय करून दिला. त्यांनी १९११ च्या ब्रिटानिका एनसायक्लोपीडिया या आवृत्तीमध्ये संभाव्यतेवर लेख लिहिला. ते १९१२ ते १९१४ या काळात रॉयल स्टॅटॅस्टिकल सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष, तर ब्रिटिश सायन्सेस असोसिएशन या समितीवर सचिव होते. पहिले महायुद्ध सुरू असताना त्यांनी युद्ध अर्थव्यवस्थेवर लेखन केले.

एजवर्थ यांनी पुढील ग्रंथ लिहिले : न्यू अँड ओल्ड मेथड्स ऑफ इथिक्स (१८७७); मॅथेमॅटिकल सायकिक्स (१८८१); द कॉस्ट ऑफ वॉर अँड वेज ऑफ रिड्यूसिंग इट सजेस्टेड बाय इकॉनॉमिक थिअरी (१९१५); करन्सी अँड फायनॅन्स इन टाईम ऑफ वॉर (१९१७); ए लेवी ऑन कॅपिटॉल फॉर द डिस्चार्ज ऑफ डेप्थ (१९१९); पेपर्स रिलेटिंग टू पोलिटिकल इकॉनॉमी (१९२५) इत्यादी.

एजवर्थ यांचे ऑक्सफर्ड येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Bowley, Arthur L., F. Y. Edgeworth’s Contributions to Mathematical Statistics, London, 1928.
  • Keynes, John Maynard, Essays in Biography, New York, 1963.

समीक्षक – संतोष ग्या. गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा

Close Menu
Skip to content