अल्पकालिन उन्हाळा व दीर्घकाळ हिवाळा किंवा तापमान कमी असलेल्या प्रदेशातील परिसंस्था. या परिसंस्थेत पाणी या घटकापेक्षा तापमान हा घटक प्रभावशाली असतो. यामुळे वनस्पतींची वाढ खुंटलेली असते. यामध्ये विशिष्ट प्रकारच्या वनस्पती आणि हवामान यांचे प्राबल्य असते. त्यामुळे या परिसंस्थेचा उल्लेख ‘टंड्रा जीवसंहती’ असाही केला जातो. भूपृष्ठाचा दहावा हिस्सा टंड्रा प्रदेशाने व्यापलेला आहे. टंड्रा परिसंस्थेचे सामान्यपणे तीन प्रकार आहेत : आर्क्टिक टंड्रा, अंटार्क्टिक टंड्रा, अल्पाइन टंड्रा. जैविक क्रियांना पुरेसे तापमान वाढत नसल्याने टंड्रातील वनस्पती, प्राणी व लोकसंख्या मर्यादित असते. टंड्रा परिसंस्थेत खुरटी झुडपे, गवते, यकृतका (लिव्हरवर्ट), हरिता (मॉस) आणि दगडफूल (लायकेन) वनस्पती असतात. काही टंड्रा परिसंस्थेत वृक्ष विखुरलेल्या अवस्थेत वाढलेले दिसतात. टंड्रा आणि त्या नजिकच्या वनांमधील सीमारेषेला ‘वृक्षरेषा किंवा तरुरेषा’ म्हणतात.

आर्क्टिक टंड्रा : हा प्रदेश उत्तर ध्रुवाजवळील तैगा प्रदेशात आहे. या प्रदेशातील भूमी वर्षभर गोठलेली असते. म्हणून या भूमीला नित्यगोठीत भूमी म्हणतात. या भूमीत उत्तर रशिया आणि कॅनडा या देशांतील मोठ्या प्रदेशाचा समावेश होतो. या प्रदेशात वृक्षांची वाढ होणे जवळजवळ अशक्य असते. येथील उघड्या व खडकाळ भूमीवर हरिता आणि दगडफूल यांसारख्या वनस्पती वाढतात. या ठिकाणी फक्त हिवाळा आणि उन्हाळा हे मुख्य ऋतू असतात. हिवाळ्यात या प्रदेशात तीव्र थंडी आणि काळोख असून या काळात तापमान २८ से. असते. काही वेळा ते ५० से.पर्यंत खाली उतरते. उन्हाळ्यात येथील तापमान थोडेसे वाढते. त्यामुळे बर्फाचा वरचा थर वितळतो आणि जमिनीवर दलदल व डबकी तयार होऊन पाण्याचे प्रवाह वाहतात.

आर्क्टिक टंड्रा प्रदेशात जैवविविधता कमी आहे. येथे सु. १,७०० संवहनी वनस्पती आणि केवळ ४८ जातीचे सस्तन प्राणी आहेत. याखेरीज लाखो पक्षी या प्रदेशात स्थलांतर करीत असतात. हिमघुबड, कॅरिबू (रेनडियर), कस्तुरी बैल, हिमससे, हिमखोकड आणि ध्रुवीय अस्वले टंड्रा प्रदेशात लक्षणीय संख्येने आढळतात. या प्रदेशात एस्किमो (इन्युइट) या मुख्य रहिवाशांशिवाय लॅप, सॅमॉइड, तुंगू, येकूस्त, गिल्याक इ. जमातींचे लोक असून रेनडियरचे कळप पाळणे, शिकार करणे व मासेमारी करणे हे त्यांचे व्यवसाय आहेत. या भागात तेल आणि युरेनियमचे साठे असले तरी येथील खडतर वातावरणामुळे मानवी कृतींचा अभाव आहे.

आर्क्टिक टंड्रा मृदेत काही प्रमाणात ऱ्हास पावलेल्या वनस्पतींचे अवशेष (पिट) असतात. हे अवशेष कार्बन आणि मिथेनचे स्रोत आहेत. जेव्हा या भूमीवरील बर्फ वितळू लागतो तेव्हा कार्बन डाय-ऑक्साइड आणि मिथेन हे वायू मुक्त होतात. हे दोन्ही हरितगृह वायू असल्यामुळे पृथ्वीच्या तापमानात (पहा: जागतिक तापन) भर पडत असते.

अंटार्क्टिक टंड्रा : हा प्रदेश प्रामुख्याने अंटार्क्टिका खंडावर आढळतो. या खंडावरील बहुतेक भूमी हिमाच्छादित असते. मात्र अंटार्क्टिकाच्या उत्तरेकडील खडकाळ प्रदेशात काही वनस्पती वाढलेल्या दिसतात. या प्रदेशात ३००-४०० जातींची दगडफुले, सु. १०० हरिता, सु. २५ यकृतका आणि सु. ७०० जलीय शैवाले वाढलेले आढळतात. तसेच येथे अंटार्क्टिका हेअर ग्रास आणि अंटार्क्टिक पर्लवोर्ट या सपुष्प वनस्पती वाढतात.

इतर खंडांपासून अंटार्क्टिका खंड अलग असल्यामुळे या खंडावर सस्तन प्राणी कमी आढळतात. त्यांपैकी सील हे समुद्रकिनारी आढळतात. मांजरे आणि ससे अंटार्क्टिकालगतच्या बेटांवर सोडल्यामुळे तेथे आढळतात. नेमॅटोसेरस डायनेमम आणि नेमॅटोसेरस सल्कॅटम या ऑर्किडच्या जाती, रॉयल पेंग्विन आणि अँटिपोडियन अल्बाट्रॉस हे मूळचे येथील आहेत.

अल्पाइन टंड्रा : हा प्रदेश जगभरातील पर्वतरांगांमध्ये अतिउंच प्रदेशात आढळतो. या प्रदेशात वृक्ष नाहीत कारण अतिउंच प्रदेशातील हवामान आणि मृदा वृक्षाच्या वाढीसाठी पोषक नसते. येथील भूमी नित्यगोठित भूमी नसते. आर्क्टिक मृदेशी तुलना करता येथील मृदेतून पाण्याचा निचरा सहज होतो. येथील भूमीत अत्यंत खुज्या वनस्पती वाढतात. हवेच्या कमी दाबामुळे अल्पाइन टंड्राचे हवामान थंड असते.

टंड्रा प्रदेशात मानवी आर्थिक कृती अभावाने घडतात. जीवाश्म इंधने आणि धातुके यांचे स्रोत अधूनमधून टंड्रामध्ये मिळतात. मात्र आधुनिक काळातही हे स्रोत मिळविणे आणि दुसऱ्या ठिकाणी वाहून नेणे अद्याप शक्य झालेले नाही.