स्तनी वर्गामधील कुरतडणारे प्राणी म्हणजे कृंतक हा एक गण (रोडेंशिया) आहे. हे प्राणी कोणताही पदार्थ खाताना इतर प्राण्यांप्रमाणे दातांनी तोडून व चावून न खाता तो कुरतडतात. या गणामध्ये पुष्कळ कुले व २,२०० हून अधिक जाती आहेत. जातींच्या संख्येच्या दृष्टीने स्तनी वर्गात हा सर्वांत मोठी गण आहे. इ.स. २,००० नंतर कृंतकांच्या २० हून अधिक नवीन जाती शोधल्या गेल्या आहेत. उडती खार, तीन पट्ट्यांची खार, पाच पट्ट्यांची खार, चानी, राक्षसी खार, सायाळ (साळ), उंदीर, घुशी व जरबिल ही कुरतडणार्‍या प्राण्यांची उदाहरणे होत. बर्‍याच परिसंस्थांमध्ये कुरतडणारे प्राणी त्यांच्या जलद प्रजननक्षमतेमुळे आणि अनेक भक्षकांचे भक्ष्य असल्यामुळे महत्त्वाचे असतात. शिवाय ते बीजप्रसारक आणि रोगवाहकही असतात.

सर्वसामान्यपणे हे प्राणी आकारमानाने लहान असले; तरी ते संख्येने जास्त, उपद्रवी आणि उपयुक्तदेखील असतात. काही प्राणी जमिनीवर, तर काही जमिनीच्या खाली बिळे करून राहतात. काही झाडावर तर काही पाण्यात राहतात. या गणातील प्राणी सर्वत्र मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. त्यांची वीणही मोठ्या प्रमाणावर होते. एका वेळेस अनेक पिले जन्माला घातली जातात. त्यामुळे त्यांची संख्या सतत वाढतच राहते. त्यांच्या अंगी चपळता असते. ते नेहमी लपूनछपून राहतात आणि सदैव जागरूक असतात. बरेच कुरतडणारे प्राणी झुडपे व गवत यांची मुळे खाऊन राहत असल्यामुळे झुडपांच्या तसेच गवताच्या वाढीला आळा बसतो. सर्व सस्तन प्राण्यांच्या तुलनेत हे प्राणी मनुष्याच्या जवळपास जास्त प्रमाणात वावरणारे आहेत.

या गणातील सर्व प्राणी शाकाहारी आहेत. एका विशिष्ट पद्धतीने खाद्य खाण्याची यांची सवय असते. हे प्रथम आपल्या पुढील पटाशीच्या दातांनी खाद्य कुरतडतात. त्यांचे पटाशीचे दात खूप धारदार असतात. दोन व खालच्या जबड्यात दोन वरच्या जबड्यात असे एकंदर पटाशीचे चार दात असतात. हे दात जबड्याच्या हाडांमध्ये घट्ट बसलेले असतात. त्यांचे दात दंतीन नावाच्या पदार्थाने बनलेले असून त्यावर एनॅमल या कठीण पदार्थाचे आवरण असते. दाताचा रंग पिवळा असतो. हे दात केव्हाही पडत नाहीत. ते नेहमी धारदार राखले जातात. थोडी झीज झाली तरी या दातांची झीज लवकर भरून येते. इतर प्राण्यांमध्ये पटाशीच्या दातांनंतर आतील बाजूस असणारे सुळे आणि उपदाढा या गटातील प्राण्यांना नसतात. या ठिकाणी दोन्ही जबड्यांत दोन्ही बाजूंना मोकळी जागा असून नंतर दाढा असतात. पटाशीचे दात व दाढा यांमध्ये मोकळी जागा असल्यामुळे गालाचा तो भाग आत ओढळा गेलेला असतो. त्यामुळे तोंडात दोन पोकळ्या असतात. या पोकळीला दंतावकाश म्हणतात. अन्न भरभर तोंडात घेऊन ते या पोकळ्यांत साठवून ठेवतात. गालाच्या आतील बाजूने काट्यासारखा खरखरीत भाग असतो. पटाशीच्या दातांनी कुरतडून तोडलेले अन्न या खरखरीत भागातून गाळले जाते. नंतर दाढा त्या अन्नाचे चर्वण करतात. वरच्या जबड्यात सहा व खालच्या जबड्यात सहा, अशा मिळून बारा दाढा असतात. या प्राण्यांचे पुढील पाय मागील पायांच्या तुलनेत आखूड असतात. पुढील पायांत अन्नपदार्थ धरून खाण्यात हे प्राणी तरबेज असतात.

या गणातील उंदीर पिकांची व अन्नधान्यांची अमाप नासाडी करतात. उंदरांमुळे प्लेगचा फैलाव होतो. तसेच उंदराच्या चाव्यामुळे ताप येतो. हा ताप दीर्घ मुदतीपर्यंत राहतो. उंदरांमुळे पिसाळ रोग, अन्नविषबाधा, टायफस ज्वर व घोड्यांना इन्फ्ल्यूएंझा असे रोग होतात.

जीवशास्त्रात संशोधनासाठी काळे आणि पांढरे उंदीर वापरतात. आफ्रिकन पिसी उंदीर कुरतडणार्‍या प्राण्यांत आकारमानाने सर्वांत लहान समजले जातात. त्यांची लांबी जेमतेम ६ सेंमी., तर वजन ७ ग्रॅ. असते. याउलट सर्वांत मोठ्या आकारमानाचा कुरतडणारा प्राणी हा दक्षिण अमेरिकेतील कॅपिबारा हा होय. याची लांबी सु. १.२ मी., तर वजन सु. ६५ किग्रॅ. असते.