ज्या क्रियेमध्ये वायू, द्रव किंवा घन पदार्थाचे दुसऱ्या द्रव किंवा घन पदार्थाकडून शोषण होते, त्या क्रियेला अभिशोषण असे म्हणतात.

ज्या पदार्थाद्वारे अभिशोषण केले जाते त्याला शोषक (absorbent) असे म्हणतात. ही अधिशोषणाप्रमाणे पृष्ठीय संकल्पना नाही. या क्रियेत शोषक दुसऱ्या पदार्थाचे सात्मीकरण (assimilation) करतो म्हणजेच शोषकामध्ये बाहेरील पदार्थाचा शिरकाव होतो.

 

गुणधर्म :  (१) अभिशोषण ही ऊष्मादायी (endothermic) क्रिया आहे. (२) या क्रियेचा वेग स्थिर (uniform) असतो. (३) शोषित पदार्थाची संहती (concentration) दोन्ही माध्यमांमध्ये समान असते.

आ. १. द्रव पदार्थाद्वारे वायूचे अभिशोषण.

 

 

प्रकार : (१) भौतिक अभिशोषण :

द्रव पदार्थाद्वारे वायूचे अभिशोषण  : द्रव माध्यमातून वायू जाऊ दिला असता द्रव पदार्थ वायूचे अभिशोषण करतो. अभिशोषणाचा वेग हा वायूच्या

द्रवीभूत होण्याच्या गुणधर्मावर अवलंबून असतो. तसेच दोन माध्यमांमधील उपलब्ध आंतरपृष्ठ (interface) आणि अभिशोषणाचा कालावधी यांवरही अभिशोषणाचा वेग अवलंबून असतो.

उदा., (अ) धबधब्याच्या पाण्यामध्ये मिसळणारा ऑक्सिजन (यामध्ये पाणी हे शोषक आहे तर ऑक्सिजन हा शोषित वायू आहे).

 

आ. २. घन पदार्थाद्वारे द्रवाचे अभिशोषण.

 

 

घन पदार्थाद्वारे द्रवाचे अभिशोषण  : यामध्ये द्रव पदार्थ घन पदार्थामध्ये अभिशोषित होतो.

उदा., (अ) पाण्याने भरलेले मातीचे भांडे काही प्रमाणात पाण्याचे अभिशोषण करते (यामध्ये माती हे शोषक आहे तर पाणी हा शोषित द्रव आहे).

 

 

 

 

(२) रासायनिक अभिशोषण : (अ) अमोनिया वायू (NH3) पाण्याच्या (H2O) संपर्कात आला असता अमोनियम हायड्रॉक्साइडचा (NH4OH) विद्राव तयार होतो. (यामध्ये पाणी हे शोषक आहे तर अमोनिया हा शोषित वायू आहे). (आ) निर्जल कॅल्शियम क्लोराइड (CaCl2) हवेतील आर्द्रता शोषून घेते.

 

नर्न्स्ट नियम : जर दोन माध्यमांमध्ये अभिशोषण क्रिया होत असेल तर विद्रुताची (solute) संहती ही दोन्ही माध्यमांमध्ये सारखीच असते. नर्न्स्ट समीकरण पुढीलप्रमाणे,

X1/X2 = K

यामध्ये X1 = माध्यममधील विद्रुताची संहती, X2 = माध्यममधील विद्रुताची संहती, K= स्थिरांक.

समीक्षक – भालचंद्र भणगे

प्रतिक्रिया व्यक्त करा