अबुल फैजी : ( ? १५४७ – ५ ऑक्टोबर १५९५). फार्सी भाषेत रचना करणारा भारतीय कवी व विद्वान. अकबराच्या दरबारातील अबुल फज्ल हा त्याचा मोठा भाऊ. फैजीचा (अन्य पर्याय : फैज, फय्याजी) जन्म आग्य्रास झाला. वीस वर्षांचा असतानाच कवी म्हणून त्याची कीर्ती झाली व अकबराने त्यास राजकवी म्हणून आपल्या दरबारात नियुक्त केले. वयाच्या तिसाव्या वर्षी ‘मलिक-उश्-शुअरा’ (कविराज) असा बहुमान त्याला मिळाला. अबुल फज्ल व अबुल फैजी या दोघा बंधूंनी अकबराचे ध्येयधोरण उचलून धरले आणि त्याचा प्रचार केला. फैजीने १५७९ मध्ये अकबरासाठी पद्यमय ‘खुतबा’तयार केला. अकबरनामा ग्रंथात तो अकबराच्या तीन मुलांचा शिक्षक होता असे म्हटलेले आहे. आग्रा येथे तो मरण पावला.

अमीर खुसरौनंतरचा एक थोर भारतीय फार्सी कवी व विद्वान म्हणून त्याचा गौरवपूर्ण उल्लेख करण्यात येतो. अरबी, फार्सी व संस्कृत भाषासाहित्याचा त्याचा चांगला व्यासंग होता. तसेच इतिहास, वैद्यक, गणितशास्त्र, छंदशास्त्र इ. विषयही त्याला चांगले अवगत होते. विविध विषयांवरील त्याचा ग्रंथसंग्रहही फार मोठा  होता. त्याने एकूण १०१ ग्रंथ लिहिल्याचे (एकूण ५०,००० कविता) सांगितले जाते; तथापि त्याची सर्व ग्रंथरचना आज तरी उपलब्ध नाही. त्याचे उपलब्ध ग्रंथ पुढीलप्रमाणे होत : सवातीअ-उल्-इल्‌हाम (कुराणावरील अरबी टीका) लीलावती (गणितशास्त्रीय संस्कृतग्रंथाचा अनुवाद) नल-दमन (नलदमयंतीकथेचा अनुवाद) आणि मर्कज-इ-अद्‌वार ही मस्‍नवी (खंडकाव्य). त्याचे हे ग्रंथ छापील स्वरूपात उपलब्ध आहेत. हस्तलिखित स्वरूपात उपलब्ध असलेल्या त्याच्या ग्रंथांत, जफरनामा-इ-अहमदाबाद (अकबराच्या अहमदाबाद-विजयावरील मस्‍नवी) शरीकुल्म- अरिफत (वेदांवरील भाष्य) महाभारत (दुसऱ्या पर्वाचा अनुवाद) आणि लतीफ-इ-फय्याजी (पत्रसंग्रह) यांचा अंतर्भाव होतो.

प्रतिक्रिया व्यक्त करा