कोळी व जाळे

कोळी हा संधिपाद संघातील अ‍ॅरॅक्निडा वर्गाच्या अ‍ॅरेनीइडा या गणात समाविष्ट असलेला आणि रेशमासारखा धागा तयार करणारा एक अष्टपाद प्राणी आहे. जगात कोळ्यांच्या सु. ६०,००० ज्ञात जाती आहेत. प्रामुख्याने हे भूचर असले तरी त्यांच्या काही जाती सागरकिनारी पाण्यालगत आणि यूरोपिअन पाणकोळी ही जात गोड्या पाण्यातही आढळते. प्रामुख्याने कीटक भक्ष्य मिळू शकतात, अशा सर्व ठिकाणी कोळी आढळतात. वनात, शेतीच्या क्षेत्रात, घरात, वाळवंटात, दलदलीच्या प्रदेशात, उंच पर्वतावर, खोल खाणींमध्ये आणि अंधार्‍या गुफांमध्येही कोळी आढळतात. कोळी अन्नाशिवाय पुष्कळ दिवस जगू शकतात. त्यांना आपल्या शरीरात पुष्कळ अन्न साठवून ठेवता येते. काही कोळी टाचणीच्या डोक्याइतके लहान असतात, तर दक्षिण अमेरिकेतील टॅरांटुला जातीचे काही कोळी पाय पसरले असता २५ सेंमी. इतके मोठे असतात. कोळी बहुधा करड्या, तपकिरी अगर काळ्या रंगाचे असतात, पण काही कोळी फुलपाखरांप्रमाणे आकर्षक रंगांचे सुद्धा असतात. बहुतेकांचे शरीर केसाळ असते. हे केस आखूड आणि अतिशय संवेदी असतात.

मुखांगे आणि पाय सोडता कोळ्याचे मुख्य शरीर चपटे, लांबट अथवा लंबगोलाकार असते. ते डोके आणि छाती यांच्या एकत्रीकरणाने बनलेले शिरोवक्ष आणि त्याला अरुंद कमरेने जोडलेले उदर अशा भागांनी बनलेले असते. शिरोवक्षाच्या पुढील भागात वरच्या बाजूला डोळे असतात. त्यांची संख्या जातींनुसार दोनपासून आठपर्यंत असू शकते. अंधार्‍या गुफांत राहणार्‍या कोळ्यांना डोळे नसतात. भक्ष्यांवर झडप मारून त्यांची शिकार करणार्‍या कोळ्यांना कमी अंतरावरच्या वस्तू फार चांगल्या दिसतात. त्यांना पायाच्या चार जोड्या असतात.

कोळ्याचे तोंड शिरोवक्षाच्या पुढील भागात खालच्या बाजूला असते. त्याच्या बाजूला नखरिका आणि पादमृश अशा मुखांगांच्या दोन जोड्या असतात. नखरिका दोन खंडांच्या बनलेल्या असतात. टोकाकडचा खंड नांगीसारखा लांबट, टणक पोकळ आणि टोकदार असून तो मागे वळलेला असतो. याला विषग्रंथी जोडलेली असते. याच्या साह्याने कोळी अतिशय चपळाईने आपल्या भक्ष्याला दंश करू शकतो. यामुळे भक्ष्य तात्काळ मरते अथवा बेशुद्ध होते. पादमृश सहा खंडांनी बनलेल्या आणि अधिक लांब असतात. त्यांच्या तळाच्या खंडावर आतील बाजूला टणक काटे असतात. यांच्या साह्याने कोळी आपले भक्ष्य चिरडून त्यातील रस काढू शकतो. तो फक्त असा रसच पितो. तो घनरूप अन्न खात नाही. सामान्यत: कीटक हेच कोळ्यांचे भक्ष्य असतात. पण काही मोठ्या आकाराचे कोळी लहान सर्पांना पक्ष्यांना आणि सस्तन प्राण्यांनाही पकडून खाऊ शकतात.

कोळ्यांची श्वसनेंद्रिये म्हणजे उदरात असलेली पुस्तक-फुप्फुसांची एक जोडी आणि शरीरभर पसरलेले वायुनलिकांचे जाळे असते. यात हवा भरून घेण्यासाठी उदर भागातच दोन उभट श्वसनरंध्रेही असतात. कोळ्याच्या रक्तामध्ये रक्तारुण (हीमोग्लोबिन) नसल्यामुळे ते रंगहीन असते. पाण्यात राहणारे कोळी आपल्या तंतूंच्या घरट्यात हवेचा बुडबुडा साठवून ठेवतात आणि त्या हवेवर दीर्घकाळ श्वसन करीत राहतात.

कोळ्यांच्या उदरभागाच्या पश्चटोकाला असलेल्या ग्रंथींमधून स्रवणार्‍या रेशमासारख्या पदार्थांचे धागे हे त्यांचे खास वैशिष्ट्य आहे. या धाग्यांचा वापर करून कित्येक कोळी भक्ष्य पकडण्यासाठी जाळी तयार करतात. पश्चिमघाट परिसरात आढळणार्‍या जायंट वुल्फ स्पायडर या कोळ्याचे जाळे ३-४ मी. लांबीचे असते. सिग्नेचर स्पायडरचे जाळे अतिशय सुंदर असते. झाडावरील काही कोळी आपल्या जवळून जात असलेल्या भक्ष्यावर आपले जाळे फेकून त्यास पकडतात. काही कोळी जमिनीखाली बिळात राहतात आणि त्यांचे जाळे बिळाच्या तोंडाशी नरसाळ्यासारखे लावलेले असते. जाळ्यावर कोणी कीटक अडखळला, की तात्काळ आतला कोळी येऊन त्यास दंश करून बिळात घेऊन जातो. जाळ्यातील अरीय तंतू चिकट नसतात. समकेंद्री तंतू मात्र चिकट असतात. कोळी स्वत: नेहमी अरीय तंतूंवरूनच चालतो, म्हणूनच तो स्वत: कधी जाळ्यात अडकत नाही. कोळ्यांच्या माद्या अंडी घालण्यासाठी तंतूंचे कोश तयार करतात.

नर कोळी आकाराने मादीपेक्षा लहान असतो. पूर्ण वाढलेला नर आपले शुक्राणू पादमृशाच्या शेवटच्या खंडावरील फुगवट्यातील नागमोडी नलिकेत साठवून ठेवतात. त्यानंतर ते विविध प्रकारे प्रणयाराधन करतात. काही जातींमधील नर जाळ्याच्या तंतूंमध्ये कंपने निर्माण करून मादीचा अनुनय करतात. काही आपले आकर्षक रंग दाखवून मादीला आकृष्ट करतात. अन्य काही मादीला आपण केलेली शिकार देऊन खूष करतात. प्रौढ नराच्या पादमृशाच्या शेवटच्या खंडावर त्याच्या प्रजनन संस्थेशी संबंधित एक इंद्रियप्रवेशी अंग असते. अत्यंत सावधपणे तिच्याजवळ जाऊन नर आपल्या पादमृशावरील खंडात साठवून ठेवलेले शुक्राणू तिच्या जननेंद्रियात सोडून तात्काळ दूर जातात.

मादी आपल्या शरीरात शुक्राणू दीर्घकाळ साठवून ठेवते. रेशमी तंतूंनी बनविलेल्या कोशात अंडी घालते. त्या कोशावर पहारा ठेवून अंड्यांचे रक्षण करते. अंड्यांची संख्या सामान्यत: शंभराच्या आसपास असते. काही छोटे कोळी फक्त एकच अंडे घालतात, तर काही मोठे कोळी एका वेळी सु. २,००० अंडी घालतात. कालांतराने अंड्यांतून कोळ्यांची छोटी पिले बाहेर पडतात. कात टाकत टाकत त्यांची वाढ होते. कोळ्याची मादी लहान लहान पिलांचे रक्षण करण्यासाठी त्यांना आपल्या पाठीवर घेऊन वावरते.

कोळ्यांचे विष मूलत: भक्ष्याला मारण्यासाठी बनलेले असते. मात्र काही कोळ्यांचे विष मानवालाही घातक असते. आफ्रिकेतील बटन स्पायडर उत्तर अमेरिकेतील ब्लॅक विडो आणि ऑस्ट्रेलियातील रेडबॅक स्पायडर व फनेलवेब स्पायडर हे कोळी अत्यंत विषारी आहेत. यांच्या दंशामुळे माणसाला अतिशय तीव्र वेदना होतात, परंतु मृत्यू क्वचितच ओढवतो. मानवी चेतासंस्थेच्या विकारांवरील औषधांच्या निर्मितीसाठी कोळ्यांच्या विषावर मोठ्या प्रमाणावर संशोधन करण्यात येत आहे. कोळ्यांनी तयार केलेले रेशीम अतिशय मजबूत असल्याने त्याचासुद्धा अभ्यास आणि त्यावर संशोधन मोठ्या प्रमाणावर होत आहे.