सुगंधी फुलांसाठी प्रसिद्ध असलेली एक वनस्पती. पारिजातक ओलिएसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव निक्टॅन्थस आर्बर-ट्रिस्टिस आहे. जाई, जुई व मोगरा या वनस्पतीही ओलिएसी कुलातील आहेत. पारिजातक मूळची भारतातील असून मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील राज्ये या सर्व ठिकाणी ती फुलांसाठी वाढविली जाते. सुवासिक व नाजूक फुलांकरिता पारिजातक बागेत लावतात.

पारिजातक (निक्टॅन्थस आर्बर-ट्रिस्टिस) : (१) पानाफुलांसह फांदी, (२) लहान रोप, (३) फळे, (४) बिया

पारिजातक हे मोठे झुडूप असते किंवा लहान वृक्ष असतो. हा सदाहरित वृक्ष सु. १० मी.पर्यंत उंच वाढतो. साल खडबडीत व करड्या रंगाची असते. पाने साधी, समोरासमोर, लहान देठाची, ६–१२ सेंमी. लांब व टोकदार असतात. पानांवर खरखरीत रोम असतात, त्यामुळे ती वर खरखरीत व खाली लवदार असतात. फुले लहान, पांढरी व ३–७ च्या झुबक्यात ऑगस्ट–डिसेंबरमध्ये येतात. पाकळ्या ५–८, वर पांढऱ्या व सुट्या आणि खाली केशरी नळीने जुळलेल्या असतात. फुले रात्री उमलतात आणि सकाळी त्यांच्या पाकळ्या म्हणजे दलपुंज गळून सडा पडतो. परंतु हिरवा निदलपुंज झुडपावरच मागे राहतो. फळ गोलसर पण चपटे असून ते कच्चे असताना हिरवे आणि पिकल्यावर तपकिरी होते. फळात दोन बिया असतात.

पारिजातकाच्या फुलांतील केशरी भागात निक्टॅन्थीन नावाचे रंगद्रव्य असते. त्याचा वापर पूर्वी रेशीम रंगविण्यासाठी केला जात असे. पानांमध्ये कॅरोटीन आणि जीवनसत्त्व असते. फुलांत टॅनीन, ग्लुकोज व डी-मॅनीटॉल असते. साल कातडी कमाविण्यासाठी, तर पाने हस्तिदंताला व लाकडाला झिलई आणण्यासाठी वापरतात. बिया, पाने आणि फुले आयुर्वेदात औषध म्हणून उपयुक्त आहेत. पाने पित्तशामक व कफोत्सारक असून तापावर व संधिवातावर गुणकारी असतात.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा