परिसंस्थेतील महत्त्वाची प्रक्रिया. मृत सेंद्रियघटकांतील सेंद्रिय रेणूंचे साध्या व कमी ऊर्जेच्या असेंद्रियसंयुगांमध्ये सावकाश रूपांतर होण्याची प्रक्रिया म्हणजे ‘अपघटन’. संकीर्ण पदार्थ क्षीण होऊन त्याचे तुकडे होण्याच्या क्रियेससुद्धा अपघटन म्हणतात. हे संकीर्ण पदार्थ सेंद्रिय किंवा असेंद्रिय असू शकतात. अपघटनाची प्रक्रिया उष्णता, सूर्यप्रकाश, पाणी, रसायने किंवा चयापचय क्रिया इत्यादींमुळे होते. अपघटन हे रासायनिक आणि भौतिक अशा दोन्ही प्रक्रियांनी होते. अपघटन होण्यास कारणीभूत असलेल्या घटकास अपघटक असे म्हणतात. परिसंस्थेतील कार्य चालू राहण्यासाठी जैव पदार्थांचे जीवांच्या भिन्न स्तरांतून होणारे स्थलांतर व ऊर्जेचे प्रवाह आवश्यक असतात. अनेक शाकाहारी प्राणी झाडपाला, गवत, धान्ये, फळे इ. खाऊन जगतात. हे प्राथमिक ग्राहक होत. हिरव्या वनस्पती या उत्पादक ठरतात. शाकाहारी प्राण्यांना हिंस्र प्राणी खातात, ते द्वितीयक ग्राहक असतात. गिधाडे व तरस अशा अपमार्जक प्राण्यांचे अन्न मृत प्राण्यांची शरीरे असतात. वनस्पतींच्या व प्राण्यांच्या मृत शरीरांवर ज्यांची उपजीविका होते अशा जीवाणू आणि कवके यांसारखे शवोपजीवी अन्नसाखळीच्या शेवटी येतात. ते मृत शरीराचे अपघटन घडवून आणतात आणि त्यातून आपली अन्नऊर्जा घेतात. भुंगेरे व इतर कीटक, गांडूळ इ. प्राणीही अपघटनास मदत करतात. या अपघटनातून कार्बन डाय-ऑक्साइड व पोषक द्रव्ये निर्माण होतात. हे पदार्थ व शेष अकार्बनी भाग परिसरातील निर्जीव घटकात विलीन होतात. त्यामुळे परिसंस्थेचे संतुलन राखले जाते.
- Post published:21/09/2019
- Post author:जयकुमार मगर
- Post category:जीवसृष्टी आणि पर्यावरण / पर्यावरण