जीवशास्त्राची एक शाखा. सजीवांचा तपशीलवार अभ्यास करण्याकरिता असलेल्या सैद्धांतिक शाखांपैकी एक. पूर्वी या शाखेत सजीवांचा आकार, स्वरूप व संरचना यांचा अंतर्भाव केला जात असे; परंतु सध्या अंतर्रचनेचा विचार शरीररचनाशास्त्र व पेशींचा संपूर्ण अभ्यास पेशीजीवशास्त्र या आधुनिक शाखांमध्ये केला जातो. त्यामुळे आकारविज्ञानाची व्याप्‍ती फक्त सजीवांच्या अवयवादिकांसह बाह्यस्वरूपापुरतीच मर्यादित राहिली. या शाखेत अवयवांच्या कार्याचा विचार केला जात नाही, कारण तो शरीरक्रियाविज्ञानात अंतर्भूत आहे. सजीवांच्या बाह्यस्वरूपाचा तौलनिक अभ्यास करून जाती, प्रजाती व कुले यांचे परस्परसंबंध अधिक अचूकपणे ठरविले जातात. त्यानुसार सजीवांचे वर्गीकरण अधिकाधिक सुधारले जाते.

मॉरफॉलॉजी (आकारविज्ञान) ही संज्ञा प्रथमत: जर्मन शास्त्रज्ञ योहान व्होल्फगांग फोन गटे यांनी उपयोगात आणली. त्यांच्या कल्पनेप्रमाणे कोणत्याही सजीवाच्या संरचनेचा अभ्यास त्यात अंतर्भूत असून सजीव ज्या गटात समाविष्ट असेल, त्या गटाच्या आराखड्यातील संरचनेशी सुसंगत असावा. त्यांचे हे तत्त्व प्राण्यांपेक्षा वनस्पतींच्याबाबतीत जास्त उपयुक्त ठरेल. आधुनिक आकारविज्ञान शरीरावयवांच्या तौलनिक अभ्यासावरून काढलेल्या निष्कर्षावर आधारले आहे.

सजीवांच्या बाह्य शरीरसंरचनेच्या अभ्यासासाठी चाकू, धारदार पाते, चिमटा, सुया व साधे भिंग एवढी सामुग्री पुरेशी ठरते. तसेच यासाठी आवश्यक असणारी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे ‘अचूक निरीक्षण’ ही होय. सजीवांच्या शरीराचा बारीकसारीक तपशीलदेखील अभ्यासकाच्या दृष्टीतून सुटता कामा नये. वनस्पती व प्राणी ओळखण्यासाठी आणि त्यांचे वर्गीकरण करण्यासाठी त्यांच्या शरीररचनेचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे. वनस्पती आकारविज्ञानामध्ये वनस्पतींच्या विविध भागांनुसार उपशाखा केल्या जातात. उदा., मूळ आकारविज्ञान, खोड आकारविज्ञान, पर्ण आकारविज्ञान, पुष्प आकारविज्ञान इत्यादी.