पेरू हा सदाहरित वृक्ष मिर्टेसी कुलातील असून त्याचे शास्त्रीय नाव सिडियम गुयाव्हा आहे. लवंग, निलगिरी व मिरी या वनस्पतीदेखील या कुलात समाविष्ट आहेत. पेरू मूळचा मेक्सिकोतील व मध्य अमेरिकेतील असून स्पॅनिश व पोर्तुगीज वसाहतवाद्यांनी ईस्ट इंडीज, आशिया व आफ्रिकेच्या उष्ण प्रदेशात त्याचा प्रसार केला.

पेरू (सिडियम गुयाव्हा) : (१) वृक्ष, (२) फूल, (३) फळे

पेरू वृक्ष ६–८ मी. उंच वाढतो. खोडाची साल तांबूस-पांढरट असून गुळगुळीत असते. लहानलहान तुकड्यांमध्ये ती गळून पडते. पाने साधी, समोरासमोर, लंबगोलाकार, फिकट हिरवी, ७–१५ सेंमी. लांब व ३–५ सेंमी. रुंद असतात. पाने वरच्या बाजूने रोमहीन, तर खालच्या बाजूने मृदुरोमी असून देठ आखूड असतो. फुले मंद सुवासिक व शुभ्र असून ती पानांच्या बेचक्यात एकटीदुकटी किंवा लहान झुबक्याने येतात. फूल उमलताच ४–५ पाकळ्यांचे दलपुंज गळून पडते आणि असंख्य पांढरे पुंकेसर बाहेर दिसायला लागतात. परागण कीटकांमार्फत होते. फलनानंतर ९०–१५० दिवसांत फळ तयार होते. पूर्ण वाढलेले फळ ५–१० सेंमी. व्यासाचे, गोल किंवा अंडाकार असून त्याला तीव्र गोड गंध येतो. कच्ची फळे कठीण असून साल हिरवी असते. फळे पिकल्यावर पिवळी होतात. गर रवाळ असून आंबटगोड रसाचा असतो. काही फळांमध्ये गर सफेद असतो, तर काहींमध्ये गुलाबी किंवा फिकट-लाल असतो. गरात अनेक व कठीण कवचांच्या बिया असतात. पेरूच्या बिनबियांच्या जाती म्हणजे सीडलेस जाती निर्माण करण्यात आल्या आहेत.

पिकलेले पेरू चवदार असतात. अतिसार व आमांश यांवर ते गुणकारी आहेत. लिंबू वर्गातील फळांशी तुलना करता पेरूच्या फळात क-जीवनसत्त्व ४–५ पट अधिक असते. तसेच त्यात अ-जीवनसत्त्व, फॉलिक आम्ल, तंतुमय पदार्थ आणि प्रतिऑक्सिडीकारके असतात. फळांपासून रस, जेली, जॅम, केक, पुडिंग, आइसक्रीम, सॉस इ. तयार करतात. ते टिकविण्यासाठी कच्च्या पेरूपासून मिळविलेले पेक्टिन वापरतात. पेरूच्या लाकडाचा उपयोग कोरीव वस्तू तसेच जळणाचा कोळसा तयार करण्यासाठी होतो. पानांतील टॅनिनांचा वापर कातडी कमाविण्यासाठी होतो. पानांपासून मिळणारा काळा रंग रेशीम व इतर प्रकारचे कापड रंगविण्यासाठी वापरतात. पानांचा काढा दातदुखी, खोकला, घशाचे विकार, तोंडातील फोड आणि पोटातील जंत यांवर गुणकारी आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा