प्राचीन ईजिप्तचा एक महत्त्वपूर्ण लोकप्रिय देव. तो प्रामुख्याने मृतांचा देव मानला जात असे. अंत्यसंस्कार व ममी गुंडाळण्याच्या प्रक्रियेशी तो संबंधित असून त्याला ‘अन्पू’ किंवा ‘इनपू’ असेदेखील म्हटले जाते. त्याला श्वानरूपी मानले जाते. त्याचे शरीर माणसाचे असून डोके मात्र श्वानाचे किंवा कोल्ह्याचे आहे. ही कल्पना बहुधा स्मशानात श्वान व कोल्हे प्रेताचे भक्षण करायला येतात यावरून आली असावी. ईजिप्शियन संस्कृतीमध्ये त्याच्याशी जोडलेल्या अनेक दंतकथा आहेत.

श्वानमुखी अनुबिस देव

नेफ्थिस व तिचा पती सेत(थ) हे अनुबिसचे मातापिता; परंतु त्याचा जन्मदाता ओसायरिस होता. सेतच्या भीतीने नेफ्थिसने अनुबिसचा जन्मत: त्याग केला. ओसायरिसची पत्नी इसिस हिने अनुबिसला दत्तक घेऊन त्याचे संगोपन केले. अनुबिस इसिसचा पहारेकरी श्वानच बनला. त्यामुळे त्याला मानवी भाषा समजेल असा आशीर्वाद देण्यात आला व ममी लपेटण्याची कलाही शिकवली गेली.

ओसायरिसच्या मृत्यूनंतर अनुबिसनेच त्याच्या छिन्नभिन्न झालेल्या शरीराला पुनः जोडण्यात इसिसची मदत केली. चंद्रदेव थॉथच्या आदेशानुसार अनुबिस व होरस यांनी ओसायरिसचे शरीर ममीमध्ये बांधले. हे सर्व झाल्यावर अनुबिस म्हणाला, “उठ आणि जिवंत हो. तुझे नवीन रूप पाहा. तुझ्याशी चुकीचे वागणाऱ्यांचे गुन्हे टळू देत.” ओसायरिस हा परलोकी जिवंत झाला. ओसायरिसच्या मृत्यूच्या वेळीच त्याने अंत्यसंस्कार करण्याची पद्धत शोधून काढली. अंत्यक्रियेतल्या प्रार्थनाही त्याला उद्देशून केल्या जात. त्यामुळे माणसांमध्येदेखील अनुबिस प्रसिद्ध झाला व माणसे मृत्यू पावल्यावरसुद्धा त्याने असेच करावे अशी त्याच्याकडून अपेक्षा केली गेली. असे म्हणतात की अनुबिस होरससोबत मृत लोकांचे शरीर ममीमध्ये बांधून त्यांचे परलोकी स्वागत करत असे व त्यांचे शरीर सडण्यापासून रक्षण करत असे. अशा प्रकारे अनुबिस हा दृश्य व अदृश्य जगातील दुवा आहे, असे मानले जाते.

अनुबिसचे प्रतिनिधित्व म्हणून स्मशानात ममी बांधणारेसुद्धा श्वानाचे किंवा कोल्ह्याचे मुखवटे लावून काम करीत असत.

ममी बनवण्याव्यतिरिक्त अनुबिसचे आणखी एक महत्त्वाचे कार्य म्हणजे मृत्यूनंतर लोकांचे बरेवाईट कर्म बघून त्याप्रमाणे त्यांना पुढची दिशा दाखवणे. या प्रक्रियेला ‘हृदय तपासणी’ असे म्हणत. जर मृत व्यक्तीचे हृदय (कर्म) चांगले असेल, तर अनुबिस त्या व्यक्तीला सन्मार्गाकडे पाठवी; पण जर मृत व्यक्तीचे हृदय दुष्ट असेल, तर मात्र अनुबिस त्या व्यक्तीला सिंह, पाणघोडा व मगर यांचे रूप असलेल्या अमेमाइट नावाच्या हिंस्र प्राण्याला खायला घाली. म्हणूनच अनुबिसला ‘हृदय मापणारा’ असेही म्हटले जाते. तो आत्म्याचा नीतिमान न्यायाधीश होता. ‘तराजूंचा संरक्षक’, ‘आत्म्याचा मार्गदर्शक’ म्हणूनही तो विख्यात होता.

काही दंतकथांमध्ये बाटा हा अनुबिसचा धाकटा भाऊ मानला जातो. या दोघांसंबंधी एक कथा प्रचलित आहे : अनुबिस व त्याची अतिशय सुंदर पत्नी बाटाबरोबर एका शेतावर राहत असत. एके दिवशी अनुबिसची पत्नी बाटाकडे आकर्षित झाली; परंतु त्याने तिला अशा हीन भावनेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. यामुळे अनुबिसची पत्नी क्रुद्ध झाली. तिने बाटावर विनयभंगाचे खोटे आरोप केले आणि अनुबिसकडून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला. अनुबिसने तिच्यावर विश्वास ठेवला व बाटाचा वध करायला निघाला; पण बाटाची त्याच्यापासून सुटका झाली. अनुबिसला नंतर जेव्हा खरी परिस्थिती कळली, तेव्हा त्याला पश्चात्ताप झाला व त्याने आपल्या पत्नीचा वध करून तिचे शरीर श्वानांना खाऊ घातले. काही वर्षांनंतर बाटा ईजिप्तचा राजा झाला व त्याने अनुबिसला युवराज म्हणून घोषित केले. बाटाच्या मृत्यूनंतर अनुबिसने राज्य केले.

संदर्भ :

  • Armour, A. Robert, Gods and Myths of Ancient Egypt, New York, 2003.
  • Spence, Lewis, Myths and Legends of Ancient Egypt, UK, 1998.
  • Willis, Roy, World Mythology : The Illustrated Guide, London, 1993.

समीक्षक – शकुंतला गावडे