कुमारपाल प्रतिबोध : (कुमारवाल पडिबोहो). महाराष्ट्री प्राकृत ग्रंथ. या ग्रंथाला जिनधर्म प्रतिबोध असेही म्हणतात. इ.स. १२ व्या शतकात जैन आचार्य सोमप्रभसूरी यांनी या ग्रंथाची रचना केली. आचार्य सोमप्रभसूरी हे संस्कृत आणि प्राकृतचे प्रकांड पंडित होते. सुप्रसिद्ध जैन आचार्य हेमचंद्र यांच्या उपदेशाने प्रभावित होऊन गुजराथचा चालुक्य राजा कुमारपाल याने जैन धर्माचा स्वीकार केला होता. त्याला केलेला जैन धर्माचा उपदेश आणि त्या अनुषंगाने राजाचे चरित्र हा या ग्रंथाचा विषय आहे. कुमारपाल राजाच्या मृत्युनंतर अकरा वर्षांनी या ग्रंथाची रचना करण्यात आली.

या ग्रंथात अपभ्रंश तसेच संस्कृत भाषेचाही अधूनमधून वापर केलेला दिसून येतो. यात एकूण पाच प्रस्ताव (विभाग) असून, गद्य-पद्य अशा दोन्ही प्रकारात मिळून ५४ कथा आहेत. म्हणजेच हा ग्रंथ चम्पूप्रकारामध्ये लिहिलेला आहे. बहुतेक कथांचे बीज प्राचीन जैन ग्रंथातले असून, या कथांच्या माध्यमातून आचार्य हेमचंद्र यांनी राजा कुमारपाल याला जैन धर्माचे नियम आणि सिद्धांत समजावून सांगितले आहेत.
श्रावकांसाठीची १२ व्रते आणि प्रत्येकी ५-५ अतिचाराद्वारे व्रतांचे रहस्य समजावून देण्यासाठी अनेक लहान कथांचा वापर केलेला दिसून येतो. अहिंसा व्रताचे महत्त्व सांगण्यासाठी अमरसिंह याची कथा, देवपूजेचे महत्त्व सांगण्यासाठी देवपाल पद्मोत्तर याची कथा, सुपात्रदानासाठी चंदनबाला तसेच कृतपुण्यकथा, शील व्रताच्या महत्त्वासाठी शीलवती, मृगावती यांच्या कथा, द्यूतक्रीडेचे दोष दाखवण्यासाठी नल राजाची कथा, परस्त्रीगमनाचे दोष सांगण्यासाठी द्वारिकादहन तसेच यादवकथा सांगितल्या आहेत. सगळयात शेवटी विक्रमादित्य, स्थूलभद्र यांच्याही कथा आल्या आहेत.पहिल्या प्रस्तावात अहिंसा, द्यूत, वेश्यागमन, मद्यपान, दुसऱ्याचे धनहरण करण्यासंबंधी मूलदेव अमरसिंह, दामन्नक, अभयसिंह आणि कुंद यांच्या कथा येतात. अशोकाच्या कथेत श्रीमंत लोक आपल्या मुलांच्या चारित्र्याचे रक्षण करण्यासाठी त्यांना वेश्यांच्या स्वभावाचा परिचय करून देतात, असे वर्णन येते.दुसऱ्या प्रस्तावात देवपूजेच्या समर्थनासाठी देवपाल,सोम आणि भीम, पद्मोत्तर आणि दीपशिख यांच्या कथा येतात. गुरुसेवेचे महत्त्व सांगणाऱ्या राजा प्रदेशी तसेच लक्ष्मीच्या कथा आहेत. कूलवाल याची कथा जैन आगम ग्रंथात प्रसिद्ध आहे, ती ही येथे सांगितली आहे. बृहत्कल्पसुत्रमधील राजा सम्प्रतीची कथा येथे यते. कुमारपाल राजाने आपले गुरु हेमचंद्र यांच्याबरोबर केलेल्या शत्रुंजय, पालिताना, गिरनार इ. जैन तीर्थस्थानांच्या यात्रांचा उल्लेख येतो.

तिसऱ्या प्रस्तावात चंदनबाला, धन्य, कुरुचंद्र, कृतपुण्य आणि चक्रवर्ती भरत यांच्या कथा आहेत. शीलव्रताचे आचरण करणाऱ्या तसेच पक्ष्यांची भाषा जाणणाऱ्या शीलवतीची उपदेश करणारी मनोरंजक कथा आहे. याचबरोबर रुक्मिणी, प्रद्युम्न-शंब, धर्मयश-धर्मघोष, विष्णुकुमार,प्रसन्नचंद्र तसेच जयवर्म-विजयवर्म यांच्या कथा आहेत. चौथ्या प्रस्तावात अहिंसा,सत्य आणि बारा व्रतांच्या बारा कथा सांगितल्या आहेत. मकरध्वज, पुरंदर आणि जयद्रथ यांच्या कथा संस्कृतमध्ये आहेत.जयद्रथाच्या कथेमध्ये कुष्मांडी देवीचा उल्लेख येतो.पाचवा विभाग अपभ्रंश भाषेत आहे.यात जीव, मन, इंद्रिये यांच्यातील चर्चा आहे. ते एकमेकांना दु:खासाठी कारणीभूत ठरवत असतात. शेवटी माणसाचे जीवन सुखी करण्यासाठी जीवदया आणि व्रत यांचे पालन करण्याचा उपदेश आत्मा करतो. यातील अपभ्रंश पद्यात ‘रड्डा’, ‘पद्धडिया’ आणि ‘घत्ता’ या छन्दांचा मुख्यत: वापर केलेला दिसून येतो. यानंतर विक्रमादित्य आणि खपुटाचार्य यांची कथा येते. स्थूलभद्रच्या कथेत ब्रह्मचर्य व्रताचे महत्त्व सांगितले आहे. यातील राजकुमार नंदनची कथा संस्कृतमध्ये आहे.

छोट्या छोट्या गोष्टींमधून व्यक्तीची नीतिमत्ता आणि चारित्र्याचा विकास साधण्याचा प्रयत्न या ग्रंथात केलेला दिसून येतो. लोककथांच्या माध्यमातून धार्मिक व्रतांचे महत्त्व उपयोजित करून नवीन रूपात प्रस्तुत केलेले आहे.ग्रंथात मुख्यत: उपदेश आणि धार्मिक गोष्टी असूनही काव्यात्मक सौंदर्यही तेवढेच आहे. रुपक आणि अनुप्रास अलंकार यांचा योग्य तो वापर केलेला दिसून येतो. यातील भाषा सोपी आणि प्रवाही आहे. मात्र ऐतिहासिकदृष्ट्या या ग्रंथात फारशी माहिती मिळत नाही.
या ग्रंथांतील काही ऐतिहासिक भाग, जिन मंडनगणी यांनी कुमारपाल प्रबंध  या आपल्या ग्रंथात अंतर्भूत केलेला आहे. जयसिंहसूरी यांच्या कुमारपालचरित्रावरही या ग्रंथाचा प्रभाव दिसून येतो.या ग्रंथाचे गुजराथी भाषांतर झाले आहे. पाटण (गुजरात) येथील संघवी भांडारात या ग्रंथाचे इ.स. १४०१ मध्ये लिहिलेले ताडपत्रावरील हस्तलिखित मिळाले आहे. यात सुमारे २५० पाने असून ते सध्या गुजरातमधील कडी (जि. मेहसाणा) या गावात आहे.

संदर्भ : जिनविजय, मुनिराज, कुमारपालप्रतिबोध, गायकवाड ओरिएंटल सिरीज, मध्यवर्ती ग्रंथालय, बडोदा १९२०.

समीक्षक : कमलकुमार जैन