संदेश रासक : अब्दुल रहमान या मुसलमान कवीने तेराव्या शतकात लिहिलेले दूतकाव्य. अपभ्रंश भाषेतील २२३ कडवकांचे हे काव्य तीन प्रक्रमांत (भाग) विभागलेले आहे. अपभ्रंश भाषेत प्रायः जैन मुनी आणि कवींनी तसेच बौद्ध सिद्धांनी अध्यात्मिक रचना लिहिल्या आहेत.अब्दुल रहमान एक मुस्लिम कवी असून त्याने राजस्थान-गुजरातमधील तत्कालीन अपभ्रंश भाषेत लिहिलेले हे एक विरहकाव्य आहे. पहिल्या प्रक्रमात २३ कडवक प्रास्ताविक स्वरूपाचे आहेत व त्यात कवीने स्वतःबद्दल माहिती दिली आहे. काव्यरचने विषयी स्वतःच्या उर्मीचे, वेगवेगळी उदाहरणे देऊन समर्थन केले आहे.

प्रथम प्रक्रमात काव्याच्या सुरुवातीलाच कवी अब्दुल रहमान  देवतत्त्वाचे  अव्यक्त रूप विनयपूर्वक स्मरण करतो.‘रयणायरधरगिरितरुवराइँ गयणंगणंमि रिक्खाइं’(सं.-‘रत्नाकर-गिरि-तरुवर-गगनाङ्गण-ऋक्षाणि’) ज्याने सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टितत्त्वाला विनयपूर्वक नमस्कार असो.तो आपणा सर्वांचे कल्याण करो. त्यानंतर कवी स्वतःचा परिचय देतो. पश्चिम दिशेला म्लेच्छ देशात मीरसेन नावाच्या वीणकराच्या घरी त्याचा जन्म झाला. स्वतःचा परिचय देताना कवी मी कोणी पंडित नाही असे विनयाने म्हणतो; परंतु तो अपभ्रंश-प्राकृत बरोबरच संस्कृत व अन्य भाषांचा उत्तम जाणकार असला पाहिजे ही गोष्ट हे काव्य वाचताना पदोपदी जाणवते. सहसा प्रचारात नसलेले अनेक शब्द त्याने वापरले आहेत. महाभारत, रामायण, भरतनाट्यशास्त्र, सद्यवत्सकथा अशा अनेक ग्रंथांचे उल्लेख लेखकाची बहुश्रुतता दाखवतात.अपभ्रंश भाषेच्या स्थित्यंतराच्या दृष्टीने हे काव्य महत्त्वाचे आहे. प्रक्रमाच्या शेवटी माझे काव्य मध्यमांसाठी आहे कारण पंडितांना ते अतिसामान्य वाटेल व मूर्खांना ते कळणार नाही असे सांगतो.

दुसऱ्या प्रक्रमात १०५ कडवक आहेत. त्यांत नायिका व पथिक यांच्यातील संवाद, नगरवर्णन वगैरे विषय आहेत. भारताच्या वायव्य दिशेस एक शहरवजा विक्रमपूर-विजयपूरगाव (सध्या राजस्थानातील जेसलमेरजवळ) आहे, तेथे विरहिणी नायिका राहते. रस्त्याने जाताना सहजच तिचे लक्ष एका पथिकाकडे जाते व ती त्याची चौकशी करते. येथे त्या पथिकाकडे उत्सुकतेने जाताना तिची जी तारांबळ उडते, ती कवीने तीन कडवकांत आपल्या डोळ्यांसमोर उभी केली आहे. तिचे सौंदर्य पाहून तो पथिक क्षणभर थबकतो व नंतर स्वतःला सावरून स्वतःची माहिती देतो. ४२ व्या कडवकापासून जवळजवळ ७० व्या कडवकापर्यंत तो स्वतःच्या प्रदेशाचे वर्णन करतो. मूलस्थान – मुलतान (आता पाकिस्तानात) येथील समार – सांबपुराहून तो आला आहे. तेथे जवळच तपनतीर्थ– सूर्यकुण्डनावाचे खूप प्रसिद् तीर्थस्थान आहे. जवळजवळ १५/१७ कडवकांत समारचे फार सुंदर वर्णन केले आहे. तेथे सर्व सुसंस्कृत लोक राहतात. मोठमोठे प्रासाद, रमणीय उद्याने वगैरेंनी नटलेले हे शहर आहे. तो स्वतःच्या स्वामीच्या, मालकाच्या आदेशानुसार लेखवाहक म्हणून स्तंभतीर्थास (खंभात-गुजराथ) जात आहे, असे सांगतो. तो सहानभूतीपूर्वक नायिकेचे सांत्वन करतो.

शेवटच्या, तिसऱ्या प्रक्रमात ९५ कडवक आहेत व त्यांत षड्ऋतूंचे वर्णन व नायिकेने त्या काळातील विरह अत्यंत क्लेशाने कसा सहन केला त्याचे वर्णन आहे. काव्याचा परमोच्च बिंदू शेवटच्या कडवकात फार सुरेख पद्धतीने साधला आहे. ग्रीष्म ऋतू हा धागा पकडून कवी ग्रीष्मापासून सुरुवात करून, प्रत्येक ऋतु विशेषांसह ऋतूंचे वर्णन करून, ऋतुराज वसंताच्या वर्णनात काव्याचा शेवट करतो.हे वर्णन कवीने अत्यंत साध्या अलंकारांचा चमत्कृतिपूर्ण उपयोग करून अतिशय रंजक केले आहे.ह्या काव्याचा शेवट अत्यंत अनपेक्षित, चमत्कृतिपूर्ण आहे. पथिकाजवळ स्वतःच्या पतीला निरोप देऊन ती नायिका झरझर चालू लागते व सहजच दक्षिण दिशेकडे पाहते. तो काय? ज्याच्या विरहाने ती इतकी व्याकूळ झाली होती, ज्याला  पथिका बरोबर निरोप पाठविला होता तो नायकच, तिचा पती तिच्या दृष्टीस पडतो.

हे काव्य ऐतिहासिक आणि भौगोलिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे. यातील मूलस्थान – मुलतान तपनतीर्थ – सूर्यकुंडाचा उल्लेख खूप महत्त्वाचा आहे. काव्यातील वर्णनावरून हा प्रदेश अतिशय संपन्न होता असे दिसते व इतिहास तेच सांगतो. वायव्य दिशेस मुसलमानांची आक्रमणे सुरू झाली होती, पण त्यांचा फारसा प्रभाव नव्हता. सुलतान मुहम्मद उर्फ शहाबुद्दीन घोरीने दिल्लीच्या तख्तावर ताबा मिळविण्याच्या आधीचा तो काळ असावा. प्रो. हरिवल्लभ भायाणींच्या मते सिद्धराज जयसिंह किंवा कुमारपालाच्या शासनाच्या आसपास म्हणजे १२ व्या शतकाचा उत्तरार्ध किंवा तेराव्या शतकाची सुरुवात ह्या दरम्यान वायव्येकडून गुजरातमधील महत्त्वाचे बंदर खंभात (स्तंभतीर्थ) मध्ये व्यापार उदीमाची भरभराट होती, त्याच सुमारास ह्या काव्याची रचना झाली असावी.या काव्यात अपभ्रंश-प्राकृतातील अडिल्ला, रासा (रासक किंवा आभणक), कामणिमोहण, चूडिल्लये, रड्डा, वत्थू, नंदिणी आणि भमरावली अशा वैविध्यपूर्ण छंदांमध्ये रचना केली आहे. ह्या काव्यावर ‘टिप्पनक’ व ‘अवचूरि’ अशा दोन संस्कृत व्याख्या उपलब्ध आहेत. या काव्याची तीन हस्तलिखिते उपलब्ध आहेत.

संदर्भ : मुनी, श्री जिन विजय,भायाणी, श्री हरिवल्लभ (संपा), सन्देश रासक – कवी- अब्दुल रहमान, सिंधी-जैन ग्रंथमाला, १९४५.

समीक्षक : कमलकुमार जैन