कालेलकर, नारायण गोविंद : (११ डिसें. १९०९- मार्च १९८९). प्रसिद्ध भाषावैज्ञानिक. भाषाविज्ञान या नव्या विज्ञानशाखेचा परिचय सोप्या मराठीत करून देणाऱ्या नामवंत लेखकांपैकी एक. जन्म रत्नागिरी जिल्ह्यात बांबुळी येथे. शिक्षण बडोदे, मुंबई व पॅरिस येथे झाले. फ्रेंच भाषा व साहित्य आणि भाषाविज्ञानाच्या अभ्यासासाठी त्यांना सयाजीराव गायकवाड शिष्यवृत्ती प्राप्त झाली होती (१९३७-१९४०). फ्रेंच भाषा व साहित्य यात पदविका मिळाल्यानंतर (१९३९) १९४० ते १९५६ पर्यंत बडोदे येथील महाविद्यालयात व विद्यापीठात त्यांनी या विषयांचे अध्यापन केले.

१९४९-१९५० या कालावधीत कल्चरल एक्स्चेंज फेलो म्हणून फ्रान्समध्ये पुन्हा वास्तव्य करण्याची संधी त्यांना मिळाली होती. फ्रान्समधील आंतरराष्ट्रीय भाषाशास्त्रज्ञ झुल ब्लोक यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन करून त्यांनी डी. लिट्.ही पदवी प्राप्त केली. ब्लोक यांच्याच मार्गदर्शनात त्यांनी नारोबास या महानुभाव कविरचित ऋद्धिपूरवर्णन या काव्यग्रंथाचे शास्त्रशुद्ध संपादन करीत आपले संशोधन पूर्ण केले. पुढील आयुष्यातही कालेलकरांकडून गुरुऋणाचा कायम आदराने उल्लेख होत राहिला.  १९५५-५६ या काळात मिळालेल्या रॉकफेलर प्रतिष्ठानच्या अभ्यासवृत्तीमुळे अमेरीकेतील येल विद्यापीठात भाषाविज्ञानाचे अध्ययन करण्याची संधी त्यांना मिळाली. १९५६ पासून १९७३ पर्यंत पुण्याच्या डेक्कन महाविद्यालयात इंडो आर्यन व इंडो युरोपियन भाषांचे आणि भाषाविज्ञानाचे अध्यापन त्यांनी केले. १९७३ मध्ये ते निवृत्त झाले. डेक्कन महाविद्यालयातील भाषाविज्ञान विभागाचे प्रमुख,महाराष्ट्र राज्य संस्कृती मंडळाच्या मराठी महाशब्दकोशाच्या योजनेचे प्रमुख संपादक तसेच महाराष्ट्र राज्य भाषा सल्लागार मंडळाचे सदस्य इत्यादी महत्वाच्या जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. मराठी विश्वकोशातील भाषाशास्त्राविषयक नोंदींचे लेखनही त्यांनी केले आहे. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये लेखन त्यांनी लेखन केले असून  त्यांचे बुद्धकालीन भारतीय समाज (अनु.१९३५) व कंपॅरेटिव्ह मेथड इन हिस्टॉरिकल लिंग्विस्टिक्स (अनु.१९६०) हे ग्रंथ उल्लेखनीय आहेत.  भाषांच्या क्षेत्रमर्यादा (१९५१),ध्वनिविचार (१९५५),भाषा बोली आणि लेखन (१९५९),भाषा आणि संस्कृती (१९६२),भाषा इतिहास आणि भूगोल (१९६४) या मौलिक ग्रंथांद्वारे भाषेच्या संदर्भात मुलभूत असणारे संशोधानात्मक लेखन त्यांनी केले आहे.याशिवाय  अनेक फ्रेंच कथा, व्हॉल्तेअरसारख्या लेखकाची कादंबरी, कविता, लेख याचेही त्यांनी अनुवाद केले आहेत. त्यांचे ध्वनिविचार हे स्वनविज्ञानावर लिहिलेले पहिलेच मराठी पुस्तक असून ध्वनिनिर्मितीसंबंधी यात शास्त्रशुद्ध विवेचन केलेले आहे. भाषा आणि संस्कृती ,भाषा इतिहास आणि भूगोल या ग्रंथांमध्ये भाषाविज्ञानाचा परिचय करून देताना जनमानसातील रूढ परंतु घातक समजुतींचे निराकरण केलेले आहे. भाषांच्या क्षेत्रमर्यादा आणि ध्वनिविचार या  ग्रंथांना महाराष्ट्र राज्याचा वाङ्मय पुरस्कार आणि भाषा इतिहास आणि भूगोल या ग्रंथाला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे.

संदर्भ : गणोरकर, प्रभा, टाकळकर उषा, डहाके वसंत आणि इतर, संक्षिप्त मराठी वाङमय कोश, मुंबई, २००४.