गाडगे महाराज : (२३ फेब्रुवारी१८७६—२० डिसेंबर १९५६). थोर आधुनिक मराठी संत व समाजसुधारक. जन्म शेणगाव (ता. दर्यापूर, जि. अमरावती) येथे. आडनाव जाणोरकर. वडील झिंगराव (झिंगराजी) व आई सखुबाई यांचे हे एकुलते एक अपत्य. त्यांचे त्यांच्या आईने ठेवलेले मूळ नाव डेबूजी. शेणगावचे घरंदाज नागोजी परीट यांचे हे पणतू. यांचे घराणे मूळचे सुखवस्तू. व्यवसाय शेतीचा; परंतु त्याकाळच्या अनेक वाईट रूढींमुळे झिंगराजींना विपन्नावस्था आली. अशा परिस्थितीतच व्यसनाधीनतेमुळे झिंगराजींचे कोतेगाव येथे निधन झाले (१८८४). त्यानंतर सखुबाई डेबूजींसह माहेरी (दापुरे गावी, ता. मूर्तिजापूर) येऊन राहिल्या. आजोळी डेबूजी गुरे राखीत असे व भजन करीत असे. या वयातच त्यांनी मुलांची भजनी मंडळे तयार केली होती. लहानपणापासूनच ते जातिभेद, हिंसात्मक कुळधर्म, चालीरीती मानीत नसे. पुढे डेबूजी मामाचे शेतकामही चांगले करू लागले. १८९२ मध्ये त्यांचा कुंताबाईंशी विवाह झाला. त्यांना अलोका, मुद्गल, कलावती व गोविंदा अशी चार अपत्ये होती. परंतु अलोकाखेरीज तीन अल्पवयीन ठरली. १९०५ पासून डेबूजीबाबांनी स्वत:ला लोकसेवेसाठी वाहून घेतले. संसारत्याग करून ते साधकावस्थेत तीर्थयात्रा करीत फिरत होते. समाजातील कमालीचे अज्ञान, अनिष्ट चालीरीती व अंधश्रद्धा पाहून त्यांनी निरपेक्ष लोकसेवेचे व लोकशिक्षणाचे व्रत स्वीकारले.

डेबूजींना लहानपणापासूनच भजन­-कीर्तनाची आवड होती आणि त्यांची वृत्तीही धार्मिक व परोपकारी होती. समाजसुधारण व लोकशिक्षण यांसाठी त्यांनी कीर्तनाचे माध्यम प्रभावीपणे वापरले. ते निरक्षर होते तरी त्यांची भाषा सुबोध व सर्वसामान्यांच्या हृदयाला जाऊन भिडणारी होती. गुजरात, कर्नाटक, आंध्र प्रदेशाच्या काही भागांत व महाराष्ट्रात त्यांनी कीर्तने करून लोकजागृती केली. भजन­-कीर्तनांतून प्रश्नोत्तररूपी संवाद हे डेबूजींचे वैशिष्ट्य होते. चोरी करू नये, तसेच चैन, देवाची यात्रा, दिवसवारे हे प्रकार कर्ज काढून करू नये, देवा-धर्माच्या नावाने नवस-सायास करू नये, यासाठी मुक्या प्राण्यांचा बळी देऊ नये, शिवाशीव पाळू नये, दारू पिऊ नये, हुंडा देऊ-घेऊ नये, आई-वडिलांची सेवा करावी, भुकेल्याला अन्न द्यावे, मुलांना शिकविल्याविना राहू नये, हे त्यांच्या कीर्तनांतून समाजप्रबोधनाचे मुख्य विषय असत. ‘गोपाळा गोपाळा देवकीनंदन गोपाळा’ असा गजर ते मुद्द्याच्या शेवटी करत व त्यात श्रोत्यांनाही सामील करून घेत. श्रोत्यांना सहभागी करून घेणे हे त्यांच्या कीर्तनाचे एक प्रमुख वैशिष्ट्य होय.

डेबूजी पुढे गाडगे महाराज या नावाने प्रसिद्ध झाले. अंगावर फाटकी गोधडी आणि हातात गाडगे व एक काठी (सोटा) असा त्यांचा वेश असे. त्यामुळे ते गाडगेबाबा, गोधडे महाराज या नावांनीही प्रसिद्ध होते. त्यांशिवाय प्रदेशपरत्वे ते चिंधेबुवा, लोटके महाराज, चापरेबुवा, वट्टीसाधू इ. नावांनीही परिचित होते. लोकजागृतीसाठी प्रवास करीत असतानाच अमरावतीजवळ त्यांचे २० डिसें. १९५६ रोजी निधन झाले. वांद्रे (मुंबई) येथील पोलीस केंद्रात दि. ८ नोव्हें. १९५६ रोजी झालेले त्यांचे गाजलेले कीर्तन अखेरचे ठरले. अमरावती येथे त्यांची समाधी आहे.

माणसाच्या वाट्याला आलेले दु:ख माणसानेच समजून घ्यायला हवे. त्याच्या गुणावगुणांची पारख करून माणूसच माणसाला माणसात आणतो. यावर गाडगे महाराजांचे भर असल्याचे दिसून येते. अज्ञान, व्यसनाधीनता, दारिद्र्य माणसाला पुरते जेरीस आणते. त्यातून माणसाच्या वाट्याला दु:ख येते. हे ओळखून गाडगे महाराज यांचे मन संसारात, गृहस्थी जीवनात रमले नाही. प्रस्थापित वर्चस्ववादी रूढी-परंपरा आणि बुर्ज्वा मानसिकता यांचे प्राबल्य पाहून त्यांचे मन उदास झाले. विरक्तीने भरून आले. लोकांच्या जीवनातील दु:खाचे कारण ओळखून त्यांनी त्यावर प्रहार करण्यास सुरुवात केली. लोकसेवेला आपले उभे आयुष्य वाहून घेतले. दु:ख परिहार हाच ध्यास घेऊन त्यांनी समाज सुधारणेच्या कार्याला सुरुवात केली.

‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ असे त्यांचे मानववादी व समाजवादी तत्त्वज्ञान आहे. देवळाच्या बाहेर राहून आपल्या पाया पडून न घेता ते भक्तांची सेवा करण्यात धन्यता मानीत. स्वच्छता, प्रामाणिकपणा, भूतदया यांवर त्यांचा विशेष भर असे. मंदिराबाहेर ते झाडलोट करीत असत व भक्तांनी दिलेले चांगले अन्न गोरगरिबांना वाटून टाकीत. स्वतः मात्र चटणी-भाकरी मागून आणून खात असत. पाखंडीपणा, जातीभेद, अस्पृश्यता नष्ट होण्यासाठी त्यांचे अनेक प्रयत्न असत. त्यांबाबत आपल्या कीर्तनांतून मार्मिक उदाहरणे देऊन ते उपदेश करीत. शिवाशिव हा रिकामटेकट्या माणसांचा खेळ आहे, असे ते म्हणत. ज्यांनी या समाजात विषमतेचे बीज पेरले ते नष्ट करण्याचा ध्यास त्यांनी घेतला. समाजात निर्माण झालेली घाण गाडगेबाबांनी साफ करून समाजाला स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यांना स्वच्छता आणि समानता हवी आहे. लोकशिक्षणातून लोकसेवा आणि लोकजागृती हेच त्यांच्या जीवनाचे अंतिम ध्येय ठरले. माणसाचे मतपरिवर्तन व मनपरिवर्तन म्हणजेच समाजपरिवर्तन हा त्यांचा दृढ विश्वास होता. अध्यात्माच्या जंजाळात न शिरता, संसारातच राहून ईश्वरभक्ती करता येते, अशी साधी व सरळ शिकवण त्यांनी समाजास दिली. “संत तुकाराम महाराज आमचे गुरू आहेत व माझा कोणीही शिष्य नाही” असे ते म्हणत.

गाडगे महाराजांवर लोकांची नितांत श्रद्धा होती. त्यामुळे लोकांनी त्यांना विपुल पैसा दिला. तो सर्व त्यांनी लोकोपयोगी कार्यासाठी दिला. समाजात शिक्षण प्रसार करून अनेक शिक्षणसंस्थांना त्यांनी मदत केली. त्यांनी उभारलेल्या सर्व संस्थांचा कारभार विश्वस्त मंडळांमार्फत चालतो. ऋणमोचन घाट मंदिर, मूर्तिजापूर गोरक्षण संस्था (धर्मशाळा), पंढरपूर चोखामेळा धर्मशाळा-बोर्डिंग, पंढरपूर मराठा धर्मशाळा, पंढरपूर परीट धर्मशाळा, नाशिक धर्मशाळा, आळंदी धर्मशाळा, आळंदी परीट धर्मशाळा, देहू धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर कलईवाला धर्मशाळा, पुणे आकुल धर्मशाळा, त्र्यंबकेश्वर परीट धर्मशाळा इ. संस्था त्यांनी सुरू केल्या. १९५२ साली त्यांच्या भक्तांनी  ‘श्री गाडगेमहाराज मिशन’ या नावाने  संस्था स्थापन केली आहे. २००५ साली अमरावती विद्यापीठाचे नाव संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ असे करण्यात आले.

संदर्भ :

  • दांडेकर, गो. नी. श्री गाडगे महाराज, पुणे, २०११.
  • भगत. रा. तु. समतासूर्य गाडगेबाबा, पुणे, २०१३.
  • http://www.hindupedia.com/en/Sant_Gadge_Maharajhttp://
  • www.shreedarshan.com/saint-sadguru-gadge-baba.htm
  • https://www.socialreformers.sgbaulib.com

                                                                                                                                                                   समीक्षक : नवनाथ रासकर