काळजीवाहू सरकार : संसदीय पद्धतीच्या शासनामध्ये काळजीवाहू सरकार स्थापन केले जाते. असे सरकार प्रथम इंग्लंडमध्ये स्थापन झाले (१९४५). मंत्रिमंडळाच्या राजीनाम्यानंतर किंवा अस्थिर परिस्थितीमध्ये या प्रकारचे सरकार स्थापन केले जाते. अशा सरकारचे काम तात्पुरते असते. साधारणपणे मंत्रिमंडळाने राजीनामा दिल्यानंतर नवीन पंतप्रधानाची निवड होईपर्यंत जुन्याच मंत्रिमंडळाला कारभार पाहण्यास राष्ट्रप्रमुख सांगतात (भारतात राष्ट्रपती). हे काळजीवाहू सरकार असते. तसेच कायदेमंडळ बरखास्त करून निवडणुका घेतल्या गेल्यास निवडणुका होऊन नवीन मंत्रिमंडळ स्थापना होईपर्यंत पूर्वीचे मंत्रिमंडळ काळजीवाहू सरकार म्हणून काम पाहते. कोणत्याही पक्षाला निर्विवाद बहुमत नसल्यास परिस्थिती स्पष्ट होईपर्यंत काळजीवाहू सरकार स्थापन केले जाते अथवा नवीन आघाडी स्थापन होईपर्यंत असे काळजीवाहू सरकार स्थापन केले जाते. काळजीवाहू सरकार हे तात्पुरते आणि कामचलावू असते. ते कारभार पाहत असले तरी नवीन धोरणे त्याने आखू नयेत, धोरणात्मक निर्णय घेवू नयेत असा संकेत आहे. अशा मर्यादा या सरकारला असतात. भारतात काळजीवाहू सरकारचा कालावधी सहा महिन्यापेक्षा कमी असतो. भारतात या प्रकारचे सरकार अनेकवेळा स्थापन झाले. भारतातील या प्रकारच्या सरकारचे महत्वाचे उदाहरण म्हणजे श्रीमती इंदिरा गांधी यांचे डिसेंबर १९७०-१९७१ च्या काळातील सरकार होय.
संदर्भ : Patil S.H.,The Constitution, Government and Politics in India, Vikas Pub. Noida, India, 2016.