मध्यसप्तकाचा षड्ज हा भारतीय आणि पाश्चात्त्य संगीतातील अचल आधार स्वर होय. यालाच प्राण स्वर किंवा जीव स्वर अशीही संज्ञा आहे. हा षड्ज साधारणपणे गायकाला सहजतेने लावता येण्यासारखा आणि रागानुरूप इष्ट त्या सर्व सप्तकांत फिरण्यास योग्य असा असावा लागतो. वादकाच्या बाबतीत तो वाद्य आणि वाद्यगुण यांना अनुसरून असतो. त्यानुसार प्रत्येक कलाकाराचा षड्ज हा आवाजाच्या जातीनुसार वेगवेगळा असू शकतो. या स्वराशी मूलभूत संबंध आणि संदर्भ ठेऊनच संपूर्ण सादरीकरण होत असते आणि त्यायोगेच गायकवादकांना आपला सुरेलपणा सांभाळता येतो व श्रोत्यांना तो जोखता येतो. रागगायनातील आधार स्वरासाठी भारतीय संगीतात तंबोऱ्याचा आणि आवश्यकतेनुसार इतर वाद्यांच्या साथीचा उपयोग केला जातो. गायनातील वा वादनातील स्वरवाक्यांची पूर्ती वारंवार या आधार स्वरात मिळाल्याने अथवा त्याच्याशी अखंड संबंध राखल्याने होते.

समीक्षण : सुधीर पोटे