कोंडके, दादा : ( ८ ऑगस्ट १९३२ – १४ मार्च १९९८). मराठी चित्रपटसृष्टीतील एक हरहुन्नरी कलावंत; अत्यंत लोकप्रिय विनोदी अभिनेते. त्यांचे मूळ नाव कृष्णा खंडेराव कोंडके; मात्र ‘दादा कोंडकेʼ या नावाने ते सुपरिचित. त्यांचा जन्म नायगाव, मुंबई येथला. त्यांची जन्मतारीख निश्चित माहीत नसल्याने जन्मदिनी जन्माष्टमी होती, म्हणून तिथीवरून जन्मतारीख काढण्यात येऊन त्यांचे नाव कृष्णा ठेवण्यात आले.

बालवयातच त्यांच्यावर वारकरी संप्रदायाचे संस्कार झाले. त्यांचे वडील मुंबईत गिरणी कामगार होते. घरात सतत भजने होत असल्यामुळे त्यांना गीतलेखन व गायनाचे कौशल्य अवगत झाले. ते अनेक वाद्येही वाजविण्यास शिकले. बालपणापासूनच खोडकर स्वभावाच्या दादांचे शिक्षणात मात्र फारसे मन रमले नाही. त्यामुळे त्यांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले. वडिलांच्या निधनानंतर त्यांनी मुंबईतच श्रीकृष्ण बँड पथकात वादकाचे काम केले. याच काळात त्यांचा विविध सामाजिक चळवळींशी  संपर्क आला. त्यातूनच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले. अंगच्या उपजत कलागुणांमुळे त्यांना राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात काम मिळाले. तेथे ते शाहीर म्हणून नावारूपास आले. वगनाट्यात भूमिका करणे, पोवाडे रचणे व गाणे आदी कामे करू लागले. या काळात राम नगरकर, निळू फूले आदी कलाकार त्यांचे सहकारी होते. वगसम्राट दादू इंदुरीकरांच्या शैलीचा त्यांच्यावर प्रभाव होता. वसंत सबनीसलिखित छपरी पलंगाचा वग हे लोकनाट्य त्यांनी विच्छा माझी पुरी करा या नावाने रंगमंचावर आणले. या नाटकाला असलेला लोकनाट्याचा बाज, तत्कालीन राजकीय-सामाजिक संदर्भ व त्यांवर औपरोधिक, मार्मिक भाष्याची, विनोदी टीका-टिप्पणीची खुमासदार फोडणी यांमुळे हे लोकनाट्य अतिशय लोकप्रिय झाले. या लोकनाट्यातील त्यांची भूमिका अतिशय गाजली व ते प्रसिद्धीच्या झोतात आले.

मराठी रंगभूमीवर दादांना मिळालेले यश पाहून सुप्रसिद्ध चित्रपटनिर्माते-दिग्दर्शक भालजी पेंढारकर यांनी दादांना त्यांच्या तांबडी माती (१९६९) या चित्रपटात सहनायकाची भूमिका दिली; मात्र हा चित्रपट म्हणावा तसा चालला नाही. रंगमंचावर हजारो प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा हा अभिनेता सिनेमाच्या पडद्यावर लोकांना का आवडला नाही, असा प्रश्न भालजी पेंढारकरांना पडला होता. पुढे पेंढारकरांच्या अचूक मार्गदर्शनामुळे दादांनी सोंगाड्या (१९७१, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी) या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाने अभूतपूर्व असे यश व लोकप्रियता संपादन केली आणि मराठी चित्रपटसृष्टीत नवा इतिहास रचला. त्यानंतर एकापाठोपाठ एक अशा पंधरा मराठी व चार हिंदी चित्रपटांची त्यांनी निर्मिती केली. त्यांतील मराठी चित्रपट असे – एकटा जीव सदाशिव (१९७२, दिग्दर्शक गोविंद कुलकर्णी), आंधळा मारतो डोळा (१९७३, दिग्दर्शक प्रभाकर पेंढारकर), पांडू हवालदार (१९७५), तुमचं आमचं जमलं (१९७६), राम राम गंगाराम (१९७७), बोट लावीन तिथं गुदगुल्या (१९७८), ह्योच नवरा पाहिजे (१९८०), आली अंगावर (१९८२), मुका घ्या मुका (१९८६), मला घेऊन चला (१९८९), पळवा पळवी (१९९०), येऊ का घरात (१९९२), सासरचं धोतर (१९९४), वाजवू का? (१९९६). हिंदी चित्रपटांमध्ये तेरे मेरे बीच में (१९८४), अंधेरी रात में दिया तेरे हाथ में (१९८६), आगे की सोच (१९८८), खोल दे मेरी जुबान (१९८९) यांचा समावेश आहे. यांव्यतिरिक्त भालजी पेंढारकरदिग्दर्शित गनिमी कावा या अन्य एका मराठी चित्रपटात तसेच मेहुलकुमार दिग्दर्शित चंदू जमादार (१९७७) व राम राम आमथाराम (१९७९) या दोन गुजराती चित्रपटांत त्यांनी भूमिका केल्या. अत्यंत साधे कथानक, ठसकेबाज आणि ग्रामीण बाजाची गाणी, विनोदी सादरीकरण यांमुळे दादांचे चित्रपट प्रेक्षकांना आवडले. मराठीतही चांगल्या चित्रपटांना प्रेक्षक आहे, हे दादांच्या चित्रपटांनी दाखवून दिले.

१९७१ ते ९७ या तब्बल २६ वर्षांच्या कालखंडात, दादा कोंडके सातत्याने मनोरंजन करणारे चित्रपट देत होते. या कालखंडात दादांच्या चित्रपटांवर ना हिंदी सिनेमांचा परिणाम झाला ना दूरचित्रवाणीच्या आगमनाचा! आकर्षक गाणी, उडत्या चाली व धमाल संवाद यांसोबतच दादांनी त्या काळच्या प्रचलित धारणांनुसार जो अनाकर्षक नायक उभा केला, तो प्रेक्षकांना आपलासा वाटला. गावंढळ अशी अर्धी चड्डी, साधाभोळा पण बोलण्यात फटकळ असा हा नायक सर्वार्थांनी वेगळा होता, म्हणूनही त्याला खऱ्या अर्थाने लोकाश्रय प्राप्त झाला होता. दादांच्या चित्रपटांमुळे पूर्णत: डबघाईस आलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला त्या काळात नवसंजीवनी मिळाली. व्यवसाय म्हणून चित्रपटनिर्मिती करून ती यशस्वी होण्यासाठी वितरणप्रणालीपासून सर्वच यंत्रणा विकसित करण्यात दादांनी स्वत:चे वेगळेपण दाखवले होते. त्यांची स्वत:ची ‘कामाक्षीʼ नावाची चित्रपट-वितरण संस्था व ‘सदिच्छाʼ नावाची चित्रपटनिर्मितिसंस्था होती. उषा चव्हाण या नायिकेबरोबर त्यांची जोडी विशेष लोकप्रिय ठरली. याशिवाय त्यांच्या चित्रपटांत आईचे पात्र निभावणाऱ्या रत्नमालाबाई, संगीतकार राम-लक्ष्मण, पार्श्वगायनासाठी महेंद्र कपूर यांचा आवाज आदी घटकही तितकेच लोकप्रिय ठरले.

दादा कोंडके यांचे ओळीने नऊ चित्रपट रौप्यमहोत्सवी ठरले. बहुजन समाजाच्या अभिरुचीची नाडी नेमकी ओळखून सर्वसामान्य प्रेक्षकांना रुचतील असे ग्रामीण बाजाचे विनोदी चित्रपट निर्माण केल्याने त्यांनी अफाट लोकप्रियतेचा एक उच्चांकच प्रस्थापित केला. त्यांच्या निधनानंतर ‘शाहीर दादा कोंडके प्रतिष्ठानʼ ही संस्था स्थापन करण्यात आली आहे. एकटा जीव हे अनिता पाध्ये यांनी शब्दबद्ध केलेले त्यांचे आत्मचरित्र खूपच लोकप्रिय ठरले.

त्यांचे मुंबई येथे निधन झाले.

समीक्षक : संतोष पाठारे