पृष्ठवंशी संघाच्या सरीसृप वर्गाच्या (Reptilia) स्क्वॅमाटा-सरडा (Squamata-Lijzard) गणातील इग्विनिआ (Iguania) उपगणातील इग्वानिडी (Iguanidae) कुलातील सरड्यासारखा दिसणारा परंतु, त्याच्यापेक्षा मोठा प्राणी. इग्वानाच्या ८ प्रजाती व सु. ३० जाती आहेत. त्याच्या इग्वाना (Iguana), सायक्लुरा (Cyclura), डिप्नोसोसॉरस (Dipnososarus), ॲम्ब्लिऱ्हिंकस (Amblyrhynchus), कोनोलोफस (Conolophus), ब्रॅकिलोफस (Brachylophus), टिनोसौरा (Ctenosaura) व सौरोमॅलस (Sauromalus) या ८ प्रजाती आहेत. त्यांपैकी इग्वाना प्रजातीचे प्राणी हे खरे इग्वाना असून याच इग्वानिडी कुलातील काही इतर प्रजातींच्या सरड्यांना सुद्धा इग्वाना असे म्हणतात. इग्वानिडी कुलात ८ उपकुले असून त्यातील इग्वानाचा समावेश इग्वानिनी (Iguaninae) उपकुलात होतो. इग्वाना दक्षिण अमेरिकेच्या सगळ्या उष्ण कटिबंधीय प्रदेशांत व वेस्ट इंडिज बेटांत आढळतो. त्याचे भू-परिसंस्थेमध्ये जंगलांत, तर जलीय परिसंस्थेमध्ये तलाव, नदी, झरे व समुद्र यांत वास्तव्य असते.

इग्वाना प्रजातीमध्ये ग्रीन इग्वाना (Green Iguana) आणि लेसर अँटिलियन इग्वाना (Lesser antillean iguana) या दोन जातींचा समावेश होतो.

ग्रीन इग्वाना (इग्वाना-इग्वाना)
ग्रीन इग्वाना (इग्वाना-इग्वाना)

ग्रीन इग्वाना : याचे शास्त्रीय नाव इग्वाना-इग्वाना (Iguana-Iguana) असे आहे. त्याचा आढळ सेंट्रल आणि द. अमेरिकेच्या सिनालोआ आणि व्हेराक्रुझ मेक्सिको येथे, तसेच कॅरिबियन बेटे आणि पूर्व प्रशांत किनारपट्टीच्या भागांत व दक्षिणेकडील फ्लोरिडा आणि हवाई बेटे येथे आहे. त्याची लांबी १.५—२ मी. असून वजन ४—६ किग्रॅ. असते. शेपटी चपटी असून टोकाकडे निमुळती होत जाते. नर इग्वानाचा रंग हिरवा व त्यावर तपकिरी पट्टे असतात. शेपटीवर काळे गोलाकार पट्टे किंवा कडे असते. मादी नरापेक्षा लहान, वजनाने नराच्या निम्मी असून सामान्यत: तपकिरी रंगाची असते. त्याचा रंग हवामान व परिसर यांवर अवलंबून असून सकाळी गडद, तर दुपारी तो फिकट असतो. तापमान नियंत्रणासाठी तो रंग बदलतो. त्याच्या डोक्यावर उंचवटा असून मानेपासून शेपटीपर्यंत पाठीवर काट्यांची ओळ असते. तिचा वापर स्वसंरक्षणासाठी होतो. घशाखाली लांबट ओघळलेली त्वचा (Dewlap) हे या प्रजातीचे वैशिष्ट्य आहे. डोक्यावरचे खवले अनियमित आकाराचे असतात. कर्णपटलाखाली एक वाटोळी चकती असते. दात धारदार (टोकदार) व पाय आखूड, प्रत्येक पायाला पाच बोटे असून त्यास टोकदार नख्या असतात. हॉइड हाडांचा (Hyoid bone) विस्तार झालेला दिसून येतो. दृष्टी तीक्ष्ण असते. दोन डोळ्यांच्यामध्ये तिसरा डोळ्यासारखा अवयव (Parietal eye) असून त्याच्याद्वारे त्याला प्रकाशातील बदल कळतात.

ग्रीन इग्वाना वृक्षवासी असून झाडांच्या फांद्यामध्ये उंचावर राहतो. तो झाडांच्या फांद्यांवर निवांत ऊन खात पडलेला दिसून येतो. तो संकटाच्यावेळी झाडावरून पाण्यात सूर मारून पोहण्यात पटाईत आहे. प्रामुख्याने तो शाकाहारी असून मुख्यत: हिरव्या वनस्पती व पिकलेली फळे खातो; तर पाळीव इग्वाना अपृष्ठवंशी प्राणी, लहान पक्षी, उंदीर, अळ्या इत्यादीही खातो.

लेसर अँटिलिअन इग्वाना : याचे शास्त्रीय नाव इग्वाना डेलिकेटिसीमा (Iguana delicatissima) असे आहे. याला लेसर अँटिलिअन ग्रीन इग्वाना (Lesser antilleangreen iguana) असेही म्हणतात. याचा आढळ खुरटी वनराजी, वर्षावने व खारफुटी जंगलांमध्ये आहे. तो संपूर्ण लेसर अँटिलीसमध्ये अँग्युलिया या भागापासून मार्टिंनक्यूपर्यंत आढळतो.

लेसर अँटिलियन इग्वाना (इग्वाना डेलिकेटिसीमा)

स्थानपरत्वे त्याच्या रंगांमध्ये विविधता आढळते. मुख्यत: रंग करडा असून खालील बाजूस हिरवट असतो. डोक्यावरील खवले मोठे व फिकट पिवळसर (Ivory colour) असतात. याची लांबी सु. ४० सेंमी. व शेपटी सु. ८० सेंमी. असते. मादी नरापेक्षा आकाराने लहान असते. याच्या शेपटीवर ग्रीन इग्वानासारखे काळे कडे (पट्टे) तसेच कर्णपटलाखाली वाटोळी चकती नसते. हा यातील व ग्रीन इग्वानातील मुख्य फरक आहे. या जातीस आययूसीएन (IUCN; International Union for Conservation of Nature) या संस्थेने ‘धोक्यात आलेली जाती’ म्हणून घोषित केले आहे.

ग्रीन इग्वाना व लेसर अँटिलियन इग्वाना यांच्या संकरापासून अनेक जाती तयार झाल्या आहेत.

इतर प्रजातींमध्ये वेस्ट इंडियन इग्वाना (Cyclura) व डेझर्ट इग्वाना (Dipsosarus) यांचा समावेश होतो. सागरी इग्वाना (Amblyrhynchus cristatus) व भू (जमिनीवरील) इग्वाना (Conolophus pallidus) या दोन प्रजाती गॅलोपेगॉस बेटावर आढळतात. पिंक इग्वानाचा (Conolophus rosanda) आढळ इसाबेला (Isabela) बेटावर वोल्फ व्हलकॅनो (Wolf volcano) येथे आहे.

सागरी इग्वाना : याचे शास्त्रीय नाव ॲम्ब्लिऱ्हिंकस क्रिस्टेटस (Amblyrhynchus cristatus) असून याचा आढळ समुद्र, दलदलीचा भाग, खारफुटी भाग या ठिकाणी असतो. याचा  रंग करडा ते काळसर असतो. परंतु, स्थानपरत्वे त्याच्या रंगांमध्ये विविधता आढळते. तो १.५ मी. लांब, शेपटी चपटी असून तिचा उपयोग पोहण्यासाठी होतो. तो समुद्रातील वनस्पती विशेषत: शैवले खातो. समुद्र किनाऱ्यावरील खडकांवर यांचे समूह बसलेले दिसून येतात. इग्वाना प्रजातींमधील ही उत्तम पोहणारी जाती आहे.

इग्वाना : विविध जाती.

इग्वानाचा विणीचा हंगाम पावसाळ्यात असून त्यावेळी नर खूप आक्रमक होतात. मादी इग्वाना शरीरात अनेक वर्षे शुक्राणूंचे जतन करून ठेवते. मीलनानंतर सु. ६५ दिवसांनी मादी जमिनीतील खड्ड्यांत अंडी घालते. मादी तीन दिवसांमध्ये मिळून सु. ६५ अंडी घालते. अंडी पांढरी किंवा फिकट गुलाबी रंगाची असून सु. १५.४ मिमी. व्यास व ३५—४० मिमी. लांबीची असतात. अंडी घातल्यानंतर अंड्यांची काळजी नर व मादी घेत नाहीत, तसेच ती उबवितही नाहीत. अंडी नैसर्गिक अवस्थेत ३०—३३० से.ला उबल्यानंतर त्यातून पिले बाहेर येतात. जन्मावेळी पिलू सु. ७.६ सेंमी. लांब असते. लैंगिक परिपक्वता ३-४ वर्षांनी येते.

साप, घुबड, ससाणा, मानव हे इग्वानाचे मुख्य शत्रू आहेत. तो आकर्षक, हुशार व वैशिष्ट्यपूर्ण प्राणी आहे. काही जाती प्राणिसंग्रहालयात पिंजऱ्यात पाळल्या जातात. ग्रीन इग्वाना व ब्ल्यू इग्वाना (Cyclura lewisi) या जाती पाळल्या जातात. इग्वाना हा पर्यावरणीय बदलांना अधिक संवेदनशील असतो. तसेच तो बियाणे वितरणास मदत करतो. संकटकाळी तो आपल्या शेपटीचा काही भाग तोडतो व शत्रूपासून बचाव करतो. नवीन शेपटी एका वर्षात वाढते; परंतु तिची लांबी पहिल्याएवढी नसते.

इग्वानाचे मांस स्वादिष्ट व रुचकर असल्यामुळे त्याचा अन्न म्हणून उपयोग होतो. ते सरपटणारे प्राणी व उभयचर यांच्यासाठी देखील अन्नाचा उत्तम स्रोत आहेत. संशोधनांतही यांचा उपयोग होतो. याच्या कातडीचा उपयोग बूट, पट्टे, पर्स तयार करण्यासाठी होतो. तो साल्मोनेल्ला (Salmonella bacteria) जीवाणूचा वाहक असल्यामुळे त्याच्यामार्फत रोग उत्पन्न होऊ शकतो. याचे आयुर्मान नैसर्गिक अधिवासामध्ये २५—४० वर्षे, तर पाळीव अवस्थेत सु. २० वर्षे आहे. परंतु, पाळीव अवस्थेमध्ये तो सु. ६९ वर्षे जगल्याचीनोंद आहे.

पहा : सरडा.

संदर्भ :

  • https://www.britannica.com/animal/iguana-lizard-grouping
  • https://animaldiversity.org/accounts/Iguana_iguana/

समीक्षक : सुरेखा मगर-मोहिते