पूर्वज्ञान व पूर्वानुभव यांच्या आधारे नवीन ज्ञानाची किंवा संकल्पनेची रचना-निर्मिती करणे, म्हणजे ज्ञानरचनावाद होय. ज्ञानरचनावाद ही शिक्षणशास्त्रातील नव-संकल्पना असून ती एक अध्ययनाचे तत्त्वज्ञान आहे. ज्यामध्ये ज्ञानाची रचना ही आपल्या अनुभवाच्या परावर्तनामध्ये होते. यानुसार विद्यार्थी स्वत:चे ज्ञान स्वत: संरचित करतात. ज्ञानरचनावाद हे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (एनसीएफ २००५) याचा पाया असून बालकांचा मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क अधिनियम २००९ मधील कलम २९ मध्ये ज्ञानरचनावादाचे तत्त्वे आढळतात.

अनेक तज्ज्ञांनी ज्ञानरचनावादावर व्याख्या केल्या आहेत. त्यांपैकी जानसिन यांच्या मते, ‘ज्ञानरचनावाद ही एक अध्ययनाची उपपत्ती असून मुले त्यांच्या मानसिक प्रक्रियांच्या आधारे ज्ञानाची रचना करतात’.

मार्श यांच्या मते, ‘ज्ञानरचनावाद ही एक उपपत्ती आहे. ज्यामध्ये अध्ययनार्थी स्वत:ला आलेल्या अनुभवाच्या आधारे ज्ञानाची रचना कसे करतो, याचा विचार केला जातो.’

फॉसनॉट यांच्या मते, ‘ज्ञानरचनावाद ही ज्ञान व अध्ययन या संदर्भातील उपपत्ती असून ती काय माहिती करून घ्यायची आणि एखादी माहिती कशी प्राप्त करून घेतो, यांविषयीचे विवेचन करते’.

ज्ञानरचनावादी शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीला संधी देणे, त्यांच्यात असलेल्या विविध बुद्धिमत्तांचा त्यांनाच शोध घेऊ देणे, केवळ लेखन, वाचन, पाठांतर, वेगवेगळ्या लेखी चाचण्या यांवर भर न देता त्यांनाच त्यांच्या कल्पकतेचा वापर करण्यास भाग पाडून विविध विषयांचे आकलन स्वत:च करण्याची संधी देणे इत्यादी तंत्रांचा वापर करून विद्यार्थ्यांना शिकविणे अपेक्षित आहे. शिक्षकाने वर्गामध्ये विद्यार्थी स्वत:हून अध्ययन करतील असे वातावरण निर्माण केले, तर त्यांच्या मदतीने विद्यार्थी स्वत:च्या ज्ञाननिर्मितीचा पाया रचत जातात. यालाच ज्ञानरचनावाद सिद्धांत म्हणतात.

ज्ञानरचनावादात विद्यार्थी मानसिक प्रक्रियांच्या आधारे स्वत: ज्ञानाची रचना करतात. यामध्ये विद्यार्थ्यांचे अध्ययन कसे घडते, हे पाहण्यात अधिक रस असतो. अनुभवाच्या आधारे ज्ञानाची रचना केली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याच्या ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया दुसऱ्याहून भिन्न असते. विद्यार्थी स्वत: त्याला आलेल्या अनुभवाच्या आधारे ज्ञाननिर्मिती करतो. तो सक्रिय अध्ययनकर्ता असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अधिकाधिक ज्ञानाची निर्मिती करण्यासाठी शिक्षक व विद्यार्थ्यांमध्ये इयत्तेनुसार चर्चा, गटचर्चा, वेगवेगळे प्रकल्प, विविध खेळ, प्रयोग, शब्दकोडी, नाटके व त्यातील पात्रांचे सादरीकरण इत्यादी तंत्रांचा वापर ज्ञानरचनावादी शिक्षणात करावेत.

ज्ञानरचनावाद ही अध्ययनाची उपपत्ती असून या उपपत्तीनुसार विद्यार्थ्याला अपरिचित परिस्थितीला सामोरे जावे लागत असल्याने प्रथम तो आपले पूर्वानुभव आठवू लागतो. त्यातील ज्या अनुभवांचे नव्या परिस्थितीतील घटकांशी साम्य असते, त्यांचा उपयोग ती परिस्थिती समजून घेण्यासाठी तो करू लागतो. तेथून त्याची आकलनाची प्रक्रिया सुरू होते; परंतु पुढे असे घटक येतात की, जे अपरिचित असतात. कारण, त्यांच्याशी विद्यार्थ्यांच्या पूर्वानुभवाचे काहीच संबंध नसते. ते नवे घटक समजून घेत असताना आपल्या सोयीनुसार कल्पना, तर्क, अनुमान अशा प्रक्रियांची त्याला मदत घ्यावी लागते. त्यातून परिस्थितीतील अपरिचितपणा कमी होऊ लागतो अथवा समस्येतील घटकांचे परस्परसंबंध लक्षात येऊ लागतात; परंतु दर वेळेस असे घडेलच असे नाही. अशा कुचंबनेच्या वेळी बरोबरच्या सहाध्यायांशी चर्चा झाली अथवा शिक्षकांनी काही शोधक प्रश्न विचारले अथवा कांही संदर्भ सुचविले, तर त्यांच्या साहाय्याने त्याच्या विचारप्रक्रियेत निर्माण झालेले अडथळे दूर होतात आणि त्याला परिस्थितीचे आकलन होते किंवा समस्येचे उत्तर सुचते. अशा प्रकारे झालेल्या आकलनालाच विद्यार्थ्यांची ज्ञाननिर्मिती असे म्हटले जाते.

ज्ञानरचनावाद हे मानवी आकलनाची प्रक्रिया स्पष्ट करणारे तत्त्वज्ञान आहे. तो मूलत: माणसाच्या शिकण्याविषयीचा सिद्धांत आहे. ज्ञानरचनावादाला तत्त्वज्ञान व मानसशास्त्र यांचा आधार आहे. ज्ञानमीमांसा या तत्त्वज्ञानाच्या शाखेमध्ये मानवी ज्ञानाचे स्वरूप काय आणि त्याचे आकलन विविध शोधनपद्धती किंवा अन्वेषणपद्धतीद्वारे कसे होते, याचा विचार ही शाखा करते. ज्ञानाचे उगमस्थान कोणते? ज्ञानसंपादन कसे केले जाते? प्राप्त ज्ञानाची सत्यता काय? ज्ञानप्राप्तीचे मार्ग कोणते? अशा अनेक प्रश्नांचा शोध ज्ञानमीमांसा ही शाखा घेत असते. आज ज्ञान विषयक दोन दृष्टीकोन प्रभावी आहेत. पहिला, वस्तुनिष्ठवादी दृष्टीकोन आणि दुसरा, ज्ञानरचनावादी दृष्टीकोन. ज्ञान हे अंतिम सत्य आहे आणि ज्ञान हे वस्तुनिष्ठ आहे या कल्पना ज्ञानरचनावाद स्वीकारत नाही. त्यामुळे ज्ञान एक पवित्र ठेवा आहे, अंतिम सत्य आहे आणि याचे संक्रमण करता येते, या संकल्पना व्यर्थ ठरतात. म्हणजेच, ज्ञान हे केवळ व्यक्तिनिष्ठ असते, असे ज्ञानरचनावाद मानतो.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात स्विस मानसशास्त्रज्ञ व शिक्षणशास्त्रवेत्त झां प्याजे व रशियन मानसशास्त्रज्ञ लेव्ह सेमेनोव्हिच व्योगोट्स्की यांनी मुलांवर प्रयोग केले. तेव्हा त्यांना असे दिसून आले की, मुलेच स्वप्रयत्नांतून ज्ञाननिर्मिती करतात. हा विचार बोधात्मक मानसशास्त्रज्ञांनी उचलून धरला आणि त्याचा विस्तार ज्ञानरचनावादात झाला. मुले सभोवतालच्या जगाचा अर्थ कसा लावतात, हे जाणून घेण्यासाठी प्याजे यांनी मांडलेली ‘बोधात्मक विकासाची उपपत्ती’ अत्यंत महत्त्वाची मानली जाते. त्याच बरोबर लेव्ह यांनी मुलाचा विकास कसा होतो, हे अभ्यासताना ‘मुलांच्या विकासात विचारप्रक्रिया आणि भाषा यांचा फार मोठा वाटा असतो’, याची नोंद घेतली. त्याच बरोबर अमेरिकन शिक्षणतज्ज्ञ जेरॉम ब्रुनर यांनी आपल्या शिक्षणाची प्रक्रिया या पुस्तकात संकल्पनेचे विचारप्रक्रियेतील आणि पर्यायाने शिक्षणातील महत्त्व सांगितले आहे.

ज्ञानरचनावादाचे प्रकार : बर्निंग यांनी ज्ञानरचनावादाचे तीन प्रकार सांगितले आहेत.

(१) बोधात्मक ज्ञानरचनावाद : हा प्रकार माहिती प्रक्रियाकरण आणि बौद्धिक प्रक्रियेचे घटक यांच्याशी संबंधित आहे. ज्ञान मिळविणे ही एक अनुकुलनक्षम प्रक्रिया आहे आणि ती विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विचार प्रक्रियेवर अवलंबून असते. हा प्रकार प्याजे यांच्या बोधात्मक विकासाच्या उपपत्तीवर आधारित आहे. वाढीच्या विशिष्ट अवस्थांमध्ये क्रमाक्रमाने प्राप्त झालेल्या बौद्धिक क्षमतांनुसार मूले भोवतालच्या जगाचा अर्थ लावत असतात. त्यानुसार ते सभोवतालच्या जगाला प्रतिसाद देत असतात. यातून मिळणाऱ्या अनुभवातून मुलांच्या मनात क्रमाने नवनवीन बोधात्मक रचना तयार होते. व्यक्तिपरत्वे येणारे अनुभव भिन्न असल्यामुळे तयार होणाऱ्या बोधात्मक रचनाही भिन्न असतात.

प्याजे यांनी मांडलेल्या उपपत्तीवर काही तज्ज्ञांनी टीका केली आहे. त्यामध्ये मानशास्त्रज्ञ मार्गारेट मीड यांनी सांस्कृतिक फरकामुळे विविध मानवी समाजातील मुलांच्या विकसनावर आणि त्यामुळे वर्तनावर होणारा परिणाम लक्षात आणून दिला. आई-वडिल, भावंडे, मित्र, शिक्षक, समाज यांच्याशी होणाऱ्या आंतरक्रियांची दखल प्याजे यांनी घेतली नाही, अशी टीका काही समाजशास्त्रज्ञांनी केली. म्हणून प्याजे यांच्या ज्ञानरचनावादाला वैयक्तिक/बोधात्मक ज्ञानरचनावाद असे म्हटले जाते.

(२) सामाजिक ज्ञानरचनावाद : लेव्ह यांनी सामाजिक ज्ञानरचनावाद या प्रकाराचा पुरस्कार केला. त्यांच्या मते, ‘मुलांच्या विकासात विचारप्रक्रिया व भाषा यांचा फार मोठा वाटा असतो. त्याचबरोबर बोधात्मक विकासात सामाजिक आंतरक्रियांचाही वाटा असतो. या आंतरक्रिया जशा कृतीतून घडतात, तशा संभाषणातूनही घडतात. ज्ञान मिळविण्याची सुरुवात इंद्रियांद्वारे मिळणाऱ्या संवेदनातून होत असली, तरी इतरांशी होणाऱ्या भाषिक आंतरक्रियांतून संवेदनाचे अवबोधात आणि अवबोधांचे संबोधात रूपांतर होत असते. त्यावर मानसिक प्रक्रिया घडत असतात. म्हणजे ज्या गटाबरेाबर आंतरक्रिया होते, संवाद होतो, त्या गटात प्रथम ज्ञाननिर्मिती घडते आणि नंतर व्यक्तीच्या मनात संवाद होऊन मग तिथे ज्ञाननिर्मिती घडते’. लेव्ह यांनी ज्ञाननिर्मिती घडताना शिकणाऱ्याच्या इतरांबरोबरच्या तसेच स्वत:च्या मनाशी होणाऱ्या प्रतिक्रियांना दिलेले महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या ज्ञानरचनावादाला ‘सामाजिक ज्ञानरचनावाद’ असे म्हणतात.

(३) मूलगामी ज्ञानरचनावाद : अर्नेस्ट व्हॉन ग्लॅसरफेल्ड हे मूलगामी ज्ञानरचनावादाचे पुरस्कर्ते मानले जाते. त्यांच्या मते, ज्ञान म्हणजे मानवी मेंदूची स्वसंघटनात्मक बौद्धिक प्रक्रिया होय. ज्ञाननिर्मितीची प्रक्रिया स्वनियंत्रित असून ज्ञानाचे संकलन करण्याऐवजी ज्ञानाची रचना केली जाते. ज्ञान हे वस्तूनिष्ठ नसून ते जाणून घेणाऱ्याच्या संरचनेवर अधारित असते. यानुसार अर्थ प्रत्येकाच्या मनामध्ये अस्तित्वात असतो. त्याचे संक्रमण होऊ शकत नाही. अर्थ किंवा आकलन अनुभवामुळे मोजक्या शब्दांत मांडता येतो व आवश्यकतेनुसार त्यात सुधारणा करता येतात.

ज्ञानरचनावादाची गृहितके :

  • (१) अनुभवातून ज्ञानाची रचना होते.
  • (२) अध्ययन ही एक कृतीयुक्त प्रक्रिया असून यामध्ये अनुभवाद्वारे अर्थनिर्मिती होते.
  • (३) सहकार्यात्मक अध्ययनात प्रत्येकाने अनुभवांवर आधारित लावलेल्या अर्थानुसार चर्चेद्वारे आंतरक्रिया घडते. त्यामुळे स्वत:चे विचार बदलून अचूक संकल्पनेवर धारणा पक्की होते. संकल्पना अधिक स्पष्ट होतात.
  • (४)  ‘अध्ययन’ हे वास्तववादी वातावरणामध्ये घडले पाहिजे, मूल्यमापन हे अध्ययन प्रक्रियेचाच एक भाग असले पाहिजे, ते वेगळे असता कामा नये.
  • (५) अध्ययनार्थ्याकडून ज्ञानाची क्रियाशील रचना केली जाते.
  • (६) माहिती होणे किंवा माहिती करून घेणे ही अध्ययनार्थ्यांच्या अनुभवांशी सभोवतालच्या जगाचे संघटन व समायोजन साधण्याची प्रक्रिया आहे.
  • (७) अध्ययनार्थी स्वतंत्र जगाचा शोध त्याच्या मनाशिवाय घेऊ शकत नाही. म्हणजेच, शोध हा अध्यनार्थ्यांच्या मनामध्ये कल्पनेद्वारे घेतला जातो.

ज्ञानरचनावादाची वैशिष्ट्ये :

  • (१) ज्ञानरचनावादी शिक्षणपद्धतीमधील अध्ययन ही सक्रीय प्रक्रिया असून विद्यार्थी स्वत: अध्ययन करतात. म्हणजेच ज्ञानाची निर्मिती हे स्थिर नसून गतिशिल आहे.
  • (२) ज्ञानरचनावादी शिक्षणात पूर्वज्ञान आणि पूर्वानुभव यांच्या आधारे विद्यार्थी स्वत: आपल्या ज्ञानाची रचना करून अध्ययन करीत असतो.
  • (३) विद्यार्थी स्वत:हून आपल्या संकल्पनेची मांडणी करीत असतो. ही प्रक्रिया सतत करून त्याच संकल्पनेत नवीन भर घालून तिची पुनरमांडणी तरीत असतो.
  • (४) सामाजिक, भाषिक व सांस्कृतिक या आंतरक्रीयेमुळे विद्यार्थ्यांना ज्ञानाची निर्मिती करण्यास फायदा होतो.
  • (५) ज्ञानाची निर्मिती होत असताना स्थानिक वातावरण व परिस्थिती यांचा त्यामध्ये मोठा वाटा असतो.

ज्ञानरचनावादी विचारसरणी :

  • (१) ही विचारसरणी मुलांच्या शिक्षणावर भर देते. त्यामुळे शिक्षकांची वाटचाल ‘शिकविण्याकडून शिकण्याकडे’ होण्यास मदत होते.
  • (२) मुलांचे अध्ययन पूर्णाकडून भागाकडे या अध्ययन सूत्रानुसार घडते.
  • (३) ही विचारसरणी शिकणाऱ्या मुलामुलींविषयी शास्त्रीय माहिती सांगते.
  • (४) प्रत्येक मुलामुलींच्या पातळीवर घडणारी शिकण्याची प्रक्रिया कशी भिन्न असते, याचे ज्ञान आपल्याला देते.
  • (५) व्यवहाराशी जुळवून घेऊन मुलांना शिक्षण कसे द्यावे, याचे मार्गदर्शन याद्वारे होते.
  • (६) ही विचारसरणी आपल्याला पुस्तकी अभ्यासाकडून वास्तव अनुभवाकडे वळण्याचा दृष्टिकोन बहाल करते.
  • (७) ज्ञानरचनावादाचे महत्त्वाचे ध्येय म्हणजे वास्तव जगाशी निगडित अध्ययनातून समाजाची निर्मिती करणे हे आहे.

अधिक व्यक्तिनिष्ठ असणे, वेळखाऊ व खर्चिक असणे, मुलांकडे यशस्वी होण्यासाठी उच्च प्रतीची स्वव्यवस्थापनक्षमता असलीच पाहिजे, जी प्रत्येक मुलाकडे असतेच असे नाही. अशा प्रकारचे आक्षेप काहिंनी घेतले असले, तरी याची उपयुक्तता अधिक असल्याचे दिसून येते.

ज्ञानरचनावादाच्या महत्त्वाच्या अभ्यासकांमध्ये प्याजे व लेव्ह यांच्याबरोबर इटालियन तत्त्ववेत्ता जिआम्बतिस्ता विको यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. त्यांनी मूलगामी ज्ञानरचनावादाचा पुरस्कार केला. एका अर्थाने त्यांनाच ज्ञानरचनावादाचे प्रथम जनक मानले जाते. त्याच बरोबर इमॅन्युएल कांट, जॉन ड्यूई, अर्नेस्ट व्हॉन ग्लॅसरफेल्ड, के. जी. गरगेन, जेरॉम ब्रुनर इत्यादी विचारवंतांनी ज्ञानरचनावादाच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले आहेत.

संदर्भ :

  • पानसे, रमेश, रचनावादी शिक्षण, वाई, (२०१०).
  • बाम, राजश्री, मैत्री ज्ञानसंरचनावादाशी, पुणे, (२०१३).
  • Jha, Arbind Kumar, Constructivist Epistemology and Pedagogy Insight Into Teaching Learning and Knowing, New Delhi, (2009).

समीक्षक : बाबा नंदनपवार