विद्यार्थ्यांची अध्ययनक्षमता, त्यांच्यातील कच्चे दुवे (Weak Points), त्यांची शैक्षणिक पातळी इत्यादींचे नैदानिक (Diagnostic) चाचण्यांच्या साह्याने निदान करून योग्य शैक्षणिक उपचारांद्वारे त्यांच्या अध्ययनातील मागासलेपणा दूर करणे, म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय. प्रभावी शिक्षण सुनिश्चित करणे आणि शिक्षणाची गुणवत्ता सुधारणे यांसाठी उपचारात्मक अध्यापनाची गरज आहे. ज्याप्रमाणे डॉक्टर एखाद्या व्यक्तीच्या रोगाचे निदान झाल्यानंतर त्यावर योग्यप्रकारे उपचार करून लवकरात लवकर तो रोग बरा करतात, त्याप्रमाणे शिक्षक-विद्यार्थ्यांमधील दुर्बलता, न्यूनत्व, त्यांची कारणे जाणून घेऊन त्यांच्या कलेने त्यांना योग्य ते उपचारात्मक अध्यापन देऊन त्यांना सक्षम बनवितात. यामध्ये फळा व खडू यांशिवाय इतर उपचार साधनांचाही विचार केला जातो.

व्याख्या :

  • सामान्य क्षमता वगळून अन्य कारणांमुळे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण झालेली एखादी विशिष्ट त्रुटी दूर करण्यासाठी दिलेले शिक्षण, म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय.
  • अपेक्षित उद्दिष्टापर्यंत मजल मारू न शकलेल्या विद्यार्थ्यांसाठी केले जाणारे अध्यापन, म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय.
  • कोणत्या न कोणत्या कारणाने अपेक्षित अध्यापन पातळी गाठू न शकलेल्या विद्यार्थ्यांना दिले जाणारे शिक्षण, म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय.
  • सतत जाणवणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी केले जाणारे अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय.
  • सर्वसाधारण शाळेत जाणाऱ्या सामान्य मुलांत अपेक्षित अध्यापनपातळीबाबत जे दोष दिसून येतात, ते दूर करणारे अध्यापन म्हणजे उपचारात्मक अध्यापन होय.

उपचारसाहित्य कोणत्या प्रकारचे व स्वरूपाचे असावे यासंबंधी निश्चित असे नियम नाहीत. वर्गातील विद्यार्थ्यांचे आणि त्यांच्या चुकांचे स्वरूप लक्षात घेउन त्यांवर कोणत्या प्रकारचे योग्य उपचारसाहित्य वापरता येईल, याचा निर्णय हा संबंधित शिक्षकांनीच घ्यावयाचा असतो. भारतासारख्या विकसनशील देशात शिक्षणातील स्थगन व गळती हा मोठा प्रश्न आहे. त्याचे मूळ कारण म्हणजे विद्यार्थ्यांच्या अध्यापनातील मागासलेपणा होय. काही विद्यार्थी नेहमीच्या शिक्षणातून आपली प्रगती करू शकत नाहीत. त्यामुळे शैक्षणिक सवलती आणि मानवी शक्ती वाया जाते. हे काही प्रमाणात आपण उपचारात्मक अध्यापन पद्धतीच्या साह्याने कमी करू शकतो. त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लेखनाविषयीच्या सुरुवातीच्या त्रुटींमध्ये सुधारणा करणे, त्यांच्यामध्ये रुजलेल्या चुकीच्या संकल्पना दूर करणे, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढविणे, मानसिक दुर्बलतेमुळे त्यांच्या अध्ययनात येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांना चांगल्या स्वाध्यायाच्या सवयी लावणे, त्यांच्या वागणुकीत बदल करणे, वर्गाच्या/शाळेच्या अभ्यासक्रमाद्वारे त्यांची योग्यता समृद्ध करणे इत्यादी सुधारणा केल्या जातात. त्याचप्रमाणे संकल्पना, तत्त्वे, नियम यांच्या उपाययोजनांत त्रुटी असल्यास त्यांतही काही प्रमाणात बदल करता येतात. विद्यार्थी नेमक्या कोणत्या बाबतीत मागासलेले आहेत? त्यांच्यामध्ये कोणती कौशल्ये विकसित झाली नाहीत? हे लक्षात घेऊन त्यांसाठी प्रयत्न करता येतत.

उपचारात्मक अध्यापनपद्धतीमुळे शिक्षकांसही अध्यापनास दिशा मिळते आणि विद्यार्थ्यांना नेमके कोणते शैक्षणिक अनुभव द्यावयाचे व कोणत्या अनुभवावर अधिक भर देणे आवश्यक आहे, हे लक्षात येते. शिक्षकांच्या वैयक्तिक मार्गदर्शनामुळे मंदबुद्धी विद्यार्थ्यांना आपली बुद्धीमत्ता वाढविण्यास अधिक चांगला प्रयत्न करता येतो. मंदबुद्धी विद्यार्थ्यांप्रमाणेच हुशार विद्यार्थ्यांनाही उपचारात्मक अध्यापनाची गरज असते. विद्यार्थ्यांच्या दोषांचे दिग्दर्शन करून पुढे त्यांच्याकडून ते पुन्हा होऊ नयेत म्हणून, उपाय सुचविता येतात. या अध्यापनाद्वारे विद्यार्थ्यांमधील ज्ञानाचे अंतर दूर केले जाते. अध्ययनक्षमता कमी असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षकांकडून योग्य शिक्षण मिळावे याकरिता शिक्षकही विशेष प्रशिक्षणप्राप्त असावे लागतात.

उपचारात्मक अध्यापनाची पूर्वतयारी करताना नैदानिक चाचणीचा विचार करून चुकांच्या कारणांचा संदर्भ शिक्षकास लक्षात घ्यावा लागतो. प्रथमत: स्वत:चे अध्यापनकौशल्य, अध्यापनपद्धती तंत्र यांसंदर्भात सखोल विचार करावा लागतो. स्वत:च्या आशय ज्ञानाची समृद्धता वाढवावी लागते. आशय-विश्लेषण पुन्हा तपासून ते अधिक सूक्ष्म कसे करता येईल, याचा विचार त्यांना करावा लागतो. उपचारात्मक कार्यक्रम ठरवावे लागतात. अध्ययन-अनुभवांची श्रेणीबद्ध मांडणी करावी लागते. अध्ययनप्रक्रियेवर भर देणारे अध्ययन-अनुभव निवडावे लागतात.

उपचारात्मक अध्यापनाची कार्यवाही करताना प्रथम नैदानिक चाचणी व निरिक्षणतंत्राचा वापर करून विद्यार्थ्यांचे दोष, उणिवा यांची यादी करावी. दोष दूर करण्यासाठी अध्ययन-अनुभूती व शैक्षणिक साधने यांची निश्चिती करावी. त्यानंतर दोषानुरूप विद्यार्थ्यांचे गट करावेत. अध्यापनाचे नियोजन करून प्रत्यक्ष अध्यापन करावे. त्यातून दोषांचे दिग्दर्शन करणे, उपाय सुचविणे, दोष दूर करण्याचे प्रयत्न करणे इत्यादी प्रक्रिया कराव्या लागतात. शेवटी विद्यार्थ्यांमधील उणिवा दूर झाल्यात का, याची प्रावीण्य चाचणी घ्यावी लागते. त्यानंतरही विद्यार्थ्यांमध्ये काही त्रुटी आढळल्यास पुन्हा वरीलप्रमाणेच प्रयत्न करावे लागतात. ही सतत चालणारी प्रक्रिया आहे.

उपचारात्मक अध्यापनाचा सर्वच स्तरांवर उपयोग केला पाहिजे. खालच्या वर्गातून आकलन, उपयोजन अथवा कौशल्यांत काही दोष व त्रुटी राहिल्यास, वरच्या वर्गातील विषयांश समजणे, कौशल्याचा विकास होणे अतिशय कठीण होते. एकाच इयत्तेतील सर्वच विद्यार्थ्यांची आकलनक्षमता समान पातळीत आणण्यासाठी उपचारात्मक अध्यापनाचे महत्त्व आहे. उपचारात्मक अध्यापनासंबंधी काही वेळा शिक्षक, पालक किंवा विद्यार्थी यांमध्ये चुकीची कल्पना, विचार निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून त्यासंबंधी पुढील बाबी लक्षात घेणे तितकेच आवश्यक आहे :

  • उपचारात्मक उपायांची गरज असलेला विद्यार्थी मंद बुद्धीचाच असतो, असे समजू नये.
  • हुषार विद्यार्थ्यांना उपचारात्मक उपायांची गरज नाही, असे गृहीत धरू नये.
  • विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निदान न करता उपायांना सुरुवात करू नये.
  • ज्या विद्यार्थ्यांसाठी असे उपाय योजले जातात, त्यांची जाहीर वाच्यता करू नये.
  • केवळ बोधात्मक क्षेत्रातच उपचारांची आवश्यकता असते असे नाही, तर भावात्मक व क्रियात्मक क्षेत्रांतही त्यांची गरज असते, हे लक्षात घ्यावे.

नेहमीचे अथवा सर्वसाधारण अध्यापन आणि उपचारात्मक अध्यापन यांमधील फरक असा :

  • उद्दिष्टे : उपचारात्मक अध्यापनात कारणांचा शोध लागल्यानंतर (निदान झाल्यानंतर) ती कारणे नाहीशी कशी करता येतील, हे प्रमुख उद्दिष्ट असते, तर नेहमीच्या आशय अध्यापनात आशयाची उद्दिष्टे महत्त्वपूर्ण असतात.
  • अध्यापन नियोजन : उपचारात्मक अध्यापनात निदानामागील कारणांच्या स्वरूपावरून विद्यार्थ्यांचे गट पाडावे लागतात. काही वेळेस व्यक्तिगत अध्यापनाचे (वैयक्तिक मार्गदर्शन) नियोजन करावे लागते. नेहमीच्या अध्यापनाचे नियोजन सर्वसाधारण विद्यार्थी समोर ठेवून केले जाते.
  • अध्यापनपद्धती : उपचारात्मक अध्यापनपद्धती विचारपूर्वक निवडावी लागते. त्यामध्ये सोपी भाषा असलेली, रंजकतेचा वापर, विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारी अध्यापनशैली असते. कृतियुक्त अध्यापनाचा विचार केला जातो. नेहमीच्या अध्यापनात वरिल बाबी अल्पप्रमाणात दिसून येतात.
  • शैक्षणिक साहित्य : उपचारात्मक अध्यापनात शैक्षणिक साहित्यांचा वापर अधिक करावा लागतो. अमुर्त संकल्पनांचे स्पष्टीकरण करण्यासाठी यांची उपयुक्तता अधिक असते. नेहमीच्या अध्यापनातही वर्तमानस्थितीत शैक्षणिक साहित्यांचा वापर होत असल्याचे दिसून येत आहे.
  • शिक्षकाची भूमिका : उपचारात्मक अध्यापनपद्धतीत शिक्षक हा वैद्यक असतो. विद्यार्थ्यांत न्यूनगंड निर्माण होणार नाही, याचा विचार त्यांना करावा लागतो. त्यांच्यात सहानुभूतीपूर्ण व प्रोत्साहक दृष्टिकोनाची आवश्यकता असते. नेहमीच्या अध्यापनात विद्यार्थ्यांचा बुद्ध्यांक सुदृढ असल्यामुळे शिक्षकाला वरील बाबींची गरज क्वचितच भासते.

समीक्षक – रघुनाथ चौत्रे

This Post Has One Comment

  1. Seema Mhaske

    very nice informative information

प्रतिक्रिया व्यक्त करा