पेट्रोलची ही इंधनी आघात क्षमता (Knocking ability) ऑक्टेन निर्देशांकाने मोजली जाते. ऑक्टेन निर्देशांक जितका अधिक, तितकी इंधनाची ज्वलनक्षमता चांगली असते. त्यामुळे एंजिनाची सुरक्षितता वाढते.
मापनपद्धती : विविध तापमानाला होणारे या इंधनाचे प्रतिशत बाष्पीभवन हे त्या एंजिनातील कार्याशी निगडित असते. आयसोऑक्टेन या रासायनिक द्रावणाचा ऑक्टेन क्रमांक १०० समजला जातो, तर एन-हेप्टेन या द्रावणाचा क्रमांक शून्य धरला जातो. या दोन रसायनांचे मिश्रण बनवून त्यांच्या इंधनी आघात क्षमतेशी इंधनाशी तुलना केली जाते. त्या मिश्रणातील आयसोऑक्टेनचे प्रमाण हा त्या इंधनाचा ऑक्टेन निर्देशांक मानला जातो. उदा., आपल्याकडे ९१ आणि ९७ ऑक्टेन निर्देशांकाची पेट्रोल इंधने वापरली जातात; म्हणजेच ९१ व ९७ % आयसोऑक्टेन रसायनाची एन-हेप्टेनसोबत होणाऱ्या मिश्रणाइतकीच या इंधनांची अनुक्रमे इंधनी आघात क्षमता असते.
ऑक्टेन निर्देशांक जितका जास्त, तितकी इंधनाची गुणवत्ता चांगली असते. हा निर्देशांक पेट्रोल या इंधनाची गुणवत्ता अचूक ठरवतो. ऑक्टेन निर्देशांक कमी असला की, इंधनाच्या एंजिनातील ज्वलनक्षमतेवर विपरित परिणाम होतो. एंजिन व्यवस्थित कार्य करू शकत नाही. ऑक्टेन निर्देशांक मोजण्यासाठी सामायिक इंधन संशोधक (Cooperative fuel research, CFR) एंजिन वापरतात.
ऑक्टेन निर्देशांक क्षय : पेट्रोलमध्ये अन्य स्वस्त इंधने आणि द्रावणे यांची भेसळ झाली तर त्याचा ऑक्टेन निर्देशांक कमी होतो. परिणामी त्याची कार्यक्षमता कमी होते.
ऑक्टेन निर्देशांक वृद्धी : ऑक्टेन निर्देशांक वृद्धीसाठी त्यात अल्पप्रमाणात शिसेयुक्त रसायने (उदा., टेट्राएथिल लेड) वापरली जात असत. परंतु एंजिनातील इंधनाचे ज्वलन होत असताना बाष्परूपात शिशाची संयुगे बाहेर पडून हवेचे प्रदूषण करतात असे आढळले. त्यामुळे या रसायन वापरावर बंदी घालण्यात आली. यामधूनच शिसेविरहित पेट्रोलचा (Unleaded petrol, ULP) वापर करण्यास सुरुवात झाली.
ऑक्टेन निर्देशांक वृद्धीसाठी (Booster) मिथिलटर्शरीब्युटिल ईथरसारखी (MTBE) सेंद्रिय रसायने वापरली जाऊ लागली. परंतु यांतूनही कर्कप्रेरकी रसायने उत्सर्जित होतात असे आढळले. त्यामुळे एमटीबीई ऐवजी एथेनॉलचा वापर करण्यात येऊ लागला.
पेट्रोलनिर्मिती करताना त्यातील सरळ शृंखलायुक्त संयुगाचे वलयी शृंखलायुक्त रसायनांमध्ये रूपांतर करून ऑक्टेन निर्देशांक वाढविला जातो. या प्रक्रियेला हायड्रोकार्बन सुधारणा (reforming) असे म्हणतात.
हायड्रोकार्बन सुधारणा : ओलेफीन हायड्रोकार्बनच्या सरळ शृंखला रेणूंचे अॅरोमटिक/वलयी प्रकारच्या शृंखला रेणूत रूपांतर करतात. यामुळे इंधनाचा ऑक्टेन निर्देशांक वाढविला जातो. बेंझिन, टोल्यूइन, झायलीन यांसारख्या शृंखलायुक्त अॅरोमटिक सेंद्रिय रसायनांनी पेट्रोलचा ऑक्टेन वाढण्यास हातभार लागतो.
उच्च ऑक्टेन निर्देशांकित संयुगे : उच्च ऑक्टेन निर्देशांक असण्याकरिता संयुगांमध्ये पुढील गुणधर्म असावे लागतात : (१) अधिकाधिक परंतु कमी लांबीच्या शृंखला असणे आणि (२) वलयी संरचना असणे.
उच्च ऑक्टेन निर्देशांकी संयुगे मिळवण्याकरिता पुढील पद्धतींचा वापर करतात :
(१) समघटकीकरण (Isomerisation) : उत्प्रेरकाच्या सान्निध्यात संयुगाला उष्णता दिली असता त्या संयुगाचा रचनात्मक समघटक तयार होतो. उदा., पेंटेन (ऑक्टेन निर्देशांक = ६२) या सरळ शृंखला अल्केनाला उत्प्रेरकाच्या सान्निध्यात उष्णता दिली असता २-मिथिलब्युटेन (ऑक्टेन निर्देशांक = ९३) तयार होतो.
परिणामी पेंटेनपेक्षा २-मिथिलब्युटेन हा पेट्रोलसाठी अधिक योग्य घटक ठरतो.
(२) डीहायड्रोसायक्लायझेशन (Dehydrocyclisation): सरळ शृंखलायुक्त संयुगाचे उत्प्रेरकाच्या सान्निध्यात वलयी संयुगात रूपांतर केल्यास हायड्रोजन वायू मुक्त होतो. उदा., हेक्झेनचे (ऑक्टेन निर्देशांक = २५) रूपांतर सायक्लोहेक्झेनमध्ये (ऑक्टेन निर्देशांक = ८३) करतात. सायक्लोहेक्झेनचे रूपातंर बेंझीनमध्ये (ऑक्टेन निर्देशांक = ११४) करतात. यासाठी प्लॅटिनम/ॲल्युमिनियम ऑक्साइड (Pt/Al2O3) हा उत्प्रेरक वापरतात.
(३) उत्प्रेरकी भंजन (Catalytic cracking) : जड तेलाला (केरोसीन किंवा डीझेल) उत्प्रेरकाच्या सान्निध्यात उष्णता दिली असता त्याचे अनेक संतृप्त आणि असंतृप्त संयुगांमध्ये रूपांतर होते. यांपैकी साधारणत: संतृप्त संयुगांचा ऑक्टेन निर्देशांक अधिक असल्याने ते पेट्रोलनिर्मितीमध्ये वापरतात.
दक्षता : ऑक्टेन निर्देशांक वाढविताना बेंझीनसारख्या कर्कप्रेरकी रसायनाचे इंधनात अत्यल्प प्रमाण राहील याची दक्षता घ्यावी लागते. बेंझीनचे प्रमाण मोजण्यासाठी वायुवर्णलेखन (Gas Chromatography) पद्धती वापरतात.
एथेनॉलमिश्रित पेट्रोलचा ऑक्टेन निर्देशांक वाढीव असतो. या मिश्र-इंधनांमुळे पेट्रोलची बचत होते आणि त्याची गुणवत्ता देखील वाढते.
पहा : पेट्रोल.