पुरोहित, जगन्नाथ जनार्दन (गुणीदास) : (१२ मार्च १९०४ – २० ऑक्टोबर १९६८). महाराष्ट्रातील एक प्रतिभावंत व नामवंत यशस्वी गायक व संगीताचार्य. त्यांचा जन्म तेलंगणातील हैदराबाद (दक्षिण) येथील एका गरीब भिक्षुक कुटुंबात झाला. ते लहान असतानाच त्यांच्या आईचे निधन झाले आणि ते दहा वर्षांचे असताना वडिलांचेही निधन झाले. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण थांबले; पण बालवयातच गाण्याची आवड असलेल्या जगन्नाथबुवांना त्यांच्या वडिलांनी अनेक मैफिलांना नेले होते, त्यामुळे त्यांच्यात गाण्याची आवड निर्माण झाली. त्यावेळी हैदराबादमध्ये सिंकदरावाले मोहम्मद अली, तानरसखाँच्या घराण्यातील शब्बूखाँ आदी नामवंत  संगीतकार मंडळी राहात होती. मोहम्मद अलींकडून जगन्नाथबुवांनी पहिली पाच वर्षे तालीम घेतली. तसेच शब्बूखाँ, तलवंडीवाले गुलाम मोहमद अशा अवलियांना आपल्या सेवावृत्तीने वश करून मोठ्या कष्टाने जगन्नाथबुवांनी संगीतविद्या मिळविली. या सर्वांकडून अनेक चिजा जगन्नाथबुवांना मिळाल्या. अहमदजान थिरकवा आणि मेहबूबखाँकडून त्यांनी तबल्याचे शिक्षण घेतले. प्रत्येकाची वैशिष्ट्ये जपत आपली गायकी समृद्ध करत करत बुवा कोल्हापूरला आले. बेळगावच्या काँग्रेस अधिवेशनात, आग्रा घराण्याचे उस्ताद विलायत हुसेनखाँ यांच्या गाण्याने ते भारावले आणि काही दिवसानंतर खाँसाहेबांचे शिष्यत्व त्यांनी पत्करले. हे आंतरिक जिव्हाळ्याचे संबंध खाँसाहेबांच्या निधनापर्यंत (१९६२) राहिले.

संगीतप्रेमी आबासाहेब मुजुमदार यांच्या एकसष्टीनिमित्त पुण्यात १९४६ साली कुमार गंधर्वांचे गायन झाले. ते त्यावेळी जगन्नाथबुवांचा राग जोगकंस गायले. या रागामुळे बुवा एकदम प्रकाशझोतात आले. तिथे उपस्थित असलेले राम मराठे, सुरेश हळदणकर आदींनी बुवांकडे शिकण्याचे ठरवून त्यांना मुंबईला आणले आणि तेव्हापासून बुवांच्या आयुष्यात नवे पर्व अवतरले.

जगन्नाथबुवांना आग्रा घराण्याची तालीम मिळाली असूनही बुवांनी स्वत:ची अशी एक खास वेगळी गायकी (शैली) निर्माण केली. स्वत: तबला वाजविण्यास शिकल्यामुळे लयकारीची आकर्षकता त्यांच्या गायनात दिसे. बोलांची भावस्पर्शी फेक, स्वरांचे रसपूर्ण लगाव, सहज लयकारी ही बुवांची खास सांगीतिक वैशिष्ट्ये होती.

शिष्य आणि गुरू याबरोबरच ‘नायक’ म्हणून जगन्नाथबुवांनी दिलेले योगदानदेखील मोठे आहे. संगीत कलाक्षेत्रात नवनवे राग रचण्यात आणि त्यांमध्ये वेगवेगळ्या चिजा बांधण्यासाठी बुवांनी यशस्वी प्रयत्न केले. त्यांनी ‘गुणिदास’ या नावाने अनेक भावपूर्ण बंदिशी रचल्या. गुरू विलायत हुसेनखाँसाहेब (प्राणप्रिया) यांना आळविण्यासाठी त्यांनी प्रसंगानुरूप अनेक बंदिशी रचल्या, राग रचले ते आजही गायले जातात आणि अशा तऱ्हेने प्राणप्रिया-गुणिदास जोडी अमर झाली. या बंदिशींमधील स्वरांशी मेळ राखणारी नादमधुर भाषा हे त्यांचे वैशिष्ट्य होय. याशिवाय यातील रागिणीचे स्पष्ट स्वरूप, स्वरांचा छायाप्रकाश, चीजेचे आकर्षक तोंड, स्थायी अंतरायामधील संवाद या साऱ्या गोष्टी सौंदर्यपूर्ण आहेत. जोगकंस, स्वानंदी, जौन भैरव, मनरंजनी हे त्यांचे राग मैफलींमध्ये वेगळाच रंग भरतात.

मुंबईत जगन्नाथबुवांना अनेक प्रतिभावंत शिष्य मिळाले अणि दर्जेदार शिष्यपरंपरेमुळे संगीतक्षेत्रांत त्यांना मानाचे स्थान मिळाले. पं. राम मराठे, माणिक वर्मा, जितेंद्र अभिषेकी, सी. आर. व्यास, प्रभुदेव सरदार, मालती पांडे, कुंद वेलिंग, पौर्णिमा तळवलकर यांसारख्या रागदारी गायकांनी बुवांचा लौकिक तर वाढविलाच,  शिवाय जी. एन. जोशी, जे. एल. रानडे, मोहनतारा अंजिक्य आदि सुगम संगीतगायक आणि सी. एच. आत्मा, मन्ना डे, महेंद्र कपूर हे चित्रपट पार्श्वगायकही बुवांकडे आकर्षित झाले. बुवांनी कोणताही भेदभाव न करता सर्वांना मनापासून तालीम दिली. प्रत्येक शिष्यामधील कलागुणांचा बुवांनी विचारपूर्वक विकास केला. उस्ताद थिरकवा खाँसाहेबांकडून मिळालेली विद्या त्यांनी भाई गायतोंडे व नाना मुळे यांनाही दिली.

डोंबिवली, मुंबई येथे त्यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते अविवाहित होते. त्यांच्या स्मरणार्थ स्थापन झालेल्या पं. गुणिदास प्रतिष्ठानतर्फे संपूर्ण भारतभर संगीतविषयक विविध कार्यक्रम केले जातात.

संदर्भ : 

  • त्यागी, मंजुश्री, पं. जगन्नाथबुवा पुरोहित (गुनिदास) व्यक्तित्व एवं कृतित्व, कनिष्क पब्लिशर्स, २००३.

समीक्षक : सु. र. देशपांडे