पार्कर, फ्रॅन्सिस वेलँड : (९ ऑक्टोबर १८३७–२ मार्च १९०२). अमेरिकेतील प्रगमनशील शिक्षणाचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म मॅसॅचूसेट्स संस्थानात बेडफोर्ड येथे झाला. त्यांनी वयाच्या सोळाव्या वर्षी अध्यापनाचे कार्य सुरू केले. १८६१ साली सुरू झालेल्या अमेरिकन यादवी युद्धाच्या वेळी त्यांनी सैन्यात प्रवेश केला. तेथे त्यांस ले. कर्नल या पदापर्यंत बढती मिळाली. सैन्यातून परतल्यावर ओहायओ राज्यातील डेटन येथे त्यांनी शिक्षकाची नोकरी केली.

पार्कर यांनी १८७२ – १८७५ ही तीन वर्षे यूरोपचा प्रवास केला. त्यांनी जर्मनीमध्ये हर्बर्ट यांच्या शिक्षणातील पंचपदीचा अभ्यास केला, फ्रीड्रिख फ्रबेल (Friedrich Fröbel) यांच्या बालवाटिकांच्या कार्याचे अवलोकन केले व रिटर यांच्या भूगोल अध्यापनाच्या नव्या पद्धतींचे परिशीलन केले. यूरोपहून परतल्यावर १८७५ – १८८० या कार्यकाळात ते क्विन्सी (मॅसॅचूसेट्स) येथील शाळेचा प्रमुख झाले. तेथेच त्यांनी प्रगमनशील शिक्षण (Progressive Education) याची चळवळ सुरू केली. पुढे १८८० – १८८३ या कार्यकाळात शाळेत पर्यवेक्षक आणि १८९९ साली शिकागो येथील शिक्षणसंस्थेचा प्रमुख म्हणून त्याची नेमणूक झाली. याच संस्थेमध्ये विख्यात अमेरिकन तत्त्वज्ञ व शिक्षणशास्त्रज्ञ जॉन ड्यूई (John Dewey) हे त्यांचे सहकारी होते. सदर शिक्षणसंस्था शिकागो विद्यापीठाच्या शिक्षण विभागाचा प्रमुख भाग बनली.

पार्कर यांनी प्रगमनशील शिक्षणाच्या चळवळीत पुढील गोष्टींचा पुरस्कार केला :

  • अध्ययन- अध्यापन प्रक्रियेचे सामाजीकरण : बालकाच्या सामाजिक विकासाकडे अधिक लक्ष देण्यावर भर.
  • कृतियुक्त अध्ययन : केवळ ऐकणे आणि पाहणे यांपेक्षा कृतिद्वारा केलेल्या अध्ययनावर अधिक भर देणे.
  • अध्यापनाच्या पद्धती औपचारिक असण्यापेक्षा अनौपचारिक असणे : अध्ययन हसतखेळत व्हावे.
  • अभ्यासक्रमामध्ये विज्ञान, भूगोल यांसारख्या विषयांचा समावेश करणे.
  • शाळेमध्ये कडक शिस्तीला वाव न देणे.

पार्कर यांच्या लिखाणामुळे अध्यापनप्रक्रियेबाबतचा पारंपरिक दृष्टिकोण बदलला व अभ्यासक्रमही अधिक आधुनिक झाला. अध्ययनपद्धती व भूगोल या विषयांवर पार्कर यांनी बरेच ग्रंथलेखन केलेले आहे. त्यांनी डेव्हलपमेन्ट लेसन (सहलेखक – १८८३), हाऊ टू स्टडी जिऑग्रफी (१८८४), नोट्स ऑफ टॉक्स ऑन टिचिंग (१८९१), टॉक्स ऑन पेडगॉजिक्स : ॲन आउटलाईन ऑफ द थेअरी ऑफ कॉन्स्ट्रक्शन (१८९४), अंकल रॉबर्ट्स जिऑग्रफी (सहलेखक – २००४) इत्यादी मान्यवर ग्रंथांचे लेखन केले आहे.

पार्कर यांचे शिकागो येथे निधन झाले.

संदर्भ :

  • Curtis, S. J.; Boultwood, M. E. A.; Morris, Charles, A Short History of Educational Ideas, London, 1961.
  • Good, H.G., A History of American Education, New York, 1962.

समीक्षक – संतोष गेडाम

प्रतिक्रिया व्यक्त करा