फुकुजावा, युकिची :  (१० जानेवारी १८३५–३ फेब्रुवारी १९०१). जपानी शिक्षणतज्ज्ञ, लेखक व जपानमधील पाश्चात्त्यीकरणाच्या चळवळीचा पुरस्कर्ता. त्यांचा जन्म ओसाका येथे एका गरीब सामुराई कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण ओसाका येथे झाले. शिक्षण चालू असतानाच त्याने ड़च भाषा व संस्कृती यांचा अभ्यास केला; कारण तत्कालीन जपानमध्ये पश्चिमी संस्कृतीची ओळख असणे आवश्यक समजले जाई.

फुकुजावा यांनी तीनदा यूरोप-अमेरिकेचा प्रवास केला (१८६०, १८६२, १८६७). १८६० मध्ये प्रथमच यूरोप – अमेरिकेत गेलेल्या जपानी शिष्टमंडळाचा ते एक सदस्य होते. यूरोपचा प्रवास करून १८६२ साली त्यांनी शियो जिजो नावाचे शक्ति आणि स्वातंत्र्य यांचा पुरस्कार करणारे उत्कृष्ट पुस्तक लिहिले. सुबोध भाषेत व आवेशपूर्ण शैलीत लिहिलेले हे त्यांचे पहिले पुस्तक. त्यात देशाचे राजकारण व समाजकारण यांत नावीन्य आणण्याविषयी जपानी देशबांधवांना त्यांनी आवाहन केले.

फुकुजावा यांनी १८३८ मध्ये एक लहान शाळा केओ गिजुकुमध्ये (टोकिओ) स्थापन केली. तिचेच पुढे १८७१ मध्ये केओ विद्यापीठात रूपांतर झाले. फुकुजावाच्याच लेखन-प्रसारणावरील विचारसरणीचा पुरस्कार या विद्यापीठात केला गेला. तसेच जपानी संस्कृतीतील मानव्यविद्यांबरोबरच पाश्चात्त्य विद्यांचे शिक्षणही देण्यात येऊ लागले. त्यामुळे पुढील पिढी पाश्चिमात्य संस्कृतीच्या अनुकरणाकडे अधिक प्रमाणात वळली.

फुकुजावा हे जपानमधील पाश्चात्त्यीकरणाच्या चळवळीचा आद्य पुरस्कर्ता होय. शैक्षणिक क्षेत्रातील त्यांच्या विशेष कामगिरीमुळे जपान सरकारने विदेशी भाषांतील ज्ञानसंशोधन करण्यासाठी त्यांना निमंत्रित केले; पण त्यांनी त्यास नकार दिला. १८८२ मध्ये त्यांनी जिजी शिंपो नावाचे दैनिक काढले. लोकजागृतीसाठी या दैनिकात त्यांनी पाश्चात्त्यांचे आचारविचार व पाश्चात्त्य संस्थांच्या कार्याचे समालोचन केले. जपानचे एक प्रभावी वृत्तपत्र म्हणून ते खूप गाजले. १८९९ साली त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. जपानच्या आधुनिकीकरणात त्यांचे स्थान महत्त्वाचे आहे.

फुकुजावा यांनी थिंग्ज वेस्टर्न (१८६६), गाकुमॉन नो स्युस्युम (१८७२), दि ऑटोबायग्राफी ऑफ युकिची फुकुजावा (१८९३), ॲन आऊटलाईन ऑफ अ थिअरी ऑफ सिविलायझेशन (१८९३) इत्यादी शंभरांहून अधिक पुस्तके लिहिली असून त्यांत संसदीय राज्यकारभार, सार्वत्रिक शिक्षण, भाषासुधारणा, स्त्रियांचे अधिकार, पाश्चात्त्य चालीरीती व संस्था इत्यादी विषय हाताळले आहेत.

फुकुजावा यांचे टोकिओ येथे निधन झाले.

समीक्षक – संतोष गेडाम


Discover more from मराठी विश्वकोश

Subscribe to get the latest posts sent to your email.

प्रतिक्रिया व्यक्त करा