बेल, अँड्रू : (२७ मार्च १७५२–२७ जानेवारी १८३२). विख्यात स्कॉटिश शिक्षणतज्ज्ञ व भारतीय सहाध्यायी शिक्षणपद्धतीचा प्रवर्तक. त्यांचा जन्म सेंट अँड्रूज (स्कॉटलंड) येथे झाला. त्यांच्या जन्मगावीच त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांचे उच्च शिक्षण सेंट अँड्रूज विद्यापीठात झाले. पदवीधर झाल्यानंतर त्यांनी १७७४ ते १७८१ या काळात अमेरिकेतील व्हर्जिनिया वसाहतीत खासगी शिक्षक म्हणून काम केले. स्कॉटलंडला परतल्यावर त्यांनी अँग्लिकन चर्चचा धर्मोपदेशक (Clergyman) म्हणून दीक्षा घेतली. फेब्रुवारी १७८७ मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या लष्कराबरोबर ते धर्मोपदेशक म्हणून भारतात आले. १७८९ मध्ये मद्रास (चेन्नई) येथील यूरोपीय सैनिकांच्या अनाथ मुलांसाठी असलेल्या शाळेत अधीक्षक म्हणून त्यांची नेमणूक झाली. या शाळेत त्यांनी जो नवा प्रयोग केला, तो ‘वर्गनायक शिक्षणपद्धती’ किंवा ‘सहाध्यायी शिक्षणपद्धती (Monetary Education System)’ या नावाने ओळखला जातो. वर्गातील हुशार मुलांना प्राथमिक स्वरूपाचे पाठ शिकवून त्यांच्याकडूनच सदर पाठ इतर विद्यार्थ्यांना शिकवण्याची सोय या पद्धतीत होती. प्रशिक्षित शिक्षकांच्या अभावी विद्यार्थ्यांची मोठी संख्या असलेल्या वर्गांना शिकविणे या पद्धतीमुळे शक्य झाले. मद्रासमधील एका स्थानिक शाळेतील मुले धुळपाटीवरील अक्षरे गिरवीत असलेली पाहून त्यांना आपल्या या प्रयोगाची कल्पना सुचली.

बेल हे १७९१ मध्ये लंडनला परतले. त्यानंतर त्यांनी १७९७ मध्ये मद्रास येथील शिक्षणपद्धतीवर आधारलेले अ‍ॅन एक्सपेरिमेंट इन एज्युकेशन नावाचे पुस्तक प्रकाशित केले. बेल यांच्या पद्धतीत काही फेरफार करून क्वेकर पंथीय जोसेफ लॅंकेस्टर यांनी त्या धर्तीवर इंग्लंडमध्ये बऱ्याच शाळा स्थापन केल्या. त्यामुळे ‘बेल-लॅंकेस्टर शिक्षणपद्धत’ या संयुक्त नावाने ही पद्धत ओळखली जाऊ लागली. पुढे बेल यांना डॉर्सेट शहराच्या परिसरात तशा पद्धतीच्या शाळा सुरू करण्याचे काम देण्यात आले. विद्यार्थ्यांना शारीरिक शिक्षा देऊ नये, शाळेतील कृतिशील अध्यययाने त्यांचा हसतखेळत विकास साधावा, असे त्यांचे मत होते. बेल यांची ही शिक्षणपद्धती कमी खर्चाची, गरिबांच्या मुलांना परवडणारी व एकूण तत्कालीन पुरोगामी वातावरणाशी जुळणारी होती. या शिक्षणपद्धतीच्या प्रसारार्थ बेल यांनी १८१६ मध्ये परदेशगमनही केले. इंग्लंडमध्ये बेल यांच्या वर्गनायक शिक्षणपध्दतिचा बराच प्रसार होऊन तेथे या पद्धतीचा अवलंब सुमारे १२ हजार शाळांतून करण्यात आला होता व त्यातून सुमारे १० लक्ष मुले शिकत होती. बेल यांनी आपले सबंध आयुष्य शिक्षणप्रसारासाठी वेचले.

बेल यांचे चेल्टनहॅम येथे निधन झाले. त्यांनी आपल्या मृत्यूच्या वेळी स्कॉटीश शैक्षणिक प्रकल्पाकरीता मोठ्याप्रमाणात निधी दिला. तसेच सेंट अँड्रूज शाळेची रचना करणे, एडनबर्ग विद्यापीठ आणि  सेंट अँड्रूज विद्यापीठात शिक्षणातील चेअर प्राध्यापकाची स्थापना केली.

समीक्षक – संतोष गेडाम

This Post Has One Comment

  1. Lakhichand Patil

    Most useful site. Thanks for providing treasury of knowledge.

प्रतिक्रिया व्यक्त करा