एडलमनजेराल्ड मॉरीस : (१ जुलै, १९२९ – १७ मे, २०१४)

रोजच्या दैनंदिन जीवनात मानवी शरीरावर असंख्य जीवघेण्या जिवाणू व विषाणूंचा हल्ला होत असतो. अशा सूक्ष्म हल्लेखोरांचा नायनाट करण्याचे काम अविरतपणे चालू असते. ह्यांचा प्रतिकार करण्यासाठी, स्वस्थ  जगण्यासाठी आवश्यक असलेल्या अत्यंत महत्त्वाच्या अनेक बाबींपैकी एक बाब म्हणजे व्यक्तीची रोग प्रतिकार शक्ती. शरीरात ह्यासाठी दोन प्रकारे प्रतिकार शक्ती कार्यरत असतात. पहिली, पेशींच्या मार्फत आणि दुसरी शरीरातील नैसर्गिक द्रव पदार्थांद्वारे कार्य करते. शरीराला परक्या असलेल्या हानिकारक सूक्ष्मपदार्थांमुळे झालेला प्रादुर्भाव ह्या यंत्रणेद्वारे शरीराला समजतो. अशा हल्ला करणाऱ्या सूक्ष्म कणांना प्रतिजन (अँटीजेन) असे म्हणतात. प्रतिजनचा समाचार घेण्यासाठी  बी श्वेताणू  पेशी ( B-Lymphocyte) महत्त्वाचे काम करतात. साधारणपणे  १० १२  एवढ्या संख्येने त्या शरीरात असतात.

अशा हानिकारक पदार्थांचा शरीरात शिरकाव व संक्रमण होताच रक्तातील बी श्वेताणू  पेशी उत्तेजित होऊन त्यांची एक फौजच तयार होते. या पेशी काही विशिष्ट प्रकारची प्रथिने तयार करतात. त्यांना इम्युनोग्लोबुलीन किंवा प्रतिपिंड असे म्हणतात. अशी प्रतिपिंडे शरीरात १० २० एवढ्या प्रचंड संख्येत तयार होऊ शकतात. अमेरिकन जीवशास्त्रज्ञ जेराल्ड एडलमन हे अमेरिकेतील रॉकफेलर विद्यापीठात १९५८ सालापासून प्रतिपिंडाच्या संशोधनात व्यग्र होते. जेराल्ड एडलमन यांनी रोग प्रतिकार शक्तीच्या प्रतिपिंडे ह्या रक्तातील सैनिकांचा सखोल अभ्यास केला.

प्रतिपिंडाचे विविध रासायनिक क्रियांनी पृथक्करण करून, त्यांना लहान लहान भागात विभागले. त्या प्रथिनांच्या आकाराचा आणि कार्याचा शोध घेतला. ही इम्युनोग्लोबुलीन प्रथिने y  या इंग्रजी अक्षराप्रमाणे असतात. त्याच्या टोकांमध्ये प्रतिजनला शोधून त्यांना घट्ट पकडून व नंतर त्यांचा प्रतिकार करण्याची क्षमता असते. एडलमान यांनी प्रतिपिंडाच्या वेगवेगळ्या भागांवर आणि त्या भागांचा जैविक कामातील सहभाग यांवर संशोधन केले. प्रतिजन आणि प्रतिपिंडाचे एकत्र एकक हे अगदी कुलूप व त्याची विशिष्ट किल्ली एवढ्या परिपूर्णतेने काम करते, हे एडलमान यांनी दाखवून दिले. इम्युनोग्लोबुलीनच्या रचनेत हलक्या आणि जड अशा प्रथिनांच्या शृंखला असतात हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या ह्या संशोधनामुळे शरीरातील परक्या घटकांचा म्हणजेच जिवाणू, विषाणूच्या संसर्गाचा कसा अटकाव केला जातो हे जगासमोर आले. शरीराचे अनेक आजारापासून अनेकदा आपल्या नकळत आपले कसे संरक्षण केले जाते, हे ज्ञात झाले. रासायनिक घटक व रचना माहीत झाल्यामुळे आधुनिक वैद्यकशास्त्रात औषधोपचारामध्येही प्रतिपिंडाचा वापर करता येऊ लागला.

एडलमान यांना त्यांच्या कामगिरीबद्दल १९७२ चे वैद्यकशास्त्राचे नोबेल पारितोषक, ब्रिटिश जीवरसायनशास्त्रज्ञ रॉडनी पोर्टर यांच्या सोबत विभागून मिळाले. ह्या दोन शास्त्रज्ञानी प्रतिपिंडे  ह्या विषयावर स्वतंत्रपणे काम केले आहे.

गर्भवृद्धीशास्त्र (Embryology) ह्या विषयात पेशी मिलाफ परमाणू (cell adhesion molecule)  ह्या प्रथिनांचा एडलमान  ह्यांनी शोध लावला. या शिवाय जेराल्ड यांनी विज्ञानाच्या इतर अनेक शाखांमध्ये मोलाची भर घातली. मेंदूच्या मज्जातंतूंद्वारे जागृतावस्थेतील संकेतवहनावर प्रकाश टाकणारे संशोधन अतुलनीय आहे. अमेरिकेतील सॅन डियागो येथे Neuroscience Institute नावाची मेंदूबद्दल उच्च शिक्षण देणारी संस्था स्थापन केली. २० वर्षे ते अध्यक्ष म्हणून या संस्थेत कार्यरत राहिले.  Mindful Brain हा शोध ग्रंथ त्यांनी आपल्या सहकारी लेखकासोबत लिहिला आहे. याशिवाय त्यांनी ५०० च्यावर शोध निबंध व वैचारिक आणि सामाजिक लिखाणही केले आहे.

अगदी मृत्यूच्या आठवडाभर आधी सुद्धा ते संस्थेत काम करीत होते.

खरे म्हणजे व्हायोलिन वादक म्हणून व्यवसायिक आयुष्याची त्यांनी सुरुवात केली होती. आयुष्याच्या एका टप्प्यावर विज्ञानाची कास धरून त्यांनी मोलाचे संशोधन केले.

संदर्भ :

  • Front Psychol. 2014; 5: 896. Published online 2014 August
  • News &Views, newsletter of scripps research institute, vol. 14, issue 17 June02,2014

समीक्षक : राजेंद्र आगरकर