मोगलांचे, विशेषत: निजाम-उल्-मुल्क व मराठे यांत झालेले इ. स. १७३७-३८ दरम्यानचे युद्ध.

पार्श्वभूमी : निजाम-उल्-मुल्कला दिल्लीमध्ये बोलावून त्याचा जंगी सत्कार करण्यात आला. पहिल्या बाजीरावांचा निर्णायक पराभव करण्यासाठी त्याला बादशाहाने ३४,००० चे सैन्य आणि एक कोटी रुपये दिले. शिवाय त्याचे १५,००० चे सैन्य होतेच. वाटेत दुआबात सफ्तरजंग आणि बुंदेलखंडात छत्रसालचे दोन पुत्र आपल्या सैन्यांसह येऊन मिळाले. हैदराबादहून तोफखाना उत्तरेकडे धाडण्याचे आणि आपला धाकटा मुलगा नासीरजंगला सेनेसह तापी नदीवर पोहचून बाजीरावांना अडवण्याचे आदेश त्याने दिले. निजामाचे सैन्य ८० हजार ते लाखाच्या घरात पोहचले होते. उलट बाजीरावांकडे शिंदे, होळकर यांच्या शिबंदीसह केवळ २० ते २५ हजारांचे घोडदळ होते. त्यांच्याकडे तोफखान्याचा पूर्ण अभाव होता. दोन्ही परस्परविरोधी सेना भोपाळ परिसरात डिसेंबर १६३७ च्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यादरम्यान पोहचल्या आणि लढाईला तोंड लागले.

रणांगणाची ठेवण : भोपाळचे सरोवर ८ मैल आणि २ मैल रुंद आहे. भोपाळचा किल्ला पूर्व-पश्चिम पसरलेल्या भोपाळच्या सरोवराच्या ईशान्येला आहे. त्याच्या दोन्ही बाजूला पाणी आहे आणि सर्व बाजूंनी तो किल्ला शहराने वेढलेला आहे. किल्ल्यापुढील जमीन दोन मैलांच्या अंतरापर्यंत दक्षिणेकडून उत्तरेस उंचावत जाते. किल्ल्यासमोर एक नाला वाहत जातो. किल्ल्यावर हल्ला चढवणाऱ्या कोणत्याही दस्त्यांना त्याचा अडथळा होऊ शकतो; परंतु त्याचबरोबर किल्ल्याचे संरक्षण करणाऱ्या तुकड्यांच्या हालचालींवरही तो तितकाच अडसर घालू शकतो.

लढाईपूर्व हालचाली : निजामाच्या प्रचंड सैन्याला भोपाळचा किल्ला आणि आजूबाजूच्या मर्यादित परिसरात राहणे शक्य नव्हते. म्हणून त्याने सर्व सामान तिथून ३६ किमी.वर असलेल्या रैझनच्या किल्ल्यात ठेवले. त्यात त्याच्या रसदीचाही समावेश होता. तो स्वत: भोपाळच्या किल्ल्यात ठाण मांडून बसला. रघोजी भोसले याने खानदेशात शुजाअत खानाचा पराभव करून दक्षिणेतून निजामाच्या मदतीस भोपाळला सैन्य जाणार नाही याची खबरदारी घेतली. तसेच त्याने निजामाची विदर्भाकडून येणारी कोणतीही कुमक पुढे जाऊ दिली नाही. नासिरजंग जेव्हा सैन्यासह बुऱ्हाणपूरला निघाला, तेव्हा वाटेत त्याला चिमाजीआप्पांच्या सेनेने हैराण करून सोडले. त्या सैन्यांनी तापी नदीच्या परिसरात दक्षिणेतून येणारी कुमक थांबवली. थोडक्यात, निजामाकडे कोणतीही कुमक वा रसद न पोहचू देण्याचा पहिल्या बाजीरावांचे डावपेच यशस्वी होऊन किल्ल्यातील जनावरे व सैन्याचे हाल होऊ लागले. भोपाळच्या किल्ल्याच्या परिसरात एक अभेद्य संरक्षणफळी उभारून आपल्या प्रबळ तोफखान्याच्या साहाय्याने बाजीरावांच्या तुटपुंज्या सैन्याला पराभूत करण्याचा बेत त्याने आखला. एका आठवड्यातच बाजीरावही तिथे दाखल झाले आणि पठाराच्या दुसऱ्या बाजूस इस्लामपूरच्या पुढे ९ किमी.वर त्यांनी तळ ठोकला. हा प्रदेश बाजीरावांच्या सरदारांच्या नजरेखाली होता. बाजीरावांनी किल्ल्याकडे जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर ७-८ डिसेंबर १७३७ पर्यंत परिणामकारक अडसर घातले आणि तोफखान्यापासून अलिप्त राहून गनिमी युद्धतंत्राने बेजार केले. त्यापश्चात कोणत्याही रस्त्याचा वापर करणे अशक्य झाले. त्यामुळे निजामाच्या सैन्यासाठी शिधा आणि जनावरांसाठी वैरण येणे पूर्णतया बंद झाले. वैझन किल्ल्यात सर्व जड सामान सोडताना त्याबरोबर आपली राखीव रसदही निजामाने ठेवली होती. दररोजचे खाण्यापिण्याचे पदार्थ भोपाळ शहरातून मिळतील, अशी त्याची अपेक्षा होती; परंतु सर्व बाजूंच्या रस्त्यांची बाजीरावांनी कोंडी केल्यावर निजामाच्या सैन्याची रसद पूर्णतया आटली. त्यामुळे त्यांची उपासमार होऊ लागली.

परिस्थिती हलाखीची झाली होती. आता एकच पर्याय निजामापुढे उरला होता, तो म्हणजे उत्तरेच्या दिशेने पायदळ आणि तोफखान्याच्या साहाय्याने वेढा तोडून दिल्लीच्या बाजूला कूच करायचे. पहिला प्रयत्न त्याने १४ डिसेंबरलाच केला तो इस्लामपूरसमोर. सवाई जयसिंग आणि छत्रसालच्या पुत्रांनी त्यांच्या निधड्या राजपूत सेनेनिशी धडक मारली. आघाडीवर तोफा ओढणारे हत्ती ठेवण्यात आले होते. त्यांच्याशी मल्हारराव होळकरांच्या युद्धविजयी तुकडीने सामना केला. इस्लामपूरच्या नदीवरील दोन्ही बाजूंस घमासान लढाई झाली. मल्हाररावांचे दोन सरदार आणि ३०० सैनिक धारातीर्थी पडले वा जबर जखमी झाले. पण, त्यांनी वेढा तुटू दिला नाही. मराठ्यांनी तोफांवर धाड घालून तोपचींना ठार केले. छावणीमधील परिस्थिती हाताबाहेर जात होती. वेढ्यानंतर कही रात्री उलटून गेल्या तरी तो फोडण्याची आशा दिसत नव्हती. किल्ल्यात वा भोपाळ शहरात अन्नधान्य वा वैरण उरली नव्हती.

निजाम हतबल झाला होता. त्याने अब्दुल खारखान आणि अन्वरखान या दोन वकिलांना चर्चेसाठी बाजीरावांकडे पाठवले; परंतु परत गेल्यावर त्यांनी काहीच कळवले नाही. उलट २८ डिसेंबरला निजामाचे सैन्य ढोलांच्या गजरात आगेकूच करू लागले. ते पाहून आबाजी कानडे आणि यशवंतराव पवार यांच्या घोडदळाने जाटांवर हल्ला चढवला. मग तोफगोळ्यांच्या तुफान माऱ्याच्या आ‌‍‌‌च्छादनाखाली त्यांना छावणीत परत आणण्यात आले. अडकून पडलेल्या सैन्याला मोकळे करणे आवश्यक होते. अखेरीस तहाची बोलणी करण्यासाठी त्याने प्रसिद्ध अयामल आणि तीन वकील पाठवले. बाजीरावांपर्यंत पिलाजी जाधव आणि बाजी बाजीराव या दोघांनी मध्यस्थी केली. ७ जानेवारी १७३८ ला सिरोजच्या ६० किमी. उत्तरेस दोराह सराईला तहावर निजामाने सही केली. त्यानुसार निजामाने बाजीरावांना माळव्याची सुभेदारी आणि नर्मदा व चंबळमधील सर्व प्रदेशाची मालकी हक्क बादशाहाकडून मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शिवाय ५० लाख रुपये युद्धखर्चापोटी देण्याचे आश्वासन दिले. भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. मराठ्यांच्या गनिमी युद्धतंत्राचा तो परिपाक होता.

संदर्भ :

  • Majumdar, R. C. Ed. The Maratha Supremacy, Mumbai, 1958.
  •  Palsokar, R. D. Bajirao 1 : An Outstanding Cavalry General, New Delhi, 1995.
  •  दीक्षित, म. श्री. प्रतापी बाजीराव, पुणे, १९९८.
  •  सरदेसाई, गो. स. मराठी रियासत खंड ३ : पुण्यश्लोक शाहू पेशवा बाळाजी विश्वनाथ पेशवा बाजीराव, मुंबई, १९८९.

प्रतिक्रिया व्यक्त करा