वॉक्समन, सेल्मन अब्राहम : ( २२ जुलै, १८८८ – १६ ऑगस्ट, १९७३ )

सेल्मन अब्राहम वॉक्समन यांचा युक्रेनमध्ये जन्म झाला. युक्रेन हा त्याकाळी  रशियन साम्राज्याचा भाग होता. वॉक्समन यांच्या बालपणी त्यांच्या डोळ्यादेखत बहिणीचा घटसर्पाने झालेला मृत्यूचा त्यांच्यावर परिणाम करून गेला आणि आपले आयुष्य रोगनिवारण क्षेत्रासाठी वाहून घेण्याची त्यांना प्रेरणा मिळाली.

पारंपारिक शिक्षणाऐवजी त्यांच्या आईने त्यांना अंकगणित, भूगोल, साहित्य अशा आधुनिक विषयांच्या खाजगी शिकवणीतून त्यांची तयारी करवून घेतली. माध्यमिक शिक्षणानंतर सेल्मन वॉक्समन अमेरिकेत स्थलांतरित झाले. न्यू जर्सी राज्यातील रटगर्स विद्यापीठातून त्यांनी प्रथम कृषीशास्त्रातील बी.एस्सी. आणि एका वर्षात एम.एस्सी.ची पदवी मिळवली. रटगर्स विद्यापीठातील जेकब लिपमन या संशोधकाबरोबर न्यू जर्सी कृषीशास्त्र प्रयोग केंद्रात मृत्तिका जीवाणू विषयात त्यांनी  संशोधन सहाय्यक म्हणून काम चालू केले. एकाच वेळी त्यांना पदवी व पदव्युत्तर काम चालू ठेवण्याची मुभा होती. त्याचा प्रतिजैविकांवर पीएच्.डी. करण्यासाठी त्यांना फायदा झाला. त्यांच्या कामामुळे कॅलिफोर्नियातील बर्कली विद्यापीठात, सेल्मन वॉक्समन यांना प्रतिजैविकांवरील संशोधनाबद्दल जीवरसायनशास्त्रातील पीएच्.डी. प्रदान करण्यात आली. पीएच्.डी. नंतर ते रटगर्स विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र आणि जीवरसायनशास्त्र या विषयांचे प्राध्यापक झाले.

सेल्मन वॉक्समन आणि त्यांच्या सहकार्‍यांनी रटगर्स विद्यापीठात, मृत्तिका जीवाणू जीवाणूपेशींमध्ये घुसू पाहणाऱ्या परजीवी जीवाणूपासून स्वसंरक्षण कसे करतात याचा अभ्यास केला. या अभ्यासातून त्यांना सुमारे वीस प्रतिजैविके अलग करण्यात यश मिळाले. त्यातील एक महत्त्वाचे प्रतिजैविक स्ट्रेप्टोमायसिन होय. क्षयासारख्या रोगावर स्ट्रेप्टोमायसिन अत्यंत प्रभावी ठरले. स्ट्रेप्टोमायसिनच्या शोधामुळे क्षय उपचारामध्ये क्रांती घडली. स्टेप्टोमायसिनच्या शोधामुळे सेल्मन वॉक्समन यांना १९५२ साली शरीरक्रियाशास्त्र आणि वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार दिला गेला. यानंतर सेल्मन वॉक्समन यांनी अनेक प्रतिजैविकांचा शोध लावला. स्वसंरक्षण करणार्‍या रसायनांना प्रतिजैविक (Antibiotics) हा समर्पक वैज्ञानिक शब्द सेल्मन वॉक्समन यांनी प्रचलित केला.

सेल्मन वॉक्समन यांच्या सहकार्‍यांनी शोधलेली आणखी प्रतिजैविके म्हणजे ॲक्टीनोमायसिन, क्लॅवासिन, स्ट्रेप्टोथ्रिसिन, ग्रिसीन, कँडिसिडीन, कँडीडिन, फ्राडिसिन, निओमायसिन इत्यादी.

रटगर्स विद्यापीठातील विश्वस्तांनी सेल्मन वॉक्समन ह्यांच्या गुणांची कदर करून त्यांच्या अधिपत्याखाली एक सूक्ष्मजीवशास्त्र संस्था स्थापन करून दिली. सेल्मन वॉक्समन ह्यांनीही स्वतःला प्रतिजैविकांच्या, मुख्यतः स्ट्रेप्टोमायसिनच्या स्वामित्वधनापोटी मिळणारी मोठी रक्कम ही संस्था उत्तम प्रकारे चालविण्यासाठी देणगी म्हणून दिली.

चारशेपेक्षा जास्त शोधनिबंध, अठरा पुस्तके, विद्यापीठात प्राध्यापक, प्रयोगशाळा संचालक आणि सुमारे वीस प्रतिजैविकांचा शोध हे त्यांचे कर्तृत्व  आहे.

अमेरिकेतील मॅसेच्युसेट्स राज्यात त्यांचा मृत्यू झाला.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा