बांडगूळ (डेण्ड्रोप्थी फॅल्काटा): सीताफळ वनस्पतीला लोंबणाऱ्या बांडगुळाच्या फांद्या आणि फुले

बांडगूळ ही इतर वृक्षांच्या फांद्यांवर वाढणारी एक परजीवी वनस्पती आहे. सपुष्प वनस्पतींच्या द्विदलिकित वर्गातील लोरँथेसी कुलातील सर्व वनस्पतींना सामान्यपणे बांडगूळ म्हणतात. बांडगुळाला काही वेळा जीवंतिका असेही म्हणतात. ती स्वत:चे अन्न तयार करू शकते कारण तिला हरितद्रव्ययुक्त पाने असतात. बांडगुळे ज्या वनस्पतीवर वाढतात त्या वनस्पतीला आश्रयी वनस्पती म्हणतात. आश्रयी वनस्पतींवर ती फक्त पाणी आणि क्षार यांसाठी अवलंबून असतात. म्हणून त्यांना ‘अर्धपरजीवी’ म्हणतात. आंबा, वड, पिंपळ, दत्रंग व शिसवी अशा वनस्पतींवर बऱ्याचदा बांडगुळे वाढलेली दिसतात. एखाद्या आश्रयी वनस्पतीवर मोठ्या संख्येने बांडगुळे वाढली, तर ती वनस्पती मरू शकते.

लोरँथेसी कुलात डेण्ड्रोप्थी, व्हिस्कम, टॉलिपँथेस, हेलिकँथस, टॉक्सिलस  इ. प्रजातींचा समावेश होतो. महाराष्ट्रात बांडगुळाची डेण्ड्रोप्थी फॅल्काटा ही जाती तसेच व्हिस्कम प्रजातीच्या काही जाती आढळतात.

बांडगुळाच्या फांद्या आश्रयी वनस्पतीच्या फांदीवर लोंबताना दिसतात. पाने साधी, मोठी, जाडसर, समोरासमोर आणि गडद हिरव्या रंगाची असतात. फुले सप्टेंबर–मे महिन्यापर्यंत येतात. फुले लांब नळीसारखी, आकर्षक आणि लाल किंवा नारिंगी रंगाची असतात. मृदुफळे साधारण वाटाण्याएवढी असून त्यांत चिकट खाद्य गर असतो. प्रत्येक फळात एक लहान व अखाद्य बी असते. बीजप्रसार पक्ष्यांमार्फत होतो. पक्षी गर खातात व चोचीला चिकटलेले बी काढून टाकण्यासाठी फांदीवर घासतात. त्यामुळे बी फांदीला चिकटते आणि बी रुजून तेथे बांडगुळाची वाढ होते. बांडगुळे आश्रयी वनस्पतीच्या फांदीमधील जलवाहिन्यांमध्ये आपली मुळे खुपसतात. बांडगुळाच्या या वैशिष्ट्यपूर्ण मुळांना शोषक मुळे म्हणतात. या शोषक मुळांमार्फत बांडगुळे आश्रयी वनस्पतीपासून पाणी, खनिज व क्षार शोषून घेतात. त्यामुळे आश्रयी वनस्पतीला हानी पोहोचते.

फळझाडांचे विशेषत: आंबा, साग, नाणा व हिरडा अशा उपयुक्त वृक्षांचे त्यांवर वाढलेल्या बांडगुळांमुळे फार नुकसान होते. बांडगूळ ही उपद्रवी असल्याने आश्रयी वनस्पतीची फांदी तोडून टाकणे, हाच त्यावर उपाय असतो. या वनस्पतीचे काही उपयोग पुढीलप्रमाणे आहेत. साल स्तंभक (आकुंचक) व मादक असते आणि तिचा वापर जखमांवर, ऋतुस्रावाच्या तक्रारींवर तसेच दमा, क्षय इ. रोगांवर केला जातो. तिच्या कोवळ्या फांदीत १०% टॅनीन असून त्याचा वापर चामडे मऊ करण्यासाठी होतो. नवीन संशोधनानुसार बांडगुळाची पाने व कोवळ्या फांद्यांतील रस हा रक्ताभिसरण तसेच श्‍वसनविकारांवर उपयुक्त असल्याचे आढळून आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा