ब्राह्मी ही वनस्पती एपिएसी कुलातील असून तिचे शास्रीय नाव हायड्रोकॉक्टिल एशियाटिका आहे. सेंटेला एशियाटिका या शास्त्रीय नावानेही ती ओळखली जाते. ती मूळची आशियाच्या पाणथळ प्रदेशांतील असून विशेषकरून भारतात आणि श्रीलंकेत वाढलेली दिसून येते.

ब्राह्मी (सेंटेला एशियाटिका): पाने व फुलोऱ्यांसहित वनस्पती

ब्राह्मी वनस्पती जमिनीवर पसरत वाढत असून तिचे खोड निमुळते, धावते (रनर) व लालसर-हिरवे असते. खोडाच्या पेरांपासून खालच्या बाजूस आगंतुक मुळे येतात, तर वरच्या बाजूस पाने येतात. पाने साधी, १–३, घेवड्याच्या आकाराची, लांब देठाची आणि दातेरी असतात. फुलोरा लहान चवरीसारखा असून फुले लहान व फिकट गुलाबी असतात. प्रत्येक फुलात दोन पुंकेसर आणि दोन कुक्षी असतात. शुष्क फळ सु. ०·५ मिमी. आकाराचे, अंडाकृती व कठीण असते.

त्वचेच्या विकारांवर आणि कुष्ठरोगावर ब्राह्मी गुणकारी असते. चेतासंस्थेच्या विकारांवर ती प्रभावी समजली जाते. स्मरणशक्ती वाढविण्यासाठी जी औषधे बाजारांत उपलब्ध असतात, त्यांमध्ये ब्राह्मीचा वापर करतात. काही ‍ठिकाणी कढी, आमटी इत्यादींमध्ये पानांचा वापर करतात.

 

नीरब्राम्ही (बॅकोपा मोनिएरा): पाने व फुलोऱ्यांसहित वनस्पती

नीरब्राह्मी: ही वनस्पती प्लाण्टेजिनेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बॅकोपा मोनिएरा आहे. ती मूळची दक्षिण भारत, ऑस्ट्रेलिया, यूरोप, आफ्रिका, आशिया तसेच उत्तर आणि दक्षिण अमेरिका येथील आहे, असे मानतात. ती भारत, नेपाळ, श्रीलंका, चीन, पाकिस्तान, तैवान आणि व्हिएटनाम या देशांतील दलदलीच्या भागात वाढते.

नीरब्राह्मी ही सरपटत वाढणारी वर्षायू वनस्पती आहे. पाने साधी, अवृंत, लहान, समोरासमोर, रसाळ असतात. फुले लहान व पांढरी असून फुलात ४ किंवा ५ पुंकेसर असतात. फळ बोंड प्रकारचे गोलसर व टोकदार असून त्यात अनेक बिया असतात.

नीरब्राह्मी वनस्पती मूत्रल आणि रेचक आहे. तिच्यापासून ब्रह्माइन हे अल्कलॉइड मिळते. ते सौम्य विषारी आहे. नीरब्राह्मीच्या पानांचा रस संधिवातावर लावतात.

चरकसंहिता, अथर्ववेद आणि सुश्रुतसंहितेत या नीरब्राह्मीचा उल्लेख ब्राह्मी असा केला गेला असल्यामुळे तिला देखील ब्राह्मी म्हटले जाते. प्राचीन काळात वेदांचा अभ्यास करणारे अभ्यासक स्मरणशक्ती वाढविण्यासाठी या वनस्पतीचा वापर करीत, असा उल्लेख आहे. तिच्या सेवनाने मेंदूचा रक्तप्रवाह वाढतो आणि कंपवाताच्या (पार्किनसन) विकारांसारखे विकार टाळता येऊ शकतात, असे काही संशोधनांतून निदर्शनास आले आहे.

 

प्रतिक्रिया व्यक्त करा