शहर आत्महत्या करायचं म्हणतंय : साहित्य अकादेमी नवी दिल्लीचा युवा पुरस्कार प्राप्त सुशीलकुमार शिंदे या कवीचा काव्यसंग्रह. ग्रंथाली प्रकाशन, मुंबई यांचेकडून २०१६ मध्ये प्रकाशित झाला. शहर हे मध्यवर्ती रूपक समोर ठेऊन आजच्या मानवी – अमानवी स्थितिगतीचे चित्रण करणार्‍या एकूण ५३ कविता या संग्रहात आहेत. महानगरीय जीवनात भरून राहिलेला कोलाहल, वर्गीय ताण पेच, गती, वस्तूकरण, स्त्रीला दिली जाणारी दुय्यम वागणूक ही आशयसूत्रे असणार्‍या यातील कवितांमधून घुसमटीच्या, नैराश्याच्या पार्श्वभूमीवर उमटणारा आशेचा चिवट स्वर प्रकट झाला आहे. महानगरातील सामाजिक, भौगोलिक, सांस्कृतिक रचिताचा मानवी जगण्यावर होणारा अपरिहार्य परिणाम नोंदविणारी कविता म्हणून या संग्रहातील कविता उल्लेखनीय कविता आहे. भौतिक झगमगाट, वाढ विस्तारात नाहीसे होणारे मानवी अस्तित्व, विघटनवादी, भांडवलशाही, चंगळवादी जगाची विषमचित्रे या कवितेतून येतात.

शिंदे यांच्या कवितेत गुंतागुंतीचे भावसंवेदन प्रकटताना महानगरीय जगण्याचे पेच दर्शविले आहेत. अमानवीकरण, मूल्यऱ्हास आणि अराजकसदृश्य परिस्थितीत शहर आत्महत्येकडे प्रवास करीत असल्याचे मुख्य प्रतिपादन ही कविता करते. असंवेदनशीलता आणि लुप्त होत जाणारी जाणीव मानवाच्या अस्मिताविन्मुख अशा महानगरीय अस्तित्वाकडे निर्देश करते आणि भौतिक झगमगाटात मानवी चैतन्य हरविण्याकडे निर्देश करते. सर्वहारा लोकांचे जग ही महानगरीय वास्तवता या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. विस्थापित लोकांचे चेहरे विहीन जीवन, जगण्यासाठीची अस्वस्थ, केविलवाणी धडपड, अर्थरचनेतील विषमता, शारीर अस्तित्व टिकविण्यासाठीचा झगडा, जागतिकीकरणाने प्रभावित मानवी वर्तनव्यवहार या सगळ्याची दुखरी सल कवितेत उजागर होते. वरवर दिसणार्‍या चकचकीत महानगरीय मुखवट्यामागे असणारे कचर्‍याचे ढीग, बकालपण, गर्दी, जगण्यासाठीच्या मूलभूत गोष्टींचा अभाव, फुटपाथ आणि त्यावरचे बेवारस जगणे, झोपडपट्टी, गरीबी, भूक, वजा होत जाणारी स्वप्न, चेहरा विहीन आयुष्य आणि या सगळ्यात आशेने या शहराची वाट धरलेल्या वंचितांचा अपेक्षाभंग या कवितेतून मांडला आहे.

स्त्री बद्दलचा प्रागतिक स्वर आळवतांना संस्कृती-परंपरेने आखलेली चौकट आणि त्यातील शोषण अधोरेखित करते. या पार्श्वभूमीवरही परिस्थिती बदलावी यासाठी सुरू असलेला स्त्री संघर्ष या कवितेतून शब्दबद्ध झाला आहे. मृत्युच्या टोकावर उभे असणार्‍या महानगराचा ताण आणि सर्वहारा वर्गाविषयीचा मूल्यभाव अशी नव्या महानगराबद्दलची दुहेरी जाणीव तीव्रतरतेने अभिव्यक्त झाली आहे. रोकठोक आणि खडबडीत, थेट असणारी भाषा हे कवितेचे वैशिष्ट्य होय. नेमक्या शब्दात वास्तव मांडणारी कविता. ‘मुखवटे’, ‘दहा बाय दहाची खोली’, ‘रक्तात मिसळत जाणारे राक्षसीकरण’, ‘धारावीची झोपडपट्टी’, ‘बिनचेहर्‍याची माणसं’ आणि  ‘शहर आत्महत्या करायचं म्हणतंय’ ही कवितेची शीर्षके सूचक आणि अर्थपूर्ण. स्वत:च्या विशिष्ट प्रतिमांचा कवितेत वापर, मुंबईच्या पार्श्वभूमीवर समुद्र या प्रतिमेचे प्रभावी उपयोजन, उपरोध आणि तिरकस शैलीमधून महानगरीय जगण्यातील विसंगती आणि विरोधाभास यावर भाष्य करणारी ही कविता आहे. आधुनिकतावादी कवितेचा प्रभाव असला तरी महानगराविषयीचा मानवतावादी संस्कार कवितेत ठळक जाणविणारा आहे. मुके असणे हा गुन्हा असल्याचे प्रतिपादन करणारी मार्क्सच्या दास कॅपिटल  या ग्रंथातील समता अभिप्रेत असणारी ही कविता आहे.

संदर्भ : शिंदे, सुशीलकुमार, शहर आत्महत्या करायचं म्हणतंय, ग्रंथाली प्रकाशन, मुंबई, २०१६.