आयफल, आलेक्झांडर गुस्ताव्ह : ( १५ डिसेंबर १८३२ – २७ डिसेंबर १९२३ ) 

अलेक्झांडर गुस्ताव्ह आयफल या मूळ जर्मन कुटुंबातील अभियंत्याचा जन्म फ्रान्समधील बर्गंडी येथील दिजॉ (Dijon) या लहानशा गावात झाला. आयफल हे फ़्रेंच नाव त्यांनी उशीराने धारण केले. त्यांना बालपणापासूनच बांधकामाविषयी आवड होती. मात्र व्हिनेगार कारखान्याची मालकी असलेल्या मामाच्या प्रभावाखाली राहिल्याने कदाचित पुढे मागे आपण कारखान्याचा वारसदार होऊ या कल्पनेने आयफलने सेंट्रल पॅरिस स्कूल ऑफ आर्ट्स आणि मॅन्युफॅक्चरिंग येथे रसायनशास्त्र विषयाचा अभ्यास केला; तसेच एकल पॉलिटेक्निकमधून १८५५ साली अभियांत्रिकेची पदवी घेतली.

पदव्युत्तर झाल्यानंतर मामाबरोबर काम करण्याचा आयफल यांचा मानस काही कौटुंबिक अडचणीमुळे असफल झाला. मग मात्र त्यांनी आपले सर्व लक्ष बांधकाम या आपल्या आवडत्या विषयावर केंद्रित केले आणि पारंपारिक साहित्यांपेक्षा लोखंडाचा वैविध्यपूर्वक वापर करून नेत्रदीपक वास्तू कशा उभाराव्यात ह्या एकाच विचाराचा त्यांनी अखंड ध्यास घेतला. त्या दृष्टीने त्यांनी प्रथम नोकरी पत्करली, ती प्रामुख्याने लोखंडाचा वापर करून रेल्वेची कामे करण्याऱ्या कंपनीत. तेथील चार्ल्स नेपव्हयु (Charles Nepveu) हा अभियंता नंतर कोठेही गेला तरी आयफलच्या पाठीशी कायम उभा राहिला. प्रथम आयफलला आपला सचिव म्हणून त्याने घेतले. नंतर काही पुलांचे अभिकल्प करण्याचे काम दिले. शेवटी ५०० मीटर लांबीच्या बॉरदो (Bor-deaux) येथील एका लोखंडी पुलाच्या बांधकामावर देखरेख करण्याची नोकरी दिली. क्राँप्रेस्ड्एअर केसन (Compressed Air Caissons) आणि हायड्रॉलिक रॅम्स (Hydraulic Rams) या त्या काळच्या अत्यंत अभिनव तंत्रज्ञानाचा वापर करून आयफलने ते काम वेळेवर पूर्ण केले. त्यामुळे त्यांच्या नावाचा बराच गवगवा झाला आणि त्यांना बढतीही मिळाली. परंतु येऊ घातलेल्या मंदीमुळे नोकरीच्या अनिश्चिततेचा विचार करून त्यांनी राजीनामा दिला आणि १८६६ साली वयाच्या ३३ व्या वर्षी स्वतःचा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतला. या सर्व काळात लोखंडांचा वापर करून विविध वास्तूंचे अभिकल्प आणि बांधकाम याचा त्यांनी सखोल अभ्यास केला. १८६८ मध्ये त्यांनी भागीदारीत ‘आयफल एत सी’ (Eiffel et Cie) ही कंपनीही स्थापन केली.

स्वतंत्र व्यवसायात पदार्पण केल्यानंतरच्या पुढील तीन दशकांच्या कालावधीत आयफल यांनी प्राधान्य करून निरनिराळया लोखंडांचा – बीड/ ओतीव लोखंड (Cast Iron) घडीव लोखंड (Wrot iron), पोलाद (Steel) – वापर करून अभिकल्पक म्हणून, संरचनात्मक अभियंता म्हणून किंवा प्रत्यक्ष वास्तू उभारणारा म्हणून अनेक वैशिष्ट्यपूर्ण कामे पूर्ण केली. त्यानिमित्ताने आयफलने या लोखंडांच्या गुणधर्माविषयी बरेच संशोधन केले आणि एक स्वतःचा कारखानाही सुरु केला.

पॉते मराया पिया पूल, पोर्तुगाल

आयफलना रेल्वेची कामे तर मिळतच राहिली परंतु १८७५ – ७६ मध्ये बुडापेस्टचे रेल्वे स्टेशन आणि पोर्तुगालमधील दोरी (Douri) नदीवरील ‘पॉते मराया पिया’ पूल ही दोन वैशिष्ट्यपूर्ण मोठी कामे स्पर्धेतून मिळाली. बुडापेस्ट स्टेशनच्या इमारतीचा मधला भाग पोलादी बांधकामात (Open steel Structure) तर बाजूचे दोन्ही भाग पारंपरिक पद्धतीत त्यांनी केले. अशा तऱ्हेचे संमिश्र बांधकाम त्याकाळात प्रथमच झाले होते. पोर्तुगालमधील १६० मीटर अवधीचा पोलादी कमानीचा पूल त्यावेळचा जगातील सर्वात मोठा पूल होता. या प्रकल्पामुळे अभिकल्पक म्हणून आयफल यांची कीर्ती दूरवर पसरली.

आयफल यांनी १८७८ मध्ये लोखंडाचा वैविध्यपूर्ण वापर करून भव्य प्रदर्शनाच्या अनेक इमारतींचे काम केले. १८७९ साली गॅरॅबित पूल (Garabit Viaduct) हे पाण्याच्या पृष्ठभागावर १२० मीटर उंच असलेल्या त्यावेळच्या जगातील सर्वात उंच पुलाचे काम त्यांना मुद्दाम बोलावून देण्यात आले. त्याच सुमारास नीस (Nice) येथील खगोलशास्त्राच्या वेधशाळेचे परस्पर छेदणाऱ्या (Laced) लोखंडी मेंबर्सचा वापर करून एका घुमटाचे (२२ मीटर व्यास) एक नाविन्यपूर्ण कामही त्यांनी संपन्न केले.

आयफेल यांनी केलेला स्वातंत्र्यदेवता       पुतळ्याचा आराखडा, न्यूयॉर्क.

आयफल यांची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन १८८१ मध्ये न्यूयॉर्कमधील स्वातंत्र्यदेवीच्या पुतळ्याचा फ्रेंच वास्तुशिल्पकार युजीन व्हॉलीए डिक् (Eugene Viollet-le-Duc) यांच्या झालेल्या अचानक निधनामुळे ऑगस्ते बॉर्थोल्डी (Bartholdi) या प्रकल्पप्रमुखाने आयफल यांना बोलावून त्यांच्यावर कामाची जबाबदारी सोपविली. हा पुतळा म्हणजे अमेरिकन क्रांती आणि गुलामगिरीचा अंत या संदर्भात अमेरिका आणि फ्रान्स यांच्या संयुक्त अनेक प्रयत्नांचे प्रतीक म्हणून फ्रान्सने अमेरिकेला दिलेली देणगी ठरला. पुतळ्याच्या पायापासून ज्योतीच्या (Torch) टोकापर्यंत ९३ मीटर उंचीच्या असलेल्या या तांब्याच्या भव्य शिल्पाची रचना एदवर्दे लॅबोलायर (Edurd de Laboulayr) यांची होती. हे शिल्प स्थिरावण्यासाठी आतील बाजूने एक दगडी / विटकाम यांचा भक्कम मोठा स्तंभ आयोजित केला होता. मात्र प्रचंड वादळी वाऱ्यापुढे अशा तऱ्हेचा आधार योग्य नसल्याचे दाखवून आयफलने एक लोखंडी मध्यमनोऱ्याचा अभिनव आकृतीबंध केला. खालच्या प्रचंड क्रॉकीटच्या पायावर लोखंडी गर्डर बसवून त्यावर कमी वजनाच्या मनोऱ्याचे पाय वेल्ड करण्याची योजना करून त्यांनी एक अभियांत्रिकी विक्रमच केला.

पॅरिसमध्ये १८८९ साली आयोजलेल्या भव्य जागतिक प्रदर्शनामध्ये (Exposition Universelle) शहराच्या मध्यभागी विशेष आकर्षण ठरावे, अशी वास्तू उभारावी असा प्रस्ताव सरकारने केला. त्यासाठी १८८६ साली वास्तुशिल्पकार / अभियंते यांचेकडून आराखडे मागितले गेले. प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळालेल्या अभिकल्पांमधून आयफलने सादर केलेल्या ३०० मीटर उंच घडीव लोखंडी (Wrot iron) मनोऱ्याची योजना निवडली गेली. याच्या अभिकल्पामध्ये आयफलबरोबर पूर्वी काम केलेले मॉरिस कोचलीन (Maurice Koechlin), एमिल न्वोगियर (Emile Nouguier) आणि आयफल यांनी ज्यांच्याबरोबर काम केले होते त्या वास्तुशिल्पकार स्टीफन स्वावेस्टर (Stephen Sauvestre) यांचाही मोठा वाटा होता. या सहकारी त्रयीने या कामाचे एकस्व घेतले होते, पुढे नंतर आयफलने यांनी ते एकस्व विकत घेऊन आणि मनोऱ्याचे बांधकाम स्वतःच केले. अंदाजे किंमतीच्या पाव रक्कमेत काम करायचे आणि वीस वर्षाचे उत्पन्न आपले अशा अटींवर त्यांनी काम पूर्ण केले.

आयफल मनोरा, पॅरिस

मनोऱ्याच्या बांधकामाचा प्रारंभ १८८७ मध्ये झाला. एवढे प्रचंड आव्हानात्मक काम हाताळण्यासाठी गणिती अचुकता, योग्य यंत्रसामुग्री आणि कुशल कामगार यांचे नियोजन आणि वापर अत्यावश्यक होते. जवळ जवळ ५००० आराखडे तयार केले आणि बांधकामांत घडीव लोखंडाचे जवळ जवळ १५००० भाग (members) आणि २५ लाख रिबिटांचा (Rivets) वापर झाला. कोणत्याही भारांना समर्थपणे तोंड देणारे परंतु वजनाने हलके असे हे अद्वितीय शिल्प फक्त दोन वर्षात पूर्ण झाले. त्यावेळच्या काही नामवंत नागरिकांनी, प्रसिद्ध वास्तुशिल्पकारांनी आणि कलाप्रेमी लोकांनी हा मनोरा ही एक अत्यंत सौंदर्यविहीन वास्तू आहे अशी हेटाळणीपूर्ण टीका केली होती. मात्र त्याच वास्तूला जागतिक कीर्ती मिळून ती एक असामान्य कलाकृती ठरली.

पनामा कालव्याच्या प्रकल्पामध्ये १८८७ साली आयफल यांना फ्रेंच कंपनीमार्फत काम मिळाले होते. मात्र ती कंपनी दिवाळखोरीत गेली. त्यानंतर त्यांनी आपल्या व्यवसायातून संपूर्ण निवृत्ती घेतली. परंतु उंच संरंचनांचे अभिकल्प करताना त्यांनी वायुगतीशास्त्र (Aerodynamics) आणि हवामानशाश्त्र (Meteorology) या शास्त्रांचा पुष्कळच अभ्यास केला होता. त्या अनुभवाच्या आधारे त्यांनी आपली प्रयोगशाळा उघडली आणि १९०९ साली एक वात बोगदा (Wind tunnel) तयार केला. त्यांच्या या कामाबद्दल १९१३ साली त्यांना स्मिथस्-सोनियन इन्स्टिटयूटतर्फे सॅम्युअल पी लॅगले मेडल मिळाले. त्यावेळी टेलिफोनचा शोध लावणाऱ्या अलेक्झांडर ग्रॅहॅम बेलने आयफलच्या संशोधनाचा विमानांच्या अभिकल्पासाठी केवढा उपयोग झाला याचा गौरवाने उल्लेख केला होता.

आयफलनी लोखंडचा वापर करून असंख्य नाविन्यपूर्ण कामे कमी खर्चात करून दाखवली. त्यात पूल (Bridges and Viaducts) आणि विविध प्रकारच्या इमारती यांची लक्षणीय कामे जगातील २५-३० देशात केली. या सर्वांना झाकोळून टाकणाऱ्या न्यूयॉर्क मधील स्वातंत्र्यदेवीचा पुतळा आणि पॅरिसमधील आयफल मनोरा या वास्तू उभारून त्यांनी आपले असाधारण नावीन्यता, विलक्षण अभिकल्पकता आणि तंत्रज्ञानावरील प्रभुत्व दाखविले. त्यामुळेच त्यांना लोखंडांचा किमयागार असे म्हणत. आयफल टॉवर ही जगद्विख्यात वास्तू हेच आयफलना मिळालेले मोठे पारितोषिक आहे.  ‘मला या वास्तूचा हेवा वाटवा असे आहे कारण माझ्यापेक्षा तिचीच कीर्ती कितीतरी मोठी आहे’, असे ते म्हणाले होते.

 संदर्भ :

समीक्षक : प्रकाश शं.अंबिके