नेर्व्ही, पिएरलुईगी : ( २१ जून १८९१ – ९ जानेवारी १९७९ )

पिएरलुईगी नेर्व्ही यांचा जन्म इटलीमधील सोंदियो (Sondrio) या गावी झाला. त्यांनी इटलीमधील बोलोना (Bologna) येथील सिव्हिल एंजिनिअरिंग स्कूलमधून स्थापत्य अभियांत्रिकीची पदवी प्राप्त करुन घेतली. पदवी मिळाल्यानंतर त्यांनी बोलोनामधील सोसायटी ऑफ काँक्रीट कन्स्ट्रक्शन या संस्थेमध्ये काम करण्यास प्रारंभ केला. तेथील दहा वर्षाच्या नोकरीत असताना पहिल्या महायुद्धाच्या काळात त्यांनी इटालिअन सैन्याच्या कोअर ऑफ एंजिनिअर्समध्ये काम केले. त्यानंतर पुढच्या सर्व आयुष्यभर त्यांनी केवळ प्रबलित काँक्रीटचा (Reinforced Concrete, R.C.C.) ध्यास धरला. या काँक्रीटची संकल्पना जरी एकोणिसाव्या शतकात जन्माला आली होती, तरी तिचा शास्त्रीय सैद्धांतिक पाया १९०९ मध्ये मॉर्श या जर्मन अभियंत्याने प्रथम घातला होता. हाच नेर्व्हींच्या वरील प्राथमिक अनुभवाचा कार्यकाल होता आणि त्यातूनच नेर्व्ही यांना प्रबलित काँक्रीटविषयी अनन्वित आवड निर्माण झाली. त्यांचे मन प्रयोगशील होते आणि त्यांची प्रतिभा नवनवोन्मेषशाली होती. त्यामुळे फॉर्मवर्कमध्ये क्राँक्रीट ओतून, त्यातून लाद्या (Slabs), तुळया (Beams), खांब (Columns) वगैरेचे कामकाज करण्याच्या सर्वसामान्य रूढ पद्धतीमध्ये त्यांना रस नव्हता. काँक्रीट पूर्वनिर्मित (Precast) करता येईल का, त्याचे लहानलहान भाग निरनिराळया आकृतीबंधांत (Forms) आणि आकारात (Shapes) करता येऊन नंतर ते नवीननवीन पद्धतीने जोडता येतील का आणि त्यातून स्तंभविरहित (Columnless) व दोन खांबात मोठे अंतर ठेवून (Large Spans) भव्य बांधकामे करता येतील का असे विचार सतत त्यांच्या डोक्यात घोळत असायचे. हे सर्व करताना बांधकामे जड न होता वजनाने हलकी, वास्तुसौंदर्यामध्ये नेत्रदिपक व नाविन्यपूर्ण, पण त्याचवेळी कमी खर्चाचीही असावीत यावर त्यांचा कटाक्ष असे. हे सर्व साध्य करायचे असल्यास, आपणच अशी कामे करुन दाखवावीत अशा विचारांनी प्रेरित होऊन नेर्व्हीने वयाच्या बत्तीसाव्या वर्षी नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यानंतर त्यांनी वास्तुशास्त्रज्ञ, संरचनात्मक अभियंता व वास्तू उभारणारे अशा तिन्हीही भूमिका अत्यंत यशस्वीपणे सांभाळल्या.

फ्लोरेन्स स्टेडियम

नेर्व्ही यांचे नाव १९३० साली त्यांनी आरेखन केलेला आणि स्वतः बांधलेला फ्लोरेन्समधील स्टेडियम या प्रकल्पामुळे प्रथमच प्रामुख्याने पुढे आले. प्रबलित काँक्रीटचे गोलाकृती (Curved) निमुळत्या (Tapered) आकाराचे कानाख्त छत (Cantilevered Roof), नाविन्यपूर्ण रचनेचे जिने आणि सर्वच वास्तूच्या निर्मितीतील विलक्षण सौष्ठवही होती या कामाची वैशिष्टये. हे बांधकाम त्यांनी अत्यंत माफक किंमतीत केलेही एक जमेची बाजू होती.

विमान घर

त्यानंतर दुसऱ्या महायुद्धाच्या आसपासच्या काळात नेर्व्हीने आपले लक्ष स्तंभरहित विमान घरे (Hangars) आणि भव्य प्रदर्शनगृहे, इमारतींची पुर्नबांधणी आणि कारखाने यावर केंद्रित केले. या बांधकामात प्रबलित काँक्रीटचा वापर निरनिराळया पद्धतीने कसा करावा याच्या अनेक कल्पना त्यांनी साकार केल्या. दोन खांबात मोठे अंतर ठेवून बनवलेल्या छतासाठी कमानीच्या आकाराच्या प्रबलित काँक्रीटच्या पूर्वनिर्मित रिब्ज् (Ribs) कामावर आणून त्या परस्पर छेडणाऱ्या (Intersecting) स्वरूपात तेथेच जोडून त्यांनी अनेक कामे केली.

त्यातलाच एक प्रयोग म्हणून त्यांनी स्वतः एका नौका पृष्ठभागाचा (Boat Hull) प्रबलित काँक्रीटमध्ये आकृतीबंध तयार करुन त्याचे बांधकाम स्वतःच केले आणि इटालियन सरकारला दाखविले. त्यांनी पूर्वनिर्मित प्रबलित काँक्रीटच्या कामाचे एकस्व (पेटंट) घेतले होते. त्याचप्रमाणे ३०० मीटर अवधीच्या महिरपींचे (Vaults) एकस्व घेतले.

दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात नेर्व्हीने जगातल्या अनेक नवनवीन वास्तूंचे अभिकल्पक आरेखक (Design Engineer) म्हणून काम केले. एकासारखी दुसरी वास्तू नाही आणि प्रत्येक वास्तू हे नवीन आव्हान अशा जिद्दीने त्यांनी कामे हाताळली. ‘फेरोसिमेंट’ म्हणून एक नवीन तंत्रज्ञान निर्माण करुन ते ९४ मीटर उंच अशा प्रदर्शनाच्या हॉलसाठी वापरले. या तंत्रज्ञानात कमी जाडीच्या काँक्रीटच्या थरामध्ये पोलादाच्या जाड तारा वापरुन कोणत्याही आकाराचे भाग तयार करतात आणि त्यातून वजनाने हलकी पण टिकाऊ अशी रचना तयार होते. याव्यतिरिक्त प्रबलित काँक्रीटची कमी जाडीची कवच छपरे (Shell Roofs) आणि घुमट यांचीही अनेक आरेखने त्यांनी केली.

ऑलिम्पिक स्टेडियम, रोम.

नेर्व्हीने जगभर केलेल्या आणि विविधतेने नटलेल्या कामांची यादी फार मोठी आहे. त्यातूनही उदाहरणादाखल उल्लेख करायचा झाला तर पॅरीसमधील युनेस्कोचे मुख्यालय, सॅनफ्रॅन्सिस्कोतील सेंट मेरीज् कॅथिड्रल, रोममधील ऑलिम्पिक स्टेडियम, न्यूयॉर्कमधील जॉर्ज वॉशिंग्टन ब्रिजब्स टर्मिनल (ज्याठिकाणी ७०० गाडया आणि प्रवासी यांची व्यवस्था आहे) सिडनीमधील ऑस्ट्रेलियन स्क्वेअर ही गगनचुंबी इमारत, ब्राझीलमधील इटालियन राजदूतांची इमारत, व्हॅटिकनमधील पेपल ऑडिअन्स हॉल, मिलानमधील पिरेली टॉवर वगैरे.

नेर्व्हीची अभिकल्पित क्षमता (Design Capability) असामान्य होती. परंतु त्यावेळी संगणकाची मदत नव्हती. त्यामुळे आपल्या मनात असलेले क्रांतीकारक आकृतीबंध तपासून पहाण्यासाठी नेर्व्ही छोट्या आकाराच्या (Small Scale) प्रतिकृती (Models) तयार करुन त्यावर प्रयोग करीत असत.

कोणत्याही क्षेत्रात प्राविण्य मिळवून विशेष स्थान प्राप्त करुन घ्यायचे असेल तर त्या क्षेत्रातील गाभा समजल्या जाणाऱ्या बाबींचे सम्यक ज्ञान अत्यावश्यक असते. निरनिराळया नैसर्गिक आणि लादलेल्या भारांखाली (Loads) एखादी संरचना कसा प्रतिसाद देते याची स्पष्ट कल्पना आणि त्यासाठी अत्यंत आवश्यक असलेले गणितीज्ञान हे संरचनात्मक अभियंत्याला (Structural Engineer)असावे लागते. तशीच वास्तुसौंदर्याची पुरेपूर जाणही वास्तुशास्त्रज्ञाला जरुर असते. त्याचप्रमाणे स्वतःच निर्माण केलेल्या नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रत्यक्ष बांधकामे माफक खर्चात करण्याची असाधारण ताकद प्रत्यक्ष बांधकाम करणाऱ्लाया असावी लागते. हे सर्व एकाच व्यक्तीमध्ये उत्कटतेने एकत्र झालेले नेर्व्ही हे विसाव्या शतकातील एक रसायन होते. त्यांच्या या प्रदीर्घ प्रवासात त्यांनी निरनिराळया अवतारात आपले जीवन व्यतीत केले. पदव्युत्तर पहिली दहा वर्षे नोकरी, त्यानंतर नऊ वर्षे फक्त स्वतःचा बांधकाम व्यवसाय, नंतरची ४६ वर्षे नेर्व्ही बार्टोली एंजिनिअरिंग अँड कन्स्ट्रक्शन या कंपनीचे प्रमुख आणि त्याचवेळी शेवटच्या बारा वर्षात स्टुडिओ नेर्व्ही या त्यांच्या तीन मुलांच्या कंपनीत भागीदार. या निरनिराळया कालखंडामध्ये त्यांनी वेळोवेळी बाहेरच्या वास्तुशास्त्रज्ञांच्या सहकार्यानेही काही प्रकल्प हाताळले. व्यवसायात इतके व्यग्र असलेले नेर्व्ही यांनी १९४६ ते १९६२ या कालखंडात रोमच्या विद्यापीठातील स्कूल ऑफ आर्किटेक्चरमध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले. या व्यतिरिक्त इटालियन भाषेत त्यांनी दोन पुस्तके लिहिली तर इंग्रजी भाषेत स्ट्रक्चर्स (‘Structures’) आणि एस्थेटिक्स् अँड टेक्नॉलॉजी इन बिल्डींग (‘Aesthetics and Technology in Building’) ही पुस्तके देखील लिहिली.

नेर्व्ही यांना अनेक जागतिक सन्मान मिळाले. त्यापैकी काही म्हणजे ब्रिटनमधील इन्स्टिटयूट ऑफ स्ट्रक्चरल एंजिनिअर्स, रॉयल इन्स्टिटयूट ऑफ ब्रिटीश आर्किटेक्ट्स (RIBA), अमेरिकन इन्स्टिटयूट ऑफ आर्किटेक्ट्स (AIA) या संस्थांची सुवर्णपदके, अमेरिकन अकॅडेमी ऑफ आर्ट्स आणि कल्चर, रॉयल स्वीडीश अकॅडेमीचे मानद सदस्यत्व, ब्युनोस आयर्स व वॉर्सा या विद्यापीठांच्या मानद डॉक्टरेट्स इत्यादी.

संदर्भ :

  • Arch daily–Spotlight: Article by Patrick Kunkal
  • Encyclopedia Britannica–Article by Eduard of Catalory
  • e-architect

समीक्षक : प्रभाकर शंकर अंबिके