परिचर्या संशोधनाच्या इतिहासात मागील दीडशे वर्षांत आमूलाग्र बदल झालेले आहेत. सुरुवातीच्या काळात म्हणजे १९५० च्या आधी परिचर्या संशोधनाची उत्क्रांती ही फारशी जोमाने न होता हळूहळू झाली. नंतर मात्र सन १९७० ते १९९० मध्ये परिचर्या संशोधनावर भर देण्यात आला व परिचर्या चिकित्सा विषयक समस्या व त्यावरील उपाय यावर बरेचसे संशोधन केले गेले. एकविसाव्या शतकात शास्त्रीय पुराव्यांवर आधारित परिचर्या या महत्त्वाच्या ध्येयावर वेगवेगळे संशोधन केले जात आहे.

१) फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या काळातील संशोधन : १८५० मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांना प्रथम परिचर्या संशोधक म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यांनी सर्वप्रथम प्रत्यक्ष कृती सुधारण्यासाठी अनुभवजन्य ज्ञानाचा शुश्रूषा व्यवसायात विकास केला. त्यांच्या काळात म्हणजे १८६० ते १९०० मध्ये परिचर्या संशोधन हे प्रामुख्याने रुग्णांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यातील निरोगी वातावरणाचे महत्त्व यावर केले गेले.  १८५३ ते १८५६ मध्ये झालेल्या क्रिमियन वॉर (गुन्हेगारी युद्ध) मध्ये फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांनी हॉस्पिटलमध्ये व युद्धभूमीवर सैन्यांना होणारा जंतुसंसर्ग व मृत्युदर आणि तो कमी करण्याच्या उपाययोजना यावर स्वतः केलेल्या संशोधनाने आरोग्य सेवा देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र सुधारणा घडवून आणली आणि संपूर्ण जगाचा रुग्णांच्या सेवेकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला. त्यानंतरच्या काळात त्यांनी त्यांचे संशोधनाचे ज्ञान हे समाजात महत्त्वाचे बदल करण्यासाठीही वापरले. जसे पाणी तपासणी, स्वच्छता जोपासणे, उपासमार थांबविणे आणि मृत्यूदर कमी करणे इत्यादी.

२) १९०० ते २००० पर्यंतचे परिचर्या संशोधन : १९२० ते १९३० च्या दरम्यान परिचर्या संशोधन हे परिचर्या नियतकालिकांमधून प्रथमता प्रसिद्ध करण्यात आले. ह्याच काळात परिचर्या अभ्यासक्रमातील पदव्युत्तर व पी. एच. डी. शिक्षण अभ्यासक्रम विश्व विद्यापीठाद्वारे युनायटेड स्टेट्स व कोलंबिया येथे राबविण्यास सुरुवात झाली. १९५० नंतर परिचर्या चिकित्सा संशोधनावर भर देऊन सामाजिक आरोग्य परिचर्या, मानसिक आरोग्य परिचर्या, वैद्यकीय व शल्यचिकित्सा परिचर्या, बाल रोग परिचर्या व स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र परिचर्या या वेगवेगळ्या शाखांमध्ये शुश्रूषा विषयी निकष व मानके बनविण्यासाठी परिचर्या संशोधनाचा उपयोग करण्यात आला. दिवसेंदिवस परिचर्या शुश्रूषा संशोधनात भर पडत असल्याने १९५२ मध्ये ‘नर्सिंग रिसर्च’ हे पहिले परिचर्या संशोधनाचे नियतकालिक प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर १९५० ते १९६० च्या दरम्यान परिचर्या संशोधन हा विषय परिचर्या पदवी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येऊन विद्यार्थ्यांना त्याविषयी वर्गामध्ये शिकविण्यास सुरुवात झाली. १९६० आणि १९७० मध्ये शुश्रूषा गुणवत्ता वाढविण्यासाठी संशोधनामध्ये परिचर्या सिद्धांत, आदर्श परिचर्या विकास व वेगवेगळ्या परिचर्या संकल्पना सामाविष्ट करण्यात आल्या. याच काळात वेगवेगळ्या देशांनी नवनवीन परिचर्या संशोधन नियतकालिकेही प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली व त्यामधून जास्तीत जास्त परिचर्या संशोधने प्रसिद्ध करण्यात आली. तदनंतर १९८३ मध्ये “ Annual review of nursing research” हे पहिल्यांदा प्रसिद्ध केले गेले. त्यामध्ये परिचर्या कार्यकारणी, शुश्रूषा वितरण, परिचर्या शिक्षण व परिचर्या व्यवसाय ह्या वेगवेगळ्या शाखांमधील विविध संशोधने सामाविष्ट करण्यात आली. १९७० मध्ये ‘गुणात्मक संशोधना’ ची परिचर्या क्षेत्राला पहिल्यांदा ओळख झाली आणि  १९८० मध्ये परिचर्या क्षेत्रातील गुणात्मक संशोधने प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर १९८० ते १९९० च्या दरम्यान ‘परिणाम संशोधन’ ही एक महत्त्वाची संशोधन प्रक्रिया परिचर्या क्षेत्रात विकसित झाली.

३) एकविसाव्या शतकातील परिचर्या संशोधन : परिचर्या क्षेत्राचे एकविसाव्या शतकातील उद्दिष्ट हे शास्त्रीय ज्ञान वाढविणे व  उत्कृष्ट पुराव्यांवर आधारित गुणवत्तापूर्ण शुश्रूषा व आरोग्य सेवा देणे हे असल्या कारणाने त्यास अनुसरून शास्त्रीय व खात्रीदायक पुरावा आधारित संशोधनावर भर देण्यात आला व देण्यात येत आहे. एकविसाव्या शतकातील संशोधनांमध्ये परिचर्येचा समाजाचे आरोग्य संवर्धन व आजार रोखणे यामध्ये योगदान यावर आधारित संशोधनांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आणि येत आहे. त्यासाठी परिचर्या क्षेत्रात संशोधन वृत्ती जोपासणे, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देणे, संशोधनासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे व त्याचबरोबर संशोधनासाठी निधी मिळविणे जास्त महत्त्वाचे ठरले. त्यामुळे परिचर्या संशोधन जास्तीत जास्त विकसित होऊन रुग्णांसाठी, रुग्णांच्या सेवेसाठी व समाजासाठी उपयुक्त ठरेल.

संदर्भ :

  • Burns, Nancy; Gray, Jennifer; Grove, Susan, Understanding Nursing Research, 2014.
  • सामंत, कुसुम, शुश्रूषा संशोधन, २०१८.

समीक्षक – सरोज वा. उपासनी