मगर (क्रोकोडिलस पोरोसस)

मगरीचा समावेश सरीसृप वर्गाच्या क्रोकोडिलिया गणात होतो. आशिया, आफ्रिका, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया खंडांत मगरी आढळून येतात. क्रोकोडिलिया गणात ॲलिगेटर, केमन व घडियाल या सरीसृप प्राण्यांचा समावेश करतात. ॲलिगेटर अमेरिका व आशियात, केमन अमेरिकेत तर घडियाल हे आशियात आढळतात. मगरीच्या अनेक जाती असून भारतात २ प्रजाती आणि ३ जाती आहेत. भारतात त्याच्या क्रोकोडिलस  या प्रजातीत क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस आणि क्रोकोडिलस पोरोसस अशा दोन जाती आहेत, तर गॅव्हिॲलिस प्रजातीत गॅव्हिॲलिस गँजेटिकस ही एकच (घडियाल) जाती आहे. भारतात जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश व पंजाब ही राज्ये वगळता इतर राज्यांत मगरी आढळतात. क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस आणि गॅव्हिॲलिस गँजेटिकस या जाती गोड्या पाण्यात आढळतात, तर क्रोकोडिलस पोरोसस ही जाती मचूळ पाण्यात आढळते. मगरीला मराठीत सुसर असेही म्हणतात.

मगर (क्रोकोडिलस पॅल्युस्ट्रिस)

गोड्या पाण्यातील मगर सु. ४·५ मी. लांब,  तर मचूळ पाण्यातील सु. ६ मी.पेक्षा अधिक लांब असते. पूर्ण वाढ झालेल्या मगरीचे वजन २००-२५० किग्रॅ. असते. डोके, मान, धड आणि शेपटी असे तिच्या शरीराचे भाग असतात. डोक्याचा अग्रभाग त्रिकोणी अथवा गोलाकार असून त्याला मुस्कट म्हणतात. मुस्कटावर नासाछिद्रे असतात. वरच्या आणि खालच्या जबड्यांवर मजबूत व तीक्ष्ण लहानमोठे दात असतात. दातांची संख्या सु. ७६ असून ते वरचेवर गळून पडतात व त्यांच्या जागी नवीन दात येतात. वरच्या जबड्यातील दोन्ही बाजूंचे पाचवे दात मोठे असून खालच्या जबड्यातील दात वरच्या जबड्याच्या खाचांमध्ये घट्ट बसतात. जबडा बंद केल्यावर हे मोठे दात बाहेर आलेले दिसतात. जीभ रुंद व जाड असून खालच्या जबड्याला जोडलेली असते. नासाछिद्रे, डोळे व कर्णछिद्रे एका सरळ रेषेत असल्याने मगर शरीर पाण्याखाली ठेवून तरंगत राहते. नासाछिद्रांवर झडपा असतात. त्यामुळे पाणी श्वासमार्गात शिरत नाही. डोळ्यांवर असलेल्या निमेषक पटलामुळे डोळ्यांचे संरक्षण होते आणि त्यामुळे पाण्याखाली मगरीला दिसू शकते. शरीराचा प्रवाहरेखित आकार, लहान अग्रपाद, लहान पश्‍चपाद आणि लांब शेपटी पोहण्यासाठी अनुकूल असतात. थोडक्यात, पाण्यात वावरण्यासाठी मगरीचे शरीर अनुकूलित झालेले असते.

मगरीचा रंग साधारणपणे काळपट असतो. पाठ वगळता सर्व शरीर कठीण व चामट तकटांनी आच्छादलेले असते. पोटाकडील तकटे लांब, तर कडेची तकटे गोलाकार असतात. मान व पाठीचा भाग अस्थिमय चकत्यांनी झाकलेला असतो, त्यांना अस्थिपट्ट म्हणतात. अस्थिपट्ट एकमेकांना चिकटलेले असून खालील त्वचेला जोडलेले असतात. अस्थिपट्टांच्या चार–सहा ओळी असतात. त्यामुळे पाठ चिलखतासारखी दिसते. अस्थिपट्टांवर ओबडधोबड कंगोरे असतात.

मगरीच्या धडाला अग्रपाद आणि पश्‍चपाद यांच्या दोन जोड्या असतात. अग्रपादाला पाच बोटे असून ती पडद्याने जोडलेली असतात.  पश्‍चपादाची बोटे सुटी असतात. मगर पाण्यात संथ गतीने पोहते व जमिनीवर खुरडत चालते. मात्र क्षुब्ध झाल्यास ती चारही पायांवर शरीर वर उचलून काहीशा वेगाने चालण्याचा प्रयत्न करते. फुप्फुसे स्पंजासारखी असतात. मगरीच्या हृदयाला चार कप्पे आणि अवस्कर छिद्र उभे असून नराला एक शिस्न असते. अन्य सरीसृप प्राण्यांमध्ये हृदयाला तीन कप्पे आणि अवस्कर छिद्र आडवे असून नरांना दोन शिस्ने असतात.

मगर मांसाहारी असून मासे हे तिचे मुख्य अन्न आहे. पक्षी व जमिनीवरील प्राणी हेही ती खाते. पाणी प्यायला आलेली हरिणे व लहान गुरे यांवर झडप घालून मगर शिकार करते. पाण्यात तरंगत असताना एखादा प्राणी अथवा पक्षी आटोक्यात आल्यावर मगर त्याला पकडून पाण्याखाली नेऊन खाते.

मगरीला गंधग्रंथीच्या दोन जोड्या असतात. त्यांपैकी एक जोडी घशापाशी, तर दुसरी अवस्करापाशी असते. विणीच्या हंगामात त्या कस्तुरीसारखा एक द्रव स्रवतात आणि तो द्रव पाण्यात किंवा जमिनीवर सोडतात. या गंधाच्या साहाय्याने नर व मादी एकमेकांचा माग काढतात. मीलनानंतर मादी कठीण कवच असलेली २०-७० अंडी घालते. खड्‌ड्यात किंवा पालापाचोळ्याच्या घरट्यात अंडी घातली जातात. अंडी उबवताना तापमान ३०° से.पेक्षा कमी असल्यास त्यातून मादी पिले जन्मास येतात. ३०° से. वा त्यापेक्षा अधिक तापमान असल्यास अंड्यातून नर पिले जन्मास येतात. अंड्यात वाढ होत असताना पिलाच्या मुस्कटाच्या टोकावर एक अंड-दंत येतो. दोन-तीन महिन्यांनंतर पिलू अंड-दंताच्या साहाय्याने कवच फोडून बाहेर येते. अंड्यांचे आणि पिलांचे रक्षण मादी करते. या काळात मनुष्याची चाहूल लागताच मादी प्रक्षुब्ध होते.

घडियाल (गॅव्हिॲलिस गँजेटिकस)

घडियाल : सिंधू, गंगा, यमुना, चंबळ व ब्रह्मपुत्रा नद्यांमध्ये गॅव्हिॲलिस गँजेटिकस या जातीची लांब मुस्कट असलेली मगर आढळते. तिला घडियाल म्हणतात. ती मगरींमध्ये सर्वाधिक लांबीची असून तिची लांबी ३·५–५ मी. असते. तिच्या लांब जबड्यात ११०पेक्षा अधिक दात असतात. घडियालचे मुख्य अन्न मासे आहे. मासे पकडण्याची जाळी व अधिवास बदल यांमुळे त्यांची संख्या सु. २३५ एवढी कमी झाली आहे. तिच्या संरक्षणासाठी चंबळ नदीच्या परिसरात कटरनी घाट वन्य प्राणी संरक्षित क्षेत्राची निर्मिती केलेली आहे.

मगरीच्या चामड्यापासून कमरेचे पट्टे, पिशव्या, जाकिटे व पर्सेस तयार करतात. त्यासाठी मागील काही वर्षांत त्यांची शिकार मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यांची संख्या वाढविण्यासाठी भारतात मगर पैदास केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. चेन्नई शहराजवळ असलेल्या मद्रास क्रोकोडाईल केंद्रात मगरींच्या तीनही जातींची वाढ करण्यात येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा