प्राचीन काळी अनेक मानवसमूहांमध्ये मृतांचे दफन केले जात असे. काही संस्कृतींमध्ये मृत शरीरावर विशिष्ट रासायनिक प्रक्रिया करून ते जतन करण्याची (उदा., ममी) पद्धत होती, तर काही संस्कृती व धर्मपरंपरांमध्ये मृताचे दहन करून काही अस्थी स्मारकरूपात ठेवल्या जात असत. अशा सर्व प्रकारे उपलब्ध होणाऱ्या मानवी अवशेषांच्या सूक्ष्म पातळीवरील अभ्यासाने पुरातत्त्वीय निष्कर्षांमध्ये मोलाची भर पडते. पुरातत्त्वीय उत्खननात मिळणाऱ्या अस्थिपंजर किंवा दात अशा अवशेषांचा जीववैज्ञानिक दृष्टिकोनातून अभ्यास करण्याचे काम पुरामानवशास्त्र अथवा जैविक मानवशास्त्रात केले जाते. ही मानवशास्त्राची पुरातत्त्वीय अभ्यासाला मदत करणारी महत्त्वाची शाखा आहे. इंग्लंड व इतर अनेक देशांमध्ये हीच शाखा जैवपुरातत्त्वविज्ञान या नावाने ओळखली जाते. मानवी उत्क्रांती, मानवांमधील विविधता आणि मानवी समूहांनी प्रागैतिहासिक काळापासून केलेले जैविक-सांस्कृतिक अनुकूलन (Bio-cultural adaptations) हा जैविक मानवशास्त्राचा मुख्य गाभा आहे.

जैविक मानवशास्त्राच्या काही उपशाखा आहेत. मानवाचा उगम प्रायमेट प्राण्यांपासून झाला असल्याने मानवी उत्क्रांतीमधील गुंतागुंत समजण्यासाठी प्रायमेट विज्ञानाचा अभ्यास करणे आवश्यक ठरते. प्रायमेट गणातील मानवाखेरीज इतर प्राण्यांमधील शरीररचना आणि सामाजिक वर्तन यांचा तौलनिक अभ्यास केल्याने मानवी उत्क्रांतीमधील विविध टप्पे कळतात. मानव आणि कपी व मर्कट अशा इतर प्रायमेट गणातील प्राण्यांमधील अस्थिरचनेचा अभ्यास अस्थिविज्ञानात केला जातो. त्यामुळे पुरातत्त्वीय उत्खननात मिळणाऱ्या अनेक मानवी अवशेषांना ओळखून उत्क्रांतीच्या दरम्यान कोणकोणते बदल झाले, ते पाहता येते. तसेच हाडे व दात यांच्यावरून मृत व्यक्तीचे वय, लिंग आणि काही प्रसंगी मरणाचे कारण सांगता येते. याशिवाय हाडांवरील खुणा बघून प्राचीन काळातील आहारविषयक समस्या व व्याधी यांच्यावर प्रकाश टाकता येतो. जैविक मानवशास्त्रात हाडे व दात यांच्या मापनाला अतिशय महत्त्व असते, कारण अशा मोजमापांचा वापर प्राचीन काळातील मानवांची उंची व बांधा यांच्याबद्दल अनुमाने काढण्यासाठी करता येतो. मानवशास्त्रात मोजमापांचा उपयोग करून प्राचीन मानवांच्या वंशासंबंधी निष्कर्ष काढले जात होते. तथापि आता वंश ही संकल्पनाच कालबाह्य आणि त्याज्य झाली असल्याने असे संशोधन मान्य केले जात नाही.

प्राचीन काळात शेती व पशुपालनाला प्रारंभ झाल्यानंतर मानवी आहारात अनेक बदल झाले. त्याचप्रमाणे साथीचे रोग वाढले. उदा., एका जागी स्थिर राहून शेती करायला सुरुवात झाल्यानंतर मलेरिया, प्लेग व गोवर अशा रोगांचा प्रसार झाला. पुरातत्त्वीय आणि ऐतिहासिक पुरावे बघून प्राचीन काळातील रोगराईवर संशोधनाचे काम पुराविकृतिविज्ञानात केले जाते. ही जैविक मानवशास्त्राची एक उपशाखा आहे.

या सगळ्या घटनांचे मानवी समूहांवर काय परिणाम झाले आणि बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेण्यासाठी मानवी समाजांनी कोणकोणते उपाय केले, याचा समग्र अभ्यास जैविक-सांस्कृतिक अनुकूलन या क्षेत्रात केला जातो. जैविक मानवशास्त्र केवळ प्राचीन मानवांची शारीरिक रचनाच नाही, तर सामाजिक रचना, सामूहिक वर्तन आणि मानव-पर्यावरण संबंध यांकडेही लक्ष पुरविते. प्राचीन काळातील स्थलांतरे, विविध मानवसमूहांमधील अभिसरण, संघर्ष आणि परस्परसहकार्य अशा अनेक पैलूंचाही समावेश जैविक मानवशास्त्रात होतो. यासाठी सांस्कृतिक मानवशास्त्र आणि समाजशास्त्राचीही मदत घेतली जाते.

संदर्भ :

  • Brothwell, D. R. & Pollard, A. M. Eds. Handbook of Archaeological Sciences, United Kingdom, 2005.
  • Eckhardt, Robert B. Human Paleobiology, Cambridge, 2000.
  • Kennedy, K. A. R. God-Apes and Fossil Men : Paleonanthropology of South Asia, Ann Arbor, 2000.
  • Larsen, C. S. Our Origins, New York, 2011.

समीक्षक : सुषमा देव

This Post Has 2 Comments

  1. Mohan Madwanna

    प्लीज इंग्रजी टायटल द्या म्हणजे त्या वरून इतर ठिकाणी असलेल्या माहितीवरून शोध घेणे सोपे होईल

  2. सरोजकुमार मिठारी

    सर नमस्कार, आपल्या सूचनेनुसार जैविक मानवशास्त्र या नोंदीसाठी इंग्रजी शीर्षक देत आहोत. प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद!

Comments are closed.