रज्जुमान संघातील जलचर प्राण्यांचा अधिवर्ग. मत्स्य अधिवर्गात माशांचा समावेश होत असून त्यांना सामान्यपणे मत्स्य, मीन किंवा मासा म्हणतात. मासे अनियततापी म्हणजे थंड रक्ताचे असून ते कल्ल्यांनी श्‍वसन करतात. पोहण्यासाठी आणि तोल सांभाळण्यासाठी त्यांना पर असतात. शरीर साधारणपणे लांबट, दोन्ही टोकांना निमुळते, प्रवाहरेखित आणि पोहताना किमान रोध होईल असे असते. काही माशांमध्ये वाताशय असते. त्याद्वारे ते पाण्यात वेगवेगळ्या पातळींवर तरंगतात. शरीराचा रंग रेतीसारखा, शेवाळ्यासारखा किंवा पोवळ्यासारखा असतो. भोवतालच्या परिस्थितीनुसार मासे रंग जुळवून घेतात व मायावरण दर्शवितात आणि त्यांद्वारे ते भक्ष्य मिळवितात, स्वत:चे संरक्षण करतात, शत्रूला भीती दाखवितात, नर व मादी एकमेकांना आकर्षित करू शकतात. नर सामान्यपणे भडक रंगाचे आणि आकर्षक असतात. माशांच्या आकारात व वजनात विविधता आढळते. बाकससारख्या काही माशांचा आकार भाकरीसारखा चपटा असतो, तर सूर्यमाशाचा आकार भोपळ्याप्रमाणे वाटोळा असतो. पँडका पिग्मिया  ही माशांची सर्वांत लहान जाती असून तिची  लांबी ९–११ मिमी. असते, तर ऱ्हिंकोडॉन टायपस  ही जाती सर्वांत लांब म्हणजे सु. २० मी. लांब असते. होराइक्थीस सेटनाय  ही जाती वजनाने सर्वांत कमी असून तिचे वजन ०¿०८ ग्रॅ. असते. तर काही मोठ्या माशांचे वजन सु. ६८,००० किग्रॅ. असल्याचे आढळले आहे. मासे सर्व प्रकारच्या पाण्यात आढळत असून काही खाऱ्‍या पाण्यात, काही गोड्या पाण्यात तर काही मचूळ पाण्यात राहतात. परंतु गरम पाण्याचे झरे, मृत समुद्र, ग्रेट सॉल्ट लेक, लोणार सरोवर, ज्वालामुखींच्या कुंडांतील तळी यांत मासे आढळत नाहीत.

शरीररचना : माशाच्या शरीराचे डोके, धड आणि शेपटी असे तीन भाग असतात. डोक्याच्या पुढच्या बाजूस जबड्यांनी वेढलेले मुख, नासाछिद्रे आणि दोन्ही बाजूंना डोळे असतात. डोक्याच्या पश्‍चभागी श्‍वसनासाठी कल्ले असतात. त्यांना बाह्यकर्ण नसतात. डोके आणि धडाच्या मानाने शेपटी लहान असते. सर्व शरीरावर त्वचा असून त्वचेमध्ये रंगद्रव्ययुक्त पेशी असल्यामुळे त्यांचे रंग निरनिराळे दिसतात. त्वचेत श्‍लेष्मल पेशीही असतात. त्यांच्या स्रावामुळे माशांच्या शरीराला बुळबुळीतपणा येतो.

बहुतेक माशांच्या शरीरावर खवले असून ते त्वचेपासून तयार झालेले असतात. ट्यूना माशामध्ये धडाच्या फक्त अधर भागावर खवले असतात. परंतु सुरमई, शिवडा, शिंगाडा, शिंगटी, अहीर व वाम या माशांना खवले नसतात. सागरी घोडामासा व नळीमासा यांचे शरीर अस्थींनी आच्छादलेले असते. काही मार्जार माशांत शरीरावर खवल्यांऐवजी तकटे असतात. माशांचे खवले पट्टिकाभ, कंकताभ व चक्राभ प्रकारांचे असून त्यांवर वर्तुळाकार रेषा असतात. त्यांपैकी काही रेषांना जननरेषा म्हणतात. खवल्यांच्या अभ्यासावरून माशांची जाती, वय, लांबी, रुंदी, वजन व त्याचे प्रजनन किती वेळा झाले असावे याचा अंदाज घेता येतो.

माशांचा सांगाडा कास्थींनी किंवा अस्थींनी बनलेला असतो. त्वचेच्या खालचा भाग स्नायूंनी व्यापलेला असून इतर पृष्ठवंशी प्राण्यांप्रमाणे त्वचेखाली मेदाचा थर नसतो. ऐच्छिक स्नायू हे शरीराच्या दोन्ही बाजूंना ∑ किंवा नागमोडी आकाराचे असून ते शरीरातील कास्थींना किंवा अस्थींना जुळलेले असतात. परांशी जुळलेले स्नायू बळकट असतात.

शरीरावर पर असून काही पर एकल तर काही जोडीने असतात. पृष्ठपर, पुच्छपर, गुदपर हे एकल आणि मध्यभागी असतात. पुच्छपरामुळे शरीर पुढे ढकलले जाऊन गती वाढते. वक्षपर व श्रोणिपर हे जोडीने आणि शरीराच्या बाजूंवर असून ते गतीवर नियंत्रण ठेवण्यास आणि तोल सांभाळण्यास मदत करतात. परांमध्ये अस्थिशलाका (अरास्थी) असून त्यांमुळे परांना मजबुती येते. वाम व अहीर या माशांत पृष्ठपर, पुच्छपर आणि गुदपर या तिन्हींचा मिळून एकच पर बनलेला असतो.

श्वसन : माशांना श्वसनासाठी असलेले कल्ले (क्लोम) हे कल्लाकक्षात असतात. कल्ल्यांच्या तळाशी आधारासाठी कल्लाचाप असतो. कल्लाचापाला अनेक कल्लातंतू असतात. त्यांवर केशवाहिन्या असतात. तोंडावाटे घेतलेले पाणी कल्लातंतुंवरून जाताना पाण्यातील ऑक्सिजन केशवाहिन्यांतील रक्तात शोषला जातो व कार्बन डायऑक्साइड पाण्यात सोडला जातो आणि ते पाणी बाहेर टाकले जाते. (पहा : कु. वि. भाग – १ कल्ले).

रक्ताभिसरण : हृदय दोन्ही कल्लाकक्षांच्या मध्यभागी असते. ते एक अलिंद आणि एक निलय असे दोन कप्प्यांचे असते. हृदयात यांखेरीज महारोहिणी शंकू व नीलकुहर असे दोन अधिक कप्पे असतात. माशांच्या हृदयात अशुद्ध रक्त असते. ते रक्त कल्लाकक्षांकडे पाठविले जाते आणि शुद्ध केले जाते.

माशाच्या शरीरात निरनिराळी आंतरांगे असतात. या आंतरांगांनी पचन संस्था, उत्सर्जन संस्था, अंत:स्रावी ग्रंथी संस्था व प्रजनन संस्था बनलेल्या असतात.

पचन संस्था : पचन संस्थेची सुरुवात मुखाने होते. या भागात माशांचे दात, जबडे, टाळू, कल्लाचाप आणि घसा असतात. दातांचा उपयोग अन्नचर्वणासाठी होत नसून फक्त भक्ष्य पकडण्यासाठी होतो. जठराचा आकार माशांच्या अन्नावर अवलंबून असतो. प्राणिभक्षी माशांमध्ये जठर फुगीर असून आतडे आखूड, तर वनस्पतिभक्षी माशांमध्ये आतडे अधिक लांब असते. उदा., रोहू व मृगळ या वनस्पतिभक्षी माशांमध्ये आतडे शरीराच्या लांबीच्या १०–१२ पट लांब असते. आतड्याची लांबी कमी असलेल्या माशांमध्ये आतड्याच्या आतील बाजूला सर्पिल झडप असते. या झडपेमुळे शोषणशील पृष्ठभाग वाढून अन्नपचन पूर्ण होऊन अन्नाचे अभिशोषण जलद होते.

उत्सर्जन संस्था : माशांमध्ये दोन वृक्के (मृत्रपिंडे) असून ती आकाराने लांबट, तांबूस वा किरमिजी रंगाची असतात. वृक्के उत्सर्जनाचे तसेच परासरणाचे कार्य करतात. ही कार्ये त्वचा व कल्ला यांद्वारेही होतात. बहुसंख्य माशांत गुदद्वार असून त्यावाटे मल बाहेर टाकला जातो. शार्क, रे मासे, स्केट व डिप्नोई या माशांमध्ये अवस्कर छिद्र असते. त्यावाटे मल, मूत्र व जननपेशी बाहेर टाकल्या जातात.

अंत:स्रावी ग्रंथी संस्था : माशांमध्ये पियुषिका, अवटू, स्वादुपिंड, अधिवृक्क, अंडाशय तसेच वृषण इत्यादी अंत:स्रावी ग्रंथी असतात.

चेता संस्था : माशांमध्ये चेतासंस्था पूर्णपणे विकसित झालेली असून तिचे मध्यवर्ती, परिघीय आणि स्वायत्त असे भाग असतात.

ज्ञानेंद्रिये: माशांना नाक, डोळे, कान, मुखगुहा व पार्श्‍विक रेखा अशी ज्ञानेंद्रिये असतात. दृष्टी एकनेत्री असून प्रत्येक डोळा स्वतंत्र प्रतिमा ग्रहण करतो. डोळ्यांवर पापण्या नसल्यामुळे त्यांना डोळे मिटून झोप घेणे शक्य नसते. जेव्हा मासे झोपतात तेव्हा ते एका जागी स्थिर राहतात. जे मासे गढूळ पाण्यात किंवा कमी उजेडात राहतात त्यांचे डोळे मोठे असतात. मुखाच्या वरच्या बाजूस नाकाची दोन नासारंध्रे असतात. त्यांखाली संवेदनाक्षम चेता असून त्या घ्राणेंद्रियांचे काम करतात. पाण्याचा गंध आणि चव ओळखून मासे भक्ष्य मिळवितात. माशांना फक्त आंतरकर्ण असून त्यांद्वारे शरीराचा तोल सांभाळला जातो आणि पाण्यात निर्माण झालेले ध्वनितरंग मेंदूपर्यंत पोहोचविले जातात. मुखगुहेत हालचाल न होणारी जीभ असते. मुखगुहेतील रुचिकलिका रुचिसंवेदनांची जाणीव करून देतात. काही माशांच्या मुखाजवळ मिशा असतात. त्यांवरील रुचिकलिका भक्ष्य शोधण्यासाठी उपयोगी पडतात. पार्श्‍विक रेखा ज्ञानेंद्रिय फक्त मत्स्य अधिवर्गातच असते. ही रेखा त्वचेखालील संवेदी पेशी असलेल्या नलिकांची बनलेली असते. या नलिका डोळ्यांपासून शरीराच्या दोन्ही बाजूंनी शेपटीपर्यंत असतात. त्यांच्यावर रंध्रे असतात. या रेखांमुळे पाण्याच्या दाबाची व पाण्यातील विविध प्रवाहांची माशांना जाणीव होते. याखेरीज स्पर्श, तापमान व वेदना यांची जाणीव करून देणारे चेतातंतू त्वचेखाली पसरलेले असतात.

प्रजनन संस्था : मासा एकलिंगी असून नर आणि मादी यांच्या शरीररचनेत फारसा फरक नसतो. प्रजननाच्या वेळी मादीचा अधरभाग मोठा होतो. काही नरांत गुदपक्षाच्या २-३ अरांपासून जननभुजा तयार होते. कास्थिमत्स्यात नराला आलिंगके असतात. नर माशाच्या देहगुहेत दोन वृषणे तर मादीत दोन अंडाशये असतात. नराचे वृषण लंबगोलाकार असून त्यात शुक्रपेशी तयार होतात, तर मादीचे अंडाशय पिशवीसारखे असून त्यात अंडपेशी तयार होतात. बहुतांशी मासे (९७%) अंडज असून बाकींपैकी काही जरायुज तर काही अंडजरायुज असतात. अंडज माशांमध्ये आंतरफलन तसेच बाह्यफलन घडून येते. आंतरफलनात मादी फलित अंडी पाण्यात घालते, तर बाह्यफलनात मादीने घातलेल्या अंड्यांवर नर शुक्रपेशी सोडतो. या अंड्यांचा विकास पाण्यात होऊन डिंभ बाहेर येतो आणि त्यापासून प्रौढ मासा तयार होतो. जरायुज माशांमध्ये आंतरफलन होते, डिंभाची वाढ मादीच्या शरीरात होऊन मादी पिलांना जन्म देते. अंडजरायुज माशांमध्येही आंतरफलन होते. मात्र, मादी फलित अंडी एका पिशवीत घालते आणि ती पिशवी पाण्यात सुरक्षित जागी ठेवते. या पिशवीत डिंभांची वाढ होऊन पिले बाहेर येतात. माशांचा आयु:काल १-२ वर्षांपासून २०–३० वर्षे असतो.

काही मासे एकेकटे राहतात तर काही समूहाने किंवा झुंडीने वावरतात. काही वेळा वेगवेगळ्या समूहांतील मासे एकमेकांत मिसळतात. त्यांच्यात एकमेकांशी संदेशवहन होते, दोन नरांमध्ये युद्ध होते व मादीसाठी स्पर्धा होते. माशांचे नर आणि मादी एकत्र घरटी बांधतात. काही लहान मासे मोठ्या माशांच्या मुखगुहेत व कल्ल्यांत जाऊन स्वच्छता करतात. अशा माशांना डॉक्टर मासे म्हणतात. या डॉक्टर माशांना मोठे मासे कोणतीही इजा करीत नाहीत किंवा खात नाहीत. प्रजनन, भक्ष्य मिळविणे व प्रतिकूल परिस्थितीतून सुटका करून घेणे यासाठी मासे स्थलांतर करतात. बांगडे व तरळी हे मासे झुंडीने स्थलांतर करतात. हिलसा, रावस इत्यादी मासे खाऱ्‍या पाण्यातून गोड्या पाण्यात, तर वामसारखे गोड्या पाण्यातील मासे खाऱ्‍या पाण्यात स्थलांतर करतात.

उपयोग : मासे हे मानवाचे महत्त्वाचे अन्न आहे. माशांमध्ये प्रथिने, मेद आणि क्षार असून त्यांत मेदविद्राव्य जीवनसत्त्वेदेखील असतात. ते पचायला हलके असतात. मासे आणि त्यांचे तेल हृदयविकारांवर गुणकारी असते. शार्क, कॉड व हॅलिबट या माशांच्या यकृतापासून आणि जीवनसत्त्वयुक्त तेल मिळते; त्याला यकृत तेल म्हणतात. छोट्या माशांपासून शरीर तेल मिळते. या तेलांचा पूरक अन्न म्हणून वापर केला जातो. रावस, हेरिंग, बांगडा, तरळी व ट्यूना या माशांच्या शरीर तेलात ओमेगा-३ मेदाम्ल असते. त्यांच्या सेवनाने रक्तातील वाईट कोलेस्टेरॉलची पातळी कमी होते, रक्तातील गुठळ्यांचा नाश होतो आणि रक्तदाब कमी होतो. शार्कच्या परांपासून सूप तयार करतात. माशांपासून मत्स्यपीठ व मत्स्यखत तयार करतात. त्यांचे खवले वाळवून पॉलिश पेपर म्हणून वापरतात. माशांचे कातडे कमावून त्यापासून पट्टे, दागिन्यांच्या पेटीसाठी अस्तर, पुस्तके व तलवारींच्या मुठी यांना वेष्टन करतात. हिवताप निर्मूलनात डासांच्या अळ्या नष्ट करण्यासाठी गपी मासे पाण्यात सोडतात. संशोधनामध्ये मासे प्रायोगिक प्राणी म्हणून वापरतात. काही मासे पाण्यातील प्रदूषण शोधण्यासाठी उपयुक्त पडतात. गोड्या पाण्यातील एंजल, सकर, गुरामी, गोल्डफिश, झेब्राफिश, पफरफिश, मोली, शार्क, स्वाेर्डटेल इत्यादी मासे जलजीवालयात ठेवतात. मत्स्यपारध अथवा माशांची शिकार हा जगभरातील एक छंद आहे. गळ, धनुष्यबाण, भाला, बंदुकीने मासे पकडले जातात. मरळ, कटला, मृगळ, रोहू व तिलापिया हे गोड्या पाण्यातील तर रावस, ट्यूना, तलवार मासा, कॉड व हॅलिबट हे खाऱ्या पाण्यातील मासे शिकारीने पकडतात. समुद्र, नदीमुख, नद्या व जलाशये यांतील मासे घरगुती उपयोगासाठी पकडणे आणि ते योग्य प्रकारे साठवून विकणे तसेच त्यापासून निरनिराळे पदार्थ तयार करणे यांस मत्स्योद्योग म्हणतात.

वर्गीकरण: काही संधिपाद, मृदुकाय आणि कंटकचर्मी संघांतील प्राण्यांच्या शरीरावर कवच असून ते जलचर आहेत. त्यांना कवचधारी मासे म्हणजे शेलफिश म्हणतात. असे प्राणी क्रेफिश, कटलफिश, स्टारफिश या नावांनी ओळखले जातात. तसेच जेलिफिश, सिल्व्हरफिश या नावांतही फिश हा शब्द आहे. मात्र, वैज्ञानिकदृष्ट्या ते मासे नाहीत. व्हेल याला देवमासा म्हणतात. परंतु तो माशासारखा असला तरी तो मासा नसून एक माेठा जलचर सस्तन प्राणी आहे.

रज्जुमान संघाच्या वर्गीकरणाबाबत वैज्ञानिकांमध्ये मतभिन्नता आहे. वर्गीकरणाच्या एका पद्धतीनुसार, या संघाच्या पृष्ठवंशी उपसंघाचे जंभहीन आणि जंभयुक्त असे दोन विभाग करतात. त्यातील जंभयुक्त विभागाचे मत्स्य  आणि चतुष्पाद असे दोन अधिवर्ग आहेत. मत्स्य अधिवर्गाचे माशांचा अधिवास आणि सांगाड्याचे स्वरूप यांनुसार कास्थिमत्स्य आणि अस्थिमत्स्य असे दोन वर्ग केले आहेत; तर चतुष्पाद अधिवर्गाचे उभयचर, सरीसृप, पक्षी आणि स्तनी असे चार वर्ग केले आहेत. वर्गीकरणाच्या दुसऱ्‍या पद्धतीनुसार अधिवर्ग असे वर्गीकरण न करता जंभयुक्त विभागाचे कास्थिमत्स्य, अस्थिमत्स्य, उभयचर, सरीसृप, पक्षी आणि स्तनी असे सहा वर्ग केले आहेत.

(अ) कास्थिमत्स्य वर्ग: (काँड्रिक्थीज). या वर्गातील माशांचा सांगाडा कास्थींचा बनलेला असतो. ते खाऱ्‍या पाण्यात राहतात. मात्र काही शार्क गोड्या किंवा मचूळ पाण्यात आढळतात. कास्थिमत्स्य हिंस्र आणि प्राणिभक्षी असतात. त्यांच्या शरीरावर सूक्ष्म पट्टिकाभ खवले असतात. या माशांत पृष्ठरज्जू असून मणके पूर्ण परंतु सुटे असतात. श्‍वसनासाठी कल्ल्यांच्या पाच जोड्या असतात. मात्र काहींमध्ये कल्ल्यांच्या सात जोड्या असतात. कल्लाविदरे वेगळी असून त्यांवर कल्ला आवरण नसते. वाताशय नसते. पुच्छपर द्विभाजित असून तो असममित असतो. पचन संस्थेत जठर इंग्रजीचे ‘J ‘ अशा आकाराचे असून आतड्यात सर्पिल झडप असते. कास्थिमाशांत अवस्कर छिद्र असून त्याद्वारे मल, मूत्र आणि जननपेशी बाहेर टाकल्या जातात. नरांमध्ये श्रोणिपरांबरोबर दंडासारखी आलिंगके असून त्यांचा उपयोग मीलनाच्या वेळी मादीच्या अवस्कारात शुक्रपेशी सोडण्यासाठी होतो. नरात वृषणांची एक जोडी आणि मादीमध्ये अंडाशयाची एक जोडी असते. अंडवाहिन्या अंडाशयाशी जोडलेल्या नसतात. त्यांच्यात आंतरफलन होत असून त्यांपैकी काही अंडज, काही जरायुज, तर काही अंडजरायुज असतात. कास्थिमत्स्य वर्गाचे सेलॅची व होलोसेफालाय असे दोन उपवर्ग आहेत.

सेलॅची : या उपवर्गातील माशांत कल्ल्यांच्या ५–७ जोड्या असतात. कल्लाविदरे वेगळी असून त्यांच्याही ५–७ जोड्या असतात. अवस्कर छिद्र शरीराच्या अधर बाजूस असते. प्लुरोट्रेमॅटा व हायपोट्रेमॅटा असे दोन गण आहेत. (१) प्लुरोट्रेमॅटा : यांतील माशांचा आकार लांबट, दोन्ही टोकांना निमुळता असून शरीर दोन्ही बाजूंना चपटे असते. कल्ले शरीराच्या दोन्ही बाजूंना असून त्यांच्या ५–७ जोड्या असतात. उदा., शार्क. (२) हायपोट्रेमॅटा : यांतील माशांचा शरीराचा आकार तबकडीसारखा असतो. शरीर वरच्या व खालच्या बाजूने चपटे असून मागच्या बाजूला लांब असते. शेपूट लांब असते. कल्ले शरीराच्या खालच्या बाजूला असून त्यांच्या पाच जोड्या असतात. उदा.,  रे मासे, स्केट.

उंदीर मासा

होलोसेफालाय : या माशांत कल्लाविदरांची एक जोडी असून त्यावर मांसल आवरण असते. शरीरावर खवले नसतात. अवस्कर छिद्राऐवजी गुदद्वार असते. नरांना अनेक आलिंगके असतात. उदा., उंदीर मासा.

(आ) अस्थिमत्स्य वर्ग : (ऑस्टेक्थीज). या वर्गातील माशांचा सांगाडा अस्थींनी म्हणजे हाडांचा बनलेला असतो. अस्थिमत्स्य खारे, गोडे तसेच मचूळ पाण्यात राहतात. वनस्पती आणि प्राणी यांच्यावर ते उपजीविका करतात. ते हायड्रिला व इलोडिया अशा पाणवनस्पती तसेच डायाटम, शैवाल, प्लवक, वलयांकित प्राणी, कीटकांच्या अळ्या, कीटक व लहान मासे खातात. शरीरावर कॉस्मॉइड, गॅनॉइड, लेप्टॉइडमधील चक्राभ (सायक्लॉइड) आणि कंकताभ (टेनॉइड) अशा प्रकारचे मोठे खवले असतात. (पहा : कु. वि. भाग – १ खवले). पृष्ठरज्जूचे रूपांतर मणक्यांनी तयार झालेल्या पाठीच्या कण्यात झालेले असते. मुख शरीराच्या अग्र टोकास तर काही माशांमध्ये ते काहीसे अधर बाजूला असते. दोन्ही जबड्यांवर दात असतात. श्‍वसनासाठी कल्ल्यांच्या चार जोड्या असून त्यांवर आवरण असते. अनेक अस्थिमत्स्यांत हवेने भरलेले वाताशय असते. ते आतड्याच्या वरच्या बाजूस असून लांबट व पांढऱ्‍या रंगाच्या पिशवीसारखे असते. वाताशय जलस्थितक म्हणून कार्य करते व माशांची तरणक्षमता वाढविते. ध्वनिनिर्मिती व ध्वनिग्रहण या कार्यांसाठीही ते उपयोगी पडते. पुच्छपराचे समखंडित, विषमखंडित आणि अखंडित असे तीन प्रकार आढळतात. परांमध्ये अस्थिशलाका असतात. नरांमध्ये आलिंगके नसतात. मादीमध्ये अंडवाहिन्या अंडाशयाशी जुळलेल्या असतात. बहुतांशी अस्थिमत्स्य अंडज आहेत; काही जरायुज, तर काही अंडजरायुज आहेत. अस्थिमत्स्यांत गुदद्वार आणि जननरंध्र असते. या वर्गाचे सारकोप्टेरिजीआय आणि आक्टिनोप्टेरिजीआय असे दोन उपवर्ग आहेत.

सीलॅकँथ

सारकोप्टेरिजीआय : या उपवर्गातील माशांत जोडीपरांच्या मुळाशी एक मांसल खंड असतो. हे जोडीपर पायांप्रमाणे असतात. या उपवर्गाचे दोन गण केले जातात : (१) क्रॉसोप्टेरिजीआय  : या गणांतील माशांमध्ये जोडीपरांच्या मुळाशी मांसल खंड असतो. पुच्छपर त्रिखंडित असतो. वाताशय अवशेषांग स्वरूपात असते. उदा., सीलॅकँथ. (२) डिप्नोई : या गणांतील माशांमध्ये पुच्छपर द्विखंडित असतो. कल्ले आणि वाताशय या दोन्हींद्वारे श्‍वसन होते. वाताशयावर केशवाहिन्यांचे जाळे असून ते फुप्फुसारखे कार्य करते. या गणाला फुप्फुसमीन गण असेही म्हणतात. उदा., ऑस्ट्रेलियातील एपिसेरॅटोडस, आफ्रिकेतील प्रोटोप्टेरस आणि दक्षिण अमेरिकेतील लेपिडोसायरन.

प्रोटोप्टेरस

ॲक्टिनोप्टेरिजीआय : या उपवर्गातील माशांत जोडीपरांच्या मुळाशी मांसल खंड नसतो. जोडीपर पातळ, रुंद असून सर्व परांमध्ये अस्थिशलाका असतात. या उपवर्गाचे पुढील तीन गण आहेत : (१) काँड्रॉस्टिआय : या गणातील माशांचे मुख मोठे असते. उदा., पॉलिप्टेरस, एसिपेन्सर. (२) होलोस्टिआय : या गणातील माशांचे मुख लहान असते. उदा., एमिया, लेपिडोस्टस. (३) टेलिऑस्टिआय : या गणातील माशांचे मुख लहान असून ते अग्र टोकास असते. खवले चक्राभ प्रकारचे असतात. त्यांच्यात वाताशय असते. या गणात सु. ९०% मासे समाविष्ट असून त्यात अनेक उपगण आणि कुले आहेत. हे मासे प्रगत आणि आधुनिक मानले जातात. उदा. रोहू, कटला, समुद्री घोडा, पापलेट, बोंबिल, तरळी, बांगडा इत्यादी.

प्रतिक्रिया व्यक्त करा