एक सर्वपरिचित कीटक. मधमाशीचा समावेश संधिपाद संघाच्या कीटक वर्गाच्या हायमेनॉप्टेरा गणाच्या एपिडी कुलात केला जातो. जगात मधमाशीच्या चार जाती आढळून येतात. एपिस  ही मधमाशीची मुख्य प्रजाती आहे. या प्रजातीतील सर्व मधमाश्यांना नांगी असते आणि त्यांना दुखावल्यास त्या नांगीने डंख मारतात. त्यांपैकी एपिस मेलिफेरा  ही जाती यूरोप, आफ्रिका आणि अमेरिका येथे आढळते, तर ए. डॉर्‌सॅटा, ए. सेराना इंडिका आणि ए. फ्लोरिया या तीन जाती भारतात आढळतात.

एपिस मेलिफेरा : या मधमाशीला ‘इटालियन मधमाशी’ म्हणतात. तिची लांबी ८–१३ मिमी. असते. या मधमाश्या कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळतात. पंजाब आणि हरियाणा या राज्यांत अलीकडे या मधमाश्या मोठ्या प्रमाणावर पाळताना दिसून येतात.

एपिस डॉर्‌सॅटा : स्थानिक भाषेत तिला ‘आग्या मधमाशी’ म्हणतात, तर त्यांच्या पोळ्याला ‘आग्या मोहोळ’ म्हणतात. भारतात आढळणाऱ्या मधमाश्यांमध्ये आकारमानाने ही सर्वांत मोठी असून तिची लांबी १८–२१ मिमी. असते. ती डोंगरमाथ्यापासून उतरणीवर सर्वत्र आढळते. तिचे घरटे म्हणजे पोळे आकारमानाने खूप मोठे असून ते १ मी. लांब, तर ०·७५ मी. रुंद असू शकते. पोळे उघड्यावर असून खडकाला, मोठ्या झाडाच्या फांद्यांना अथवा उंच इमारतीच्या छताला चिकटलेले असते. या मधमाश्या अतिशय चिडखोर आणि नांगीने डंख मारणाऱ्या असतात. त्यांच्या उघड्यावर राहण्याच्या आणि नांगी मारण्याच्या सवयीमुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांत पाळता येत नाही.

सातेरी मधमाश्यांची पोळी

एपिस सेराना इंडिका : या मधमाशीला ‘सातेरी मधमाशी’ म्हणतात. ती आकारमानाने मध्यम असून तिची लांबी १०–१६ मिमी. असते. नैसर्गिक वातावरणात यांची पोळी झाडांच्या ढोलीत, खडकांतील भेगा, इमारतींच्या भिंतीतील आडोशाच्या जागा, घरातील अडगळीच्या जागा, रिकाम्या पेट्या व खोकी अशा आच्छादित ठिकाणी आढळतात. त्यांची अनेक पोळी बऱ्याचदा एका ठिकाणी व एकमेकांच्या बाजूंना आढळून येतात. या मधमाश्या शांत, मवाळ व सहसा नांगी न मारणाऱ्या असतात. त्या सहज माणसाळत असल्यामुळे त्यांना कृत्रिम लाकडी मधुपेट्यांमध्ये पाळता येते.

एपिस फ्लोरिया : हिला ‘फुलोरी मधमाशी’ म्हणतात. भारतीय मधमाश्‍यांत ती आकारमानाने सर्वांत लहान असून तिची लांबी ८–१३ मिमी. असते. या मधमाश्या उघड्यावर पोळे बांधतात. पोळे तळहाताच्या आकारमानाचे असून ते मध्यम उंचीच्या झाडाच्या फांदीला बांधलेले असते.

या चारही जातींच्या मधमाश्यांच्या आकारमानांतील फरक सोडला तर त्या एकसारख्या असतात. मधमाश्‍या समाजप्रिय असून वसाहती करून राहतात. त्यांच्या शरीराचा रंग काळा किंवा तपकिरी असतो. शरीर केसाळ असते. शरीराचे डोके, वक्ष आणि उदर असे तीन भाग असतात. डोके त्रिकोणी असून वक्षाइतकेच रुंद असते. डोक्यावर शृंगिका, दोन संयुक्त नेत्र, तीन साधे नेत्र आणि मुखांगे असतात. डोके लवचिक मानेने वक्षाशी जुळलेले असते. वक्ष तीन खंडांचे बनलेले असून प्रत्येक खंडावर पायाची एक जोडी असते. पाय बळकट असतात. पंखांच्या दोन जोड्या असतात. उदर सहा खंडांचे असते. ते रुंद टोक असलेले असून लांबोळके दिसते. उदराचा सहावा खंड इतर खंडांच्या मानाने पुढे आलेला दिसतो. उदराच्या शेवटी काटेरी आणि वाकडी नांगी असते.

मधमाशीची पचन संस्था पूर्ण विकसित असते. उत्सर्जन संस्थेत मालपीगी नलिका असतात. रक्ताभिसरण संस्था खुली असते. श्वसन संस्था ही श्वसनरंध्रे आणि श्वसननलिका यांपासून बनलेली असते. चेतासंस्था पूर्ण विकसित असून त्यात मेंदू, चेतारज्जू, सात गुच्छिका आणि अनेक चेतातंतू असतात. संयुक्त नेत्र, साधे नेत्र, शृंगिका, स्पर्शसंवेदी केस, मुखांगातील रुची इंद्रिये अशी ज्ञानेंद्रिये असतात. पोळ्यामध्ये कामकरी माशी, राणीमाशी आणि नरमाशी अशा तीन प्रकारच्या मधमाश्या असून त्यांच्यामध्ये कार्यानुसार वर्गीकरण झालेले असते.

मधमाश्यांचे तीन प्रकार : (१) कामकरी माशी, ( २) राणीमाशी, ( ३) नरमाशी

कामकरी माशी : या माद्या असतात. मधमाश्यांच्या पोळ्यात यांची संख्या सर्वांत जास्त असते. सातेरी मधमाश्यांच्या पोळ्यात ही संख्या २०,०००–६०,००० असते. कामकरी माश्‍या आकारमानाने राणीमाशी तसेच नरमाशी यांच्यापेक्षा लहान असतात. त्यांच्या डोक्याच्या खालच्या बाजूस मुखांगे असतात. मुखांगात उत्तरोष्ठ, अधरोष्ठ, जंभ, जंभिका व जिव्हा हे भाग असतात. त्यांपैकी जिव्हा (जीभ) एखाद्या शोषनळीसारखी लांब असते आणि त्याद्वारे फुलातील मकरंद त्या शोषून घेतात. जंभ आणि जंभिकांच्या साहाय्याने मेणापासून त्या पोळे बांधतात. वक्षावर पायांच्या तीन जोड्या असतात. पायांवर पराग कुंचला, पराग कंटक, पराग एकत्रक, पराग कंगवा आणि पराग पिशवी अशा संरचना असतात. त्यांचे शरीर केसाळ असते. एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जाताना त्यांच्या केसाळ शरीराला परागकण सहज चिकटतात. परागकण पराग कंगव्यांनी झाडून पराग कुंचले, पराग कंटक आणि पराग एकत्रकांच्या साहाय्याने पराग पिशव्यांत साठविले जातात. असे परागकण पोळ्यात ठेवले जातात. त्यांच्या उदरावर काळे व पांढरे असे एकालगत एक पट्टे असतात. कामकरी माश्यांच्या उदरावर मेणग्रंथी असतात. यातून मेण स्रवते व त्यापासून या माश्‍या पोळे बांधतात. त्यांच्या उदराच्या टोकाला नांगी असते. कामकरी माश्यांचा आयु:काल ७०–७५ दिवसांचा असतो. पहिले सु. ३५ दिवस त्या पोळ्यात राहून कामे करतात. नंतरचे सु. ३५ दिवस त्या पोळ्याबाहेर पडून वसाहतीबाहेरील कामे करतात. कामकरी माश्यांचे त्या करीत असलेल्या कामानुसार काही प्रकार असतात. पोळ्यात राहून काम करणाऱ्या माश्यांमध्ये सफार्इ माश्‍या, दार्इ माश्‍या, बांधकाम करणाऱ्या माश्‍या, वारा घालणाऱ्या माश्‍या, संगोपन करणाऱ्या माश्‍या, रक्षक माश्‍या इ. प्रकार असतात. पोळ्याबाहेर पडून काम करणाऱ्या मधमाश्यांमध्ये शोधक माश्‍या आणि अन्न गोळा करणाऱ्या माश्‍या असे दोन प्रकार असतात. रक्षक माश्‍या नांगीने डंख करून शत्रूला पिटाळून लावतात व पोळ्याचे रक्षण करतात. कामकरी रक्षक माशीची नांगी काटेरी असते. ती नांगी शत्रूच्या शरीरात अडकून राहते आणि रक्षक माशीच्या शरीरापासून तुटते. त्यामुळे रक्षक माशी मरते. कामकरी माशीमध्ये प्रजनन संस्था विकसित झालेली नसल्यामुळे त्या वांझ असतात. त्या फलित अंड्यांपासून निर्माण होतात.

राणीमाशी : राणीमाशी ही पोळ्यातील सर्वांत महत्त्वाची मधमाशी असते. ती प्रजननक्षम असते. पोळ्यात एक राणीमाशी असते. मात्र नवीन पोळे तयार होण्याच्या वेळी दोन किंवा तीन राणीमाश्या असतात. राणीमाशी आकारमानाने सर्वांत मोठी असते. तिचा रंग चमकदार काळा असतो. तिचे उदर फुगीर असून टोकाचा भाग निमुळता असतो. ‍राणीमाशीच्या आजूबाजूला नेहमी कामकरी माश्‍या वावरत असतात. त्या राणीमाशीला अन्न भरवितात. तसेच तिचे रक्षण करतात. राणीमाशीला नांगी असते. बहुधा या नांगीचा उपयोग दुसऱ्या राणीमाशीला ठार मारण्यासाठी केला जातो. राणीमाशीच्या शरीरातून स्रवणाऱ्या ऑक्सिडीसिऑनिक आम्ल या स्पर्शगंधामुळे (फेरोमोन) पोळ्यातील सर्व माश्‍या एकत्र राहतात. राणीमाशीचा आयु:काल दोन–तीन वर्षे असतो.

नरमाशी : नरमाशी आकारमानाने कामकरी माशीपेक्षा मोठी असते. तिचा रंग काळा असतो व उदराच्या टोकाचा भाग चौकोनी असतो. सामान्यपणे पोळ्यात ५०–२०० नर असतात. त्यांची निर्मिती अफलित अंड्यांपासून अनिषेकजनन पद्धतीने झालेली असते. ते आळशी आणि ऐतखाऊ असल्यामुळे मकरंद आणि परागकण गोळा करू शकत नाहीत. त्यांना अन्न कामकरी माश्‍या भरवितात. नरमाश्यांचे डोळे मोठे असतात आणि त्यामुळेच मीलनाच्या वेळी ते राणीमाशीचा सहजपणे पाठलाग करू शकतात. त्यांचा आयु:काल ६० दिवसांचा असतो.

सर्वसाधारणपणे हिवाळ्याच्या शेवटी अथवा उन्हाळ्याच्या प्रारंभी राणीमाशी पोळ्यातून बाहेर येते. तिच्याबरोबर अनेक कामकरी माश्‍या व नरमाश्‍या झुंडीने बाहेर येतात. याला मोहोळ उठणे म्हणतात. पहिल्या झुंडीत जुनी राणीमाशी, तर दुसऱ्या झुंडीत नवीन राणीमाशी असते. जुनी राणीमाशी परत जुन्या पोळ्यात येते किंवा कामकरी माश्यांनी तयार केलेल्या नवीन पोळ्यात जाते आणि कालांतराने मरून जाते. नवीन राणीमाशीचे हे पहिलेच उड्डाण असते आणि तिच्या मागे अनेक नरमाश्‍या उड्डाण करतात. याला ‘मीलन उड्डाण’ म्हणतात. असे मीलन उड्डाण राणीमाशीच्या आयुष्यात फक्त एकदाच घडून येते. या मीलनात राणीमाशीचे अनेक नरमाश्यांबरोबर मीलन होते, तेव्हा नरमाश्या राणीमाशीच्या शरीरात शुक्रपेशी सोडतात. या शुक्रपेशी राणीमाशीच्या शुक्रग्राहिकेत साठविल्या जातात. राणीमाशीने आयुष्यभर घातलेली सर्व अंडी फलित करण्यासाठी या शुक्रपेशी पुरेशा असतात. मीलनानंतर नराचे शिश्न व शुक्रग्राहिका तुटून ते राणीमाशीच्या प्रजनन संस्थेत अडकून राहतात. त्यामुळे ज्या नरांचे राणीमाशीबरोबर मीलन होते असे नर मीलनानंतर मरतात किंवा त्यांना कामकरी माश्‍या मारून टाकतात.

मीलनांनतर राणीमाशी वेगळी राहते. तिच्याबरोबर अनेक कामकरी माश्‍या येतात. त्या सर्व नवीन पोळे बांधायला सुरुवात करून नवीन पोळ्यात राहू लागतात. मीलनानंतर राणीमाशी आयुष्यभर अंडी घालते व ती दरदिवशी ७००–१,००० अंडी घालते. ही अंडी फलित व परिस्थितीनुसार अफलित असतात. फलित अंड्यापासून निर्माण झालेल्या डिंभाला दार्इ कामकरी माश्‍या अन्न पुरवितात. ज्या डिंभाला राजरस किंवा राजान्न (मध आणि कामकरी माशीच्या जीवग्रंथीपासून निर्माण होणारा प्रथिनयुक्त स्राव) मिळते त्याचे रूपांतर प्रजननक्षम राणीमाशीमध्ये होते. अशा प्रकारे मधमाशीचे जीवनचक्र पुन्हा सुरू होते.

मधमाशीमध्ये वाढीच्या अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ अशा चार अवस्था असतात. जीवनचक्रातील निरनिराळ्या अवस्थांचा काल सभोवतालच्या तापमानावर अवलंबून असतो. अंड्यापासून नवीन माशी तयार होण्यासाठी कामकरी माशीला २० दिवस, राणीमाशीला १६ दिवस तर नरमाशीला २४ दिवस लागतात. अंडे, डिंभ, कोश आणि प्रौढ माशी पोळ्यातच असतात. मधमाशीच्या पोळ्याची रचना विशिष्ट पद्धतीने केलेली असते. मधमाशींचे पोळे एखाद्या आधाराला लटकलेले असून त्यात षटकोनी आकाराचे मेणाचे कप्पे असतात. कामकरी माश्यांच्या उदर भागाच्या खालच्या बाजूला मेणग्रंथी असतात. त्यांतून मेण बाहेर स्रवले जाते. कामकरी माशी ते मेण मुखपोकळीत घेते व जंभग्रंथींच्या स्रावाबरोबर चर्वण करून एकत्र करते. ते एकरूप झाल्यावर त्यातून मेणाच्या वड्या किंवा तुकडे बनविले जातात व त्यांपासून षटकोनी कप्पे तयार करून पोळे तयार केले जाते. पोळ्याला दोन्ही बाजूंना कप्पे असतात. या कप्प्यांमध्ये कामकरी माशीसाठी लहान, नरमाशीसाठी मध्यम आणि राणीमाशीसाठी मोठा असे तीन आकारांचे कप्पे असतात. इतर कप्प्यांत मध आणि परागकण साठविले जातात. असे साठवण कप्पे पोळ्याच्या वरच्या आणि कडेच्या बाजूंना असतात. अंडी, डिंभ, कोश आणि नवीन माशीसाठी लहान शिशू कप्पे असतात व ते पोळ्याच्या मध्यभागी आणि खालच्या बाजूला असतात. राणी कप्पे मोठे, वेडेवाकडे अथवा खारकेच्या आकाराचे असतात. या पोळ्यांपासून मध आणि मेण मिळते.

मकरंदातील सुक्रोज या शर्करेचे फ्रुक्टोज आणि ग्लुकोज या शर्करांमध्ये रूपांतर होते. याच वेळी मकरंदातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन मकरंदापासून मध तयार होतो. सामान्यपणे ज्या वनस्पतींच्या फुलांपासून मकरंद मिळवून मध तयार करतात त्या वनस्पतींचे नाव मधाला देतात. भारतात जांभूळ, हिरडा, चिंच, कडूलिंब, संत्री, मोसंबी, कारली, शेवगा, तीळ, मोहरी इ. वनस्पतींपासून मध मिळतो. मधाचा उपयोग प्रामुख्याने अन्न म्हणून केला जातो. तसेच औषधी गोळ्या व ‘मीड’ नावाचे मद्य करण्यासाठी मध वापरतात. मेणाचा उपयोग औषधनिर्मितीत, सौंदर्यप्रसाधननिर्मितीत आणि प्रयोगशाळेत केला जातो. मधमाशीमार्फत परपरागण होऊन फळे व बीज उत्पादनात वाढ होण्यास मदत होते.

सातेरी व इटालियन मधमाशीने नांगी मारली असता माणसाच्या शरीरात टाकलेले विष काही आजार बरे करते, असे आढळले आहे. या विषामुळे माणसाच्या शरीरात रोगप्रतिकारक शक्ती वाढते, असा अनुभव आहे. आग्या माश्यांची मारलेली नांगी मात्र प्रचंड वेदनादायक असते. मधमाशीच्या नांगीत मेलिटीन हे विषारी द्रव्य असते. मधमाशीच्या डंखावर धुण्याचा सोडा, टूथपेस्ट, कांद्याचा रस, तंबाखूचे पाणी लावल्यास वेदना कमी होतात. मोठ्या संख्येने मधमाश्यांचा डंख झाल्यास व्यक्ती मृत्युमुखी पडू शकते.

मधमाश्यांचे नृत्य प्रकार: (१) गोल नृत्य, ( २) इंग्रजी आठ आकार नृत्य

मकरंद आणि परागकण गोळा करताना मधमाशी विशिष्ट नृत्य करून त्यांची दिशा आणि अंतर एकमेकींना कळवितात. मकरंद आणि परागकण असलेली फुले जवळ असतील तर कामकरी माशी गोल नृत्य करते आणि फुले लांब असतील तर इंग्रजी आठ (8) आकारात नृत्य करते. मधमाशी पोळ्यावर ज्या दिशेने नृत्य करते ती अन्नाची दिशा असते व सूर्यही त्याच दिशेला असतो. नृत्य करताना तिचे उदर दर सेकंदाला किती वेळा हेलकावते त्यावर अन्न किती लांब आहे, ते इतर कामकरी माश्यांना समजते. मधमाश्यांचे नृत्यसंकेत शोधल्याबद्दल कार्ल व्हान यांना १९७३ साली शरीरक्रियाविज्ञान व वैद्यक विषयाचा नोबेल पुरस्कार मिळाला आहे.

पतंग, झुरळ, वाळवी, खंडोबाचा घोडा, भुंगा, मुंगी, गांधील माशी, कोळी, पाल, उंदीर, अस्वल इ. मधमाशीचे शत्रू आहेत.

पोळ्यातून मध आणि मेण जमा करण्याची जुनी पद्धत अतिशय ओबडधोबड आहे. या प्रकारात झाडाला लटकणारे पोळे कापून काढण्यात येते. त्याआधी धूर करून मधमाश्यांना हुसकावून लावले जाते व पोळे पिळून त्यातला मध गोळा केला जातो. हा मध अशुद्ध असतो. मात्र यामुळे पोळे, मधमाश्‍या, अंडी, डिंभ आणि कोश यांची हानी होते. हल्ली कृत्रिम लाकडी मधुपेट्या वापरून मध मिळवितात. लँगस्ट्रॉथ या कृषिवैज्ञानिकाने प्रथम ही पेटी तयार केली. कालानुसार या पेटीत योग्य बदल करून पेटीची लांबी, रुंदी व उंची यांचे प्रमाणीकरण केले आहे. या पद्धतीला मधुमक्षिकापालन म्हणतात. पुणे येथे केंद्रीय मधमाशी संशोधन संस्था असून अशाच संस्था पंजाब व तमिळनाडू येथे आहेत. महाराष्ट्रात महाबळेश्वर येथे मधुमक्षिका संशोधन केंद्र आहे.

मधमाश्यांमध्ये बहुरूपता दिसते. त्यांच्यात कामकरी माशी, राणीमाशी आणि नरमाशी असे तीन प्रकार असतात. कामकरी माश्या पोळ्यासाठी विविध कामे करतात. परंतु प्रजननाचे काम करीत नाहीत. राणीमाशी आणि नरमाशी फक्त प्रजननाचे काम करतात. पण पोळ्यासाठी इतर कामे करीत नाहीत. या श्रम विभागणीमुळे पोळ्यातील सर्व कामे व्यवस्थित होतात, मृत्यूदर कमी होतो, जन्मदर वाढतो आणि पुढील पिढी मोठ्या संख्येने निर्माण होते. राणीमाशीने जन्म दिलेल्या पिलांचे संगोपन कामकरी माश्या करतात. पोळ्यात मधमाशीच्या अनेक पिढ्या एकत्रित असतात. पोळ्यांमधील मधमाश्यांचा संघ इतका संघटित असतो की, तो पूर्ण संघ एका (संयुक्त) सजीवासारखा वागतो. मधमाश्यांमध्ये दिसून येणाऱ्या या विशिष्ट सामाजिक वर्तनाला सुसामाजिकता (युसोशॅलिटी) असे म्हटले जाते (पहा: सुसामाजिकता; मुंग्या). मधमाश्यांप्रमाणे मुंग्या व वाळवी या कीटकांमध्येही सुसामाजिकता दिसून येते.

प्रतिक्रिया व्यक्त करा