वनसंशोधन संस्था व महाविद्यालये : ( स्थापना – १९०६, देहराडून )

वनसंशोधन संस्था व महाविद्यालये ही देशातील वनविषयक संशोधानासाठीची एक अग्रगण्य संस्था असून या संस्थेला ISO-९००१-२००० मानांकन प्राप्त झाले आहे. वनीकरण व पर्यावरण क्षेत्रासंबंधीच्या संशोधनाचे कार्य करणारी देशातील ही एक मान्यताप्राप्त संस्था असून ती भारतीय वन संशोधन आणि शिक्षण परिषद (ICFRE) या शिखर संस्थेच्या अंतर्गत कार्य करते. भारतातील उत्तराखंडाची राजधानी डेहराडून येथे या संस्थेची स्थापना सन १८७८ मध्ये ब्रिटीश इंपेरिअल फॉरेस्ट स्कूल या नावाने झाली. वनसंशोधन करणारी ती एकमेव भारतीय उपखंडातील  संस्था आहे. १९०६ साली संस्थेचे नामांतरण इंपेरिअल फॉरेस्ट रिसर्च इन्स्टिट्यूट असे झाले. भारतातील तत्कालिन वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्यांना वनिकीचे प्रशिक्षण देण्यासाठी १९३८ मध्ये संस्थेच्या परिसरात वन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. वन संशोधनाबरोबरच भारतीय वन सेवेतील, राज्य वनसेवेतील वरीष्ठ अधिकारी तसेच वन परिक्षेत्र अधिकारी अशा दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देत असल्याने तिचे नामकरण आता वन संशोधन संस्था व महाविद्यालये असे करण्यात आले आहे.

या संस्थेला १९९१ मध्ये विद्यापीठ अनुदान मंडळातर्फे अभिमत विद्यापीठाचा दर्जा मिळाला. त्यानंतर आता या संस्थेत लगदा व कागदनिर्मिती तंत्रज्ञान, पर्यावरण व्यवस्थापन, वनीकरण व्यवस्थापन, काष्ठविज्ञान अशा तंत्रज्ञान विषयांचे पदव्युत्तर व नैसर्गिक साधनसंपत्तीचे व्यवस्थापन, सुगंध तंत्रज्ञान ( aroma technology) विषयांचे पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम चालविले जातात. विद्यार्थ्याना पीएच्.डी. पदवी अभ्यास पूर्ण करण्याची सोय येथे आहे.

या संस्थेने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर वन संशोधन कार्यामध्ये भरीव कामगिरी केली आहे. आतापर्यंत ५५० वन प्रजातींच्या संवर्धनाविषयीची माहिती, निलगिरी, पापलर, उष्ण कटीबंधीय पाईन्स, पालोनिया इ. परदेशीय प्रजातीची यशस्वी लागवड पद्धती, महत्त्वाच्या प्रजातीचे बीज संकलन व साठवण, बांबू व्यवस्थापन, कीडीचे नियंत्रण इ. विषयांवर संशोधन केले आहे. संस्थेने काष्ठसंवर्धनासाठी विकसित केलेल्या अर्सेनिक-कॉपर क्रोमेट प्रक्रियेचा उपयोग आता जगभर केला जात आहे. तसेच बांबू व लाकडापासून कागद निर्मितीसाठी आवश्यक असणारा लगदा तयार करण्याची पद्धत विकसित केली असून ती उपयुक्त ठरत आहे.

संस्थेच्या परिसरात विशिष्ट विषयांवरील संशोधन करण्यासाठी स्वतंत्र विभाग आहेत, ते असे: वनस्पतीशास्त्र विभाग, लगदा व कागदनिर्मिती विभाग, रसायनशास्त्र व वनोपज विभाग, वातावरण बदल व वन प्रभाव विभाग (Climate Change & Forest Influences Division), परिस्थितिकी व पर्यावरण विभाग  (Ecology & Environment Division), विस्तारविभाग, वन कीटकविज्ञान विभाग, वन माहितीसंग्रह विभाग, वन विकृतीशास्त्र विभाग, वनस्पतिरोगविज्ञान, वन उत्पाद विभाग, वन मृदा व मृदा सुधारणा विभाग, जनुकीय व वृक्षवंशवृद्धी विभाग, अकाष्ठ वनोपज विभाग, साधनसंपत्ती सर्वेक्षण, वन-अर्थशास्त्र आणि वन व्यवस्थापन विभाग, वनसंवर्धन विभाग. या संस्थेची चार प्रादेशिक केंद्रे कोईमतूर, जबलपूर, बर्नीहाट व बंगलोर येथे आहेत आणि विशिष्ट प्रकल्पांची अनेक लहानमोठी केंद्रे व प्रयोगशाळा इतर ठिकाणी आहेत.

संस्थेमार्फत प्रामुख्याने जैव विविधता संवर्धन, जळाऊ लाकूड, तण, चारा व इमारती लाकडांच्या प्रजातीच्या बियाणांचे उत्पादन आणि प्रमाणिकरण, सामाजिक वनीकरण व कृषी वानिकी, अवनत झालेल्या जमिनीचा पुन्हा वापर अपारंपारिक वन उत्पादनाची उपयुक्तता, पडीक जमीन विकासासाठी नवीन तंत्रज्ञानाचा विकास, रोपवन साहित्याचा विकास, क्षारपड जमिनींचा विकास, खनीकर्म क्षेत्राचा पुनर्विकास व पारिस्थितीकी नियंत्रण या विषयांवर संशोधन केले जाते. संस्थेमार्फत सद्यस्थितीत विभागीय, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संदर्भाने जवळपास १०० संशोधनात्मक प्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यापैकी जवळपास ६० प्रकल्प विविध यंत्रणांच्या आर्थिक सहकार्याने चालू आहेत. संस्थेमध्ये एकूण सध्या (२०२० साली) ११४९ कर्मचारी कार्यरत असून त्यांपैकी १७१ संशोधक व ३५० तांत्रिक अधिकारी आहेत. संस्थेमध्ये विविध प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध असून नॅशनल फॉरेस्ट लायब्ररी इन्फर्मेशन सेंटर हे देशस्तरावरील सर्वांत मोठे सुसज्ज ग्रंथालय आहे. या ग्रंथालयात जवळपास दोन लाख ग्रंथ, १४७ परदेशी व ८३ भारतीय नियतकालिके उपलब्ध आहेत. संस्थेच्या परिसरात एक वनस्पती उद्यान असून ते पर्यटकाचे प्रमुख आकर्षण केंद्र आहे.

संदर्भ :

समीक्षक : मोहन मद्वाण्णा