कुलकर्णी, धोंडूताई : ( २३ जुलै १९२७ – १ जून २०१४ ). भारतीय अभिजात संगीत शैलीतील जयपूर-अत्रौली घराण्याच्या व्रतस्थ व ख्यातनाम गायिका. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील कोल्हापूरचा. त्यांचे वडील गणपतराव कुलकर्णी हे पेशाने शिक्षक होते. त्यांना स्वत:ला गाण्याची खूप आवड असल्यामुळे आपल्या पहिल्या अपत्याला गाणे शिकवायचे असा त्यांनी दृढ निश्चय केला होता. त्या काळी उच्चकुलीन मुलींनी गाणे-बजावणे निषिद्ध मानले जात असे; परंतु घरातील सांगीतिक वातावरणामुळे धोंडूताईंनी वयाच्या पाचव्या वर्षापासून जयपूर-अत्रौली घराण्याचे उस्ताद अल्लादियाखाँसाहेबांचे पुतणे अर्थात हैदर खाँसाहेबांचे दत्तक पुत्र उस्ताद नथ्थन खाँसाहेबांकडे शास्त्रीय संगीताची तालीम घ्यायला सुरवात केली. ही तालीम धोंडूताईंच्या वयाच्या आठव्या वर्षापर्यंत चालली. दरम्यान नथ्थन खाँसाहेब मुंबईला वास्तव्यासाठी गेले. धोंडूताईंची धाकटी बहीण शकुंतला यांनाही गाण्याची तालीम मिळाली होती. शिवाय त्यांचा धाकटा भाऊ प्रभाकर हे ही उत्तम तबला वाजवीत असत. धोंडूताईंनी गंधर्व नाटक कंपनीतील केशवराव शिंदे यांच्याकडून काही दिवस हार्मोनियमचेही धडे घेतले. त्याचवेळी उस्ताद अल्लादियाखाँसाहेबांचे सुपुत्र उस्ताद भूर्जीखाँ मुंबईतील हवा विशेष मानवत नसल्याने कोल्हापूरला वास्तव्यासाठी आले. त्यांच्याकडे १९४० ते १९५० अशी सलग १० वर्षे धोंडूताईंनी संगीताची तालीम घेतली. भूर्जीखाँसाहेबांच्या निधनानंतर १९५७ ते १९६० या कालावधीत त्यांना केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून गाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्ती अंतर्गत धोंडूताईंना उस्ताद हैदर खाँसाहेबांच्या पट्टशिष्या गानचन्द्रिका लक्ष्मीबाई जाधव यांच्याकडे शिकण्याचा योग आला. लक्ष्मीबाईंकडून त्यांना स्वरसाधना कशी करावी ? याविषयी मार्गदर्शन तसेच काही रागांची तालीम मिळाली. याच कालावधीत अल्लादियाखाँसाहेबांचे नातू उस्ताद अजीजुद्दीनखाँ यांच्याकडून अनेक दुर्मीळ रागांच्या बंदिशी व काही रागांची शिदोरी धोंडूताईंना प्राप्त झाली. त्यानंतर १९६२ ते १९७१ अशी सलग १० वर्षे ख्याल गायकीची सूरश्री केसरबाई केरकर यांच्याकडून धोंडूताईंना गाण्याची तालीम मिळाली. केसरबाईंच्या त्या एकमेव शिष्या होत्या. त्यांच्या गायकीच्या वारसदार म्हणून धोंडूताईंकडे बघितले गेले.

वयाच्या आठव्या वर्षी धोंडूताईंचा मुंबई आकाशवाणीवरून गाण्याचा पहिला कार्यक्रम प्रसारित झाला. तेव्हापासून बालकलाकार म्हणून त्या प्रसिद्ध झाल्या. वयाच्या विशीच्या आतच १९४४ साली वर्तमानपत्रांनी धोंडूताईंना ‘रागरागिण्यांची राणी’ म्हणून गौरविले होते.

विक्रमादित्य काॅन्फरन्स,मुंबई; जयपूर येथील संगीत परिषद; भूर्जीखाँसाहेब स्मृतीदिन, गायन समाज देवल क्लब, कोल्हापूर; गंगा घाट, बनारस; एन.सी.पी.ए. मुंबई; भारत गायन समाज, पुणे येथे आणि याशिवाय देशभरातील अनेक ठिकाणच्या मैफिलींतून धोंडूताईंनी जयपूर-अत्रौली घराण्याच्या विशुद्ध गायकीचा ठसा रसिकांच्या मनावर उमटविला. खंबावती, भूप, सावनी नट, भूपनट, बिहागडा, नंद, मारूबिहाग, पटमंजिरी, ललिता गौरी, खेमनट, झिंजोटी, नट कामोद, बसंती केदार, शहाणा कानडा इत्यादी रागांच्या मांडणीमध्ये धोंडूताईंचा हातखंडा होता. याशिवाय जयपूर-अत्रौली घराण्याच्या अनेक अनवट, दुर्मीळ रागांचा खजिना त्यांच्याकडे होता.

धोंडूताईंनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत कलेच्या सेवेसाठी वाहिले. त्यांनी ही गानविद्या शेवटपर्यंत शिष्यांना देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या शिष्यांमध्ये वसंतराव कर्नाड, मंजिरी वैशंपायन, नमिता देवीदयाल, मंजुताई मोडक, स्मिता भागवत, दीपक राजा, संजय दीक्षित, आदित्य खांडवे, ऋतुजा लाड, दीपिका भिडे, जशन भूमकर, विनय गडेकर इत्यादींचा समावेश होतो.

धोंडूताईंना अनेक मानसन्मान लाभले. १९९० सालच्या संगीत नाटक अकादमी पुरस्काराने धोंडूताई सन्मानित होत्या. याशिवाय राय कृष्णदास इंटेक वाराणसी संस्थेचे मानपत्र, सुरसिंगार या संस्थेतर्फे मिळालेली स्वरविलास ही पदवी, बेंगलोर किडने फाउंडेशनतर्फे मल्लिकार्जुन मन्सूर पुरस्कार (२००९), महाराष्ट्र सरकारचा महाराष्ट्र गौरव पुरस्कार, २०११ मध्ये चतुरंग प्रतिष्ठान व म्हैसकर फाउंडेशनतर्फे सन्मानपत्र अशा अनेक पुरस्कारांनी धोंडूताई सन्मानित आहेत. त्यांचे आध्यात्मिक गुरू स्वामी स्वरूपानंद यांचे शिष्य स्वामी अमलानंद यांनी धोंडूताईंना उद्देशून ‘ही गानयोगिनी आहे’ असे उद्गार काढल्याने त्या पुढे गानयोगिनी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. २०१० मध्ये सह्याद्री वाहिनीने धोंडूताईंच्या जीवनकार्यावर एक अनुबोधपट काढला आहे. धोंडूताईंनी त्यांचा सांगितिक प्रवास सूर संगत  या आत्मचरित्राद्वारे ग्रथित केला आहे (फेब्रुवारी २०१४).

धोंडूताईंकडे अनेक अप्रचलीत रागांचा साठा होता. रागशुद्धता, लयीची गुंफण आणि शुद्ध आकाराचा प्रभाव, बंदिशीतील अक्षरांचे सुस्पष्ट उच्चारण ही संगीतातील महत्त्वाची मूल्ये त्यांनी फार मेहनतीने प्राप्त केली. त्यांची गायकी ही त्यांच्या अनेक गुरुंच्या गायकीचे मिश्रण होते. बाणेदार व संयमी व्यक्तिमत्त्व, बुलंद आवाज, जयपूर घराण्याचे गाणे विशुद्ध स्वरूपात मिळविण्यासाठी व जतन करण्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या व घराण्याच्या शैलीवर ठाम असणाऱ्या धोंडूताईंचे वयाच्या ८६ व्या वर्षी वृद्धापकाळाने मुंबई येथे त्यांच्या राहत्या घरी निधन झाले.

संदर्भ :

  • कुलकर्णी, धोंडूताई,सूर संगत, पुणे, २०१४.
  • देवीदयाल, नमिता, द म्युझिक रूम, भारत, २००९.